‘कुणी नशीबात तिच्या, अशी गरीबी लिव्हली’.
‘भाकरीच्या सपनात, लेकरं निजलेली.’
ज्याला नाही माय -मुखपृष्ठ परीक्षण-
नंदू वानखडे, मुंगळा, ता. मालेगाव, जि. वासिम यांच्या ’ज्याला नाही माय’ या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले त्या कलाकृतीचे मुखपृष्ठ नुकतेच पहायला मिळाले.. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या अभिनव कल्पकतेने सजलेल्या या मुखपृष्ठावर ‘एक आई डोक्यावर पदर घेऊन आपल्या लहान मुलाला हातात धरून रस्ता पादाक्रांत करीत आहे… मुलाचे हावभाव संभ्रमित आहेत.. समोर विस्तीर्ण असे क्षितीज, कडेला डोंगराच्या कडा , आभाळ भरून आलेले, दुपारची वेळ आहे… खाचखळग्यांच्या रस्त्यावरून अनवाणी पावलांनी ही माउली आपल्या मुलाला घेऊन क्षितिजाच्या दिशेने निघालेली आहे’ अत्यंत बारकाईने पाहिले तर असे दिसते की मुलाच्या पायाला झाडपाल्याची पेंढी करून बांधली आहे. असे चित्र रेखाटलेले दिसते. कथाकार नंदू वानखडे हे आईच्या मायेला पारखे झालेले असल्याने त्यांनी माय नसल्यावर काय होते याचे वास्तव चित्रण या कथासंग्रहातून मांडलेले असावे. आईच्या आठवणी शब्दबद्ध करून त्या वाचकांना समर्पित केलेल्या आहेत.
वरवर पाहता या चित्रात वरील संदर्भ दिसून येतात मात्र या चित्राचा जर बारकाईने अभ्यास केला तर असे दिसून येते की लेखकाने त्यांच्या बालपणातील आई बरोबरच्या काही आठवणी या कथासंग्रहात शब्दबद्ध केलेल्या असाव्यात असे दिसते. या कलाकृतीच्या मुखपृष्ठाला पाहिले आणि मनात या कलाकृतीच्या मुखपृष्ठाविषयी विचारांनी थैमान घातले…..
कवी यशवंत आईविषयी आपल्या कवितेत म्हणतात की, “आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.” ज्याला आई नाही त्याच्यासाठी किती समर्पक ओळी आहे. गझलकारा गीतांजली वाबळे आपल्या एका गझलेच्या शेरात म्हणतात की, “उजळत जाते काठकोपरा पूर्ण घराचा, समईमधली वात होत पण जळते आई” खरं तर आईवडील हे माणसाचा पहिला गुरु असतात… जगातील सर्व दैवते एका बाजूला आणि आईवडील एका बाजूला. प्रत्येक सुखदु:खात आई वडील आपली काळजी घेत असतात. आई मंदिराचा कळस असते तर बाप मंदिराच्या पायरीचा दगड असतो, तो भक्कम असतो… मंदिराला तो डगमगू देत नाही. त्यातही आई व्यक्तिमत्वाची व्याप्ती पाहिली तर ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. आईची महती गातांना कवी प्रा. स.ग.पाचपोळ यांनी तर आपल्या कवितेत जिथे पहाल तिथे आईच दिसते म्हणून त्यांच्या एका कवितेत ते म्हणतात की, “हंबरूनी वासराला चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय.” तर कवी अरविंद शेलार आईची कविता गातांना म्हणतात की,
“पहाटे पहाटे माय कामावं गेलेली,
भाकरीच्या सपनात लेकरं निजलेली.
माय उपाशी तापाशी बांध तुडवी लोकाचे,
फाटलेल्या धुडक्याने पीळ झाकिती पोटाचे,
अशी नशिबात तिच्या कुणी गरिबी लिव्हली,
भाकरीच्या सपनात लेकरं निजलेली.”
