डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धगधगते यज्ञकुंड – चंद्रशेखर खंडारे
बुद्ध टेकडीवरील १७ फुटी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून काळाच्या प्रवाहालाच कलाटणी दिली आणि हजारो वर्षापासून दारिद्र्य , शोषण आणि अज्ञानाचा अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना सन्मानाने जगायला शिकवलं. स्वतः दिव्याप्रमाणे जळून येथील माणसांची आयुष्य त्यांनी प्रकाशमय केलीत. बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे संघर्षाचे जीवन होतं. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाचा , मानवाच्या सन्मानासाठीचा , सामाजिक जागृतीचा संघर्ष आणि संविधान निर्मितीचा संघर्ष करून दीपस्तंभ प्रमाणे कार्य केलेले आहे . बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे धगधगते यज्ञकुंडत होते. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी श्री चंद्रशेखर खंडारे यांनी केले.
ते स्थानिक एस. आर. पी. एफ. पाचशे क्वार्टर जवळील बुद्ध टेकडी वर आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंते प्रज्ञा बोधी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. संजय खडसे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी पदावरून बोलताना प्रोफेसर डॉ. संजय खडसे म्हणाले की , ‘ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अविरत प्रवाह जन्मलेले एक अलौकिक असं युगपुरुष.डॉ. आंबेडकरांचे भारत भूमीवर अत्यंत उपकार असून त्यांनी येथील जनतेसाठी संविधान निर्माण करून तमाम नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.
अध्यक्षिय भाषणात भंते प्रज्ञा बोधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तुत्वाचा परिचय देऊन भगवान तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी संपूर्ण जगाला प्रज्ञा,शील , करुणा हा संदेश दिला , ज्यातून मानव समाजाची खऱ्या अर्थाने उन्नती झाली. असे ते याप्रसंगी बोलले.
कार्यक्रमाचे प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १७ फुटी पूर्णा कृती पुतळ्यास प्रा. डॉ. संजय खडसे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले . तद्नंतर उपस्थित सर्वांनी बुद्ध वंदना घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. संजय खडसे यांनी तर आभार प्रदर्शन श्री माणिकराव तायडे यांनी केले. आदरांजली कार्यक्रमास माणिकराव तायडे कैलासराव वाकोडे , अवधूत मोहोड ,शेषराव जामनिक , उत्पल डोंगरे , गोवर्धन घोडे , जगदीश भोगे ,अवि तायडे आदींसह परिसरातील नागरिक व बुद्ध टेकडीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.