भूमी अभिलेख कार्यालयाच्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण
भूमी अभिलेख विभागाची स्पृहणीय कामगिरी- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी): भूमि अभिलेख कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती सुलभरीत्या समजावी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाची प्राथमिक माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी स्वामीत्व योजनेतील लाभार्थ्यांना मिळकतींच्या सनदाचे वाटप श्री. कटियार यांचे हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शन पुस्तिकेचा नागरिकांना निश्चितच लाभ होणार असून भूमी अभिलेख कार्यालय संदर्भातील कामे अधिक सुलभतेने होणार आहे. अमरावती विभागात सर्वप्रथम अशा प्रकारची माहिती व मार्गदर्शन पुस्तिका तयार करणारे अमरावतीचे उपधीक्षक कार्यालय असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी काढले. भूमि अभिलेख विभाग सामाजिक जाणीवेतून सकारात्मक व ठोस कार्य करीत असल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत सहज सुलभरित्या पोहचविण्यासाठी राज्य शासनाने “शासन आपल्या दारी” ही योजना सुरु केलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत उप अधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांनी “स्वामीत्व योजना-ड्रोन सर्वेचे” काम पूर्ण करून ग्रामीण भागातील मूळ गावठाणामध्ये राहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या मिळकतींचे अधिकार अभिलेख, मालकी हक्काचा पुरावा -पीआर कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय भूमि अभिलेख कार्यालय संदर्भातील प्राथमिक माहिती पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही पुस्तिका भूमिअभिलेख उपअधीक्षक अनिल फुलझेले यांनी तयार केली आहे. यावेळी अमरावती विभागाचे भूमि अभिलेख उपसंचालक लालसिंग मिसाळ, भूमि अभिलेख उपअधीक्षक अनिल फुलझेले व कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व नागरिक उपस्थित होते.