अत्यंत विदारक दारिद्र्याचे चित्रण असलेल्या या कविता वाचकाला गहिवरून टाकतात, आणि अशाच गहिवरून टाकणाऱ्या विषयांची बांधणी करून कथाकार नंदू वानखडे यांनी ‘ज्याला नाही माय’ ही साहित्य कलाकृती साकारली आहे आणि प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी या कलाकृतीला अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ दिले आहे. आज आपण या मुखपृष्ठाचा गर्भित अर्थ शोधू या….
असा कोणता गर्भित अर्थ या मुखपृष्ठात दिसतो ? तर आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा अर्थ काय, आणि लेखक, मुखपृष्ठचित्रकार व प्रकाशक यांनी या मुखपृष्ठाचा येथे वापर का केला असावा याचा अभ्यास करू. प्रथमतः अभिनव कल्पकतेने सजलेल्या या मुखपृष्ठावर ‘एक आई डोक्यावर पदर घेऊन आपल्या लहान मुलाला हातात धरून रस्ता पादाक्रांत करीत आहे’ याचा विचार करू. यात डोक्यावर पदर असणे म्हणजे ही आई जुन्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन चालणारी, ग्रामीण जीवनाचे रीतीरिवाज पाळणारी प्रतिकात्मक स्री जरी रेखाटली असली तरी तिला वास्तवातील स्पर्श आहे.. ती लेखकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. ज्या माऊलीने लेखकाला लहानपणी हाताला धरून गावाच्या बाहेर जाऊपर्यत डोक्यावरचा पदर ढळू दिला नाही ती शालीनता, जीने गावातून जाताना पायातली पायताणे कधी वापरली नाही ती संस्कारक्षमता सांभाळून लेकाराने शिकावे, मोठे व्हावे या ध्येयाने पछाडलेल्या त्या पतिव्रता स्रीचे रूप आहे. पूर्वीपासून डोक्यावर पदर घेणे ग्रामीण जीवनशैलीचे संस्कार आहेत. पदर ढळलेल्या स्रीला समाजात त्याकाळी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत असे .. हल्ली शिक्षणाने शहरी व ग्रामीण भागात जीन्स, शर्ट पँट घालण्याचा जमाना आला त्यामुळे जुन्या परंपरा मोडीत निघाल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण भागात डोक्यावर पदर घेतलेली स्री दिसून येते. कथाकार नंदू वानखडे यांची आई देखील जुन्या विचारांची होती त्यामुळे तिच्यावर त्याकाळचा तो व्यवस्थेचा प्रभाव दिसून येतो. आपल्या मुलाने भविष्यात समोर येणाऱ्या डोंगराएवढ्या संकटांना सामोरे जाण्याचे शिकले पाहिजे म्हणून त्याचा ‘हात धरून’ त्याला त्या संकटांची जाणीव करून चालायला लावले आहे. हा मुलगा या संकटांशी अनभिज्ञ आहे त्यामुळे त्याच्या चालण्यात संभ्रमावस्था दिसून येते. व्यवस्थेविरुद्ध जाण्यासाठी त्याचे पाय पुढे जात नाही मात्र आई खंबीर असल्याने त्याला ती हे संकटांना सामोरे जाण्याचे धडे देत आहे… आपल्या नशिबात जे कष्ट आले आहेत ते कष्ट फक्त करत रहायचे हा एकच डोक्यात विचार घेऊन.
