अमरावती,यवतमाळातून दहा हजार धनगर नागपूर मोर्चात जाणार-दिलीप एडतकर
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी साठी नागपूर विधिमंडळावर काढण्यात येणाऱ्या धनगर समाजाच्या मोर्चात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून दहा हजारांहून जास्त समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती ॲड दिलीप एडतकर यांनी दिली असून अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातूनही प्रचंड संख्येत धनगर समाज नागपूरच्या रस्त्यावर उतरणार असल्याचे दिलीप एडतकर यांनी कळविले आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच प्रलंबित असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत अनुसूचितधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ क्रमांकावर समाविष्ट केले आहे तथापि धनगर या शब्दाऐवजी धनगड हा शब्द मुद्रीत झाल्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागले ‘र’च्या ऐवजी ‘ड’ झाल्यामुळे धनगरांवर हा अन्याय झाल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले असून ‘ड’ चा ‘र’ म्हणजेच धनगड ऐवजी धनगरअशी दुरुस्ती करून धनगरांच्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न विद्यमान राज्य व केंद्र सरकारने विना विलंब सोडवावा अशी मागणी दिलीप एडतकर यांनी केली आहे.
नागपूर विधिमंडळावर काढण्यात येणारा धनगर मोर्चा कोणत्याही नेत्याच्या नेतृत्वात नसून सर्व पक्षीय धनगर नेते, सर्व धनगर सामाजिक संघटना आणि मोर्चात सामील होणारा प्रत्येक धनगर या मोर्चाचा नेता असेल “ना नेता ना पक्ष, आरक्षण एकच लक्ष्य ” असा या मोर्चाचा नारा असून जातीने धनगर असणाऱ्या प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप एडतकर यांनी केले आहे.