या मुखपृष्ठावर ‘समोर विस्तीर्ण असे क्षितीज, कडेला डोंगराच्या कडा , आभाळ भरून आलेले, दुपारची वेळ आहे’ असे चित्र दिसते… अत्यंत गहन अर्थ मनात ठेवून हे संदर्भ यावर घेतलेले दिसत आहेत. कथाकाराला समोर आव्हानांचे खुले क्षितीज काबीज करायचे आहे, म्हणून त्यांचे तोंड क्षितिजाकडे असून आजूबाजूला लहानमोठ्या डोंगरकडा आहेत.. जीवनात ही संकटांची डोंगरकडा आडवी येणार आहे, तुला यातून खडतर मार्ग काढत चालायचे आहे. या मुलाच्या पायाला झाडपाल्याची पेंढी करून बांधलेली दिसून येते यावरून असे लक्षात येते की, कथाकाराच्या लहानपणीच्या काळात दिवस अत्यंत हलाखीचे होते… उन्हाच्या झळांनी जीव कासावीस होतो , आपण आयुष्याचे चटके सहन केले ते मुलाला बसू नये, तसेच अनवाणी पायाला दगड, काटे टोचू नयेत, उन्हाने पाय पोळू नयेत म्हणून आईने झाडपाला गोळा करून तो पायाला बांधला आहे यावरून आईचे मुलाबद्दलचे मातृत्व दिसून येते आणि मुखपृष्ठचित्रकाराने त्यावेळची हीच परिस्थिती अचूक हेरून ती परिस्थिती मुखपृष्ठावर दाखवली आहे. यावर कथाकार आणि मुखपृष्ठकार यांची विचारांची बैठक एकच असल्याचे दिसून येते. जो परिस्थितीतून जातो त्यांच्या साहित्यातून, वर्तनातून, लेखणीतून तसे प्रकट होत जाते..
कथाकार नंदू वानखडे यांच्या समोर सर्व आभाळ दाटलेले आहे याचा अर्थ (दारिद्र्याचे आभाळ) असा आहे की, आईच्या नशिबात दारिद्र्य, गरिबी लिहिली आहे , परिस्थिती तिला शांत बसू देत नाही म्हणून ती दिवसरात्र एक करत मुलांचा सांभाळ करण्यासाठी कष्ट करत आहे, आईने उन्हातान्हात दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करायला जायची सवय लावून घेतली आहे.. ती सवय मुलाच्या अंगी रुजावी, मुलाला या (उन्हात) समाजाला वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध लढायचे असेल तर आव्हानांना सामोरे गेले पाहिजे त्यासाठी कष्ट केले पाहिजे, शिक्षणाने मस्तक सुधारते, आणि हे शिक्षण घरात बसून मिळत नाही ते समाजाकडून घेतले पाहिजे. शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक, आर्थिक ज्ञान मिळाले पाहिजे म्हणून मुलाला उन्हात या व्यवस्थेविरुद्ध हातात हात धरून घेऊन जात आहे अस अर्थ मला येथे अभिप्रेत होतो. …..
या मुखपृष्ठावरील कलाकृतीचे शीर्षक देखील वेगळ्या शब्दयोजनेत घेतले आहे… जसे व्यक्तीच्या मनात काही भावना उत्पन्न होतात त्यावेळी मन गहिवरून येते, कंठ दाटतो त्यावेळी त्याची मन:स्थिती दोलायमान होते त्याप्रमाणे ‘ज्याला नाही माय’ या शब्दांची स्थिती देखील दोलायमान झाली असा भास होतो, म्हणून या शब्दांना असे वेगळ्या योजनेत टाकून कलाकृतीच्या गहन अर्थात भर टाकली आहे.
कथाकार नंदू वानखडे यांच्या या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या अभिनव कल्पकतेने साकारले असून पुण्यातील परिस पब्लिकेशन यांनी प्रकाशित केले आहे. ग्रामीण व्यवस्थेतील एका स्रीभोवती फिरणाऱ्या कथा या संग्रहात समाविष्ठ आहेत
कथाकार नंदू वानखडे यांना पुढील दैदिप्यमान लेखनीसाठी हार्दिक शुभेच्छा…!
तुर्ताच इतकेच ……
कलाकृतीचे नाव – “ज्याला नाही माय”
लेखक- नंदू वानखेडे
कलाकृतीचा प्रकार – कथासंग्रह
लेखकाचा संपर्क क्रमांक – ९४२३६५०४६८
परीक्षण :
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- (“तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार”)
————–
Contents
hide
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
–बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
——————–