समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा काळ होता. ब्रिटिश भारतात येण्याआधी पेशवाई राजवट होती.पेशवाई राजवट म्हणजे समाजातील लोकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया पूर्णपणे मोडून त्यांना गुलाम बनविणे. मानवाचे हनन करणारा असा हा कर्दनकाळ होता.. वैदिक संस्कृतीचा पगडा असलेला तो काळ रूढी, परंपरा, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, धर्मवाद, कर्मकांड, याने ग्रासलेला होता. चुकीच्या परपरंना बळी पाडून, दैववादाच्या नावावर पाप- पुण्य, स्वर्ग, नरकाची भीती दाखवून सामान्य लोकांना गुलाम बनविल्या जायचे.
माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेतल्या गेले.. ईश्वरी थोतांड रचून देवाच्या नावावरच अन्याय अत्याचार केले जायचे.. प्रचंड अज्ञान समाजात असल्यामुळे आपण माणूस आहे.. याचा लोकांना विसर पडला. त्यांच्या वाट्याला जीवन आले तेच जीवन त्यांनी स्वीकारले. नव्हे ते त्यांच्या मेंदूवर उच्चनीच बिंबवल्या गेले. उच्चवर्णीयांनी आपले श्रेष्ठत्व कायम राहावे म्हणून शुद्रा, अतिशूद्रांना गुलाम बनविले. अमानुष छळ केला. अत्याचार केला.. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन ब्रिटिश भारतात आले आणि १८१८ साली पेशवाई संपुष्टात आली.. ब्रिटिशांच्या आगमनानंतर परिस्तिथी बदलायला लागली. ब्रिटिशांनी प्रथम भारतात शैक्षणिक क्रांती घडवून आणली, त्यासाठी “बोर्ड ऑफ ऐज्युकेशन” नावाची संस्था स्थापन केली; पण ते शिक्षण उच्चवर्णीया पर्यंतच सीमित राहले.. बहुजन आणि शूद्र शिक्षणापासून वंचित राहिले. आत्मा, मूर्तिपूजा, कर्मकांड अनिष्ट प्रथा, परंपरा, यामध्ये समाज आकंठ बुडालेला होता. प्रतिकारात्मक शक्ती आणि माणूस म्हणून जगण्याची वृत्ती केव्हाचीच संपली होती. गुलामी, अमानुष वागणूक, भेदाभेद, आणि यात पिचलेला समाज एवढेच भारतीय संस्कृतीचे चित्र होते.
हीच तत्कालीन परिस्तिथी बदलण्यासाठी, अंधाराला प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी, क्रांतीची मशाल पेटवून चैतन्याचा दीप प्रज्वलित करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत महात्मा फुलेंचा जन्म झाला. एक अलौकिक मानवाचा जन्म हा समाजउत्थानासाठी एका दिपस्तंभासारखा होता. परिवर्तनाचा वसा घेऊन समाज बदलविणारे ते आधुनिक भारतातील आद्य शिक्षक होते. तसेच समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक कार्यकर्ते होते. समाजात त्यावेळी फोफावलेला जातीवाद, विषमता, या मनात बंड करीत असलेल्या प्रश्नांकीत चिन्हाला न्याय देण्यासाठी, खालच्या जातीतील मानल्या जाणाऱ्या समाजाला आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार समजावे, ती एक समाज घटकाचा मुख्य पाया आहे. तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी यासाठी फुलेंनी त्यांना प्रोत्साहन दिले. ते खरे सामाजिक द्रष्टा होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण सहावी पर्यंत झालेले होते. देशाचे असे अमानुष चित्र पाहून त्यांचे मन पिळवटून निघाले. वृत्ती बंड करायला लागली. स्त्रियांना शुद्रापेक्षाही हीन वागणूक समाजात दिली जात होती. ती अज्ञानाच्या आणि गुलामीच्या जोखडात अडकलेली एक बाहुली होती. कसलीच किंमत नव्हती. स्त्री जिवंत असूनही एक मृत जीवन जगत होती. तिला तिच्या अधिकाराची जाणीव होऊ नये! म्हणून ज्ञानापासून वंचित ठेवले. वंशवेल वाढविणे एवढेच तिचे काम होते.. पतीची सेवा करणे हाच तीचा धर्म म्हणून तिचा मेंदू बधीर करून टाकला होता.
पुरुष प्रधान संस्कृतीची ती पूर्णपणे गुलाम होती. ही परिस्तिथी फक्त शिक्षणाने बदलू शकते आणि समाजाची प्रगती ही स्त्रियांवरच अवलंबून आहे. हे महात्मा फुलेंनी हेरले. शिक्षणाशिवाय विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित होणार नाही.. याची जाणीव त्यांना ब्रिटिशांना पाहून झाली..त्याच वेळी राणी व्हिक्टोरिया ही संपूर्ण जगावर राज्य करीत होती आणि आपल्या देशातील स्त्री जिवंत असूनही मृत अवस्थेत आहे. कर्मकांडात आणि धर्मवादात गुरफटलेली आहे. हे त्यांच्या लक्षात आले. या अस्वस्थ विचारानेच फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक अभ्यास केला. त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला.
त्यावेळी मानवी हक्कावर आधारित इ.स. १७९१ मध्ये थाॅमस पेन यांनी लिहिलेले “द राईट ऑफ मॅन” हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा त्यांच्या मनावर प्रभाव झाला..त्यामुळेच शिक्षणाशिवाय समाजाचा पाया रचणे अशक्य आहे हे त्यांनी हेरले.. विषमतेवर आधारलेल्या समाजाचा विकास व्हायचा असेल तर शिक्षण हेच सर्वोत्तम उपाय आहे, त्याशिवाय बुरसटलेल्या विचारात गुरफटलेला, जातिव्यवस्थेने खिळखिळा झालेला समाज या जाचक व्यवस्थेतून बाहेर येणार नाही. हे जोखड फेकायचे असेल तर शिक्षण मिळाले पाहिजे याची जाणीव त्यांना झाली.. हाती क्रांतीची मशाल घेऊन समाज परीवर्तनास ते पुढे आले. मागासलेल्या वर्गाला आणि महिलांना शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. ते भारतीय इतिहासातील आधुनिक समाज सुधारक होते!
प्रथम त्यांनी १ जानेवारी १९४८ ला पुणे येथे सावित्रीबाईंच्या सहकार्याने पहिली मुलीची शाळा काढली. ही घटना म्हणजे भारताच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासातील मोठी क्रांती होय. त्यानंतर सर्व जातिधर्माच्या पोरांना शिकता यावे म्हणून पुण्यात शुद्रासाठी आणि मुलींसाठी १८ शाळा काढल्या.. एक पौढा साठी शाळा काढली. जाचक रुढीवर हा त्यांचा घणाघाती प्रहार होता.. जो पर्यंत गुलामाला तू गुलाम आहे ही जाणीव करून दिल्या जात नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. त्यासाठी स्त्रियांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. एवढा व्यापक विचार त्यावेळी महात्मा फुलेंनी केला.
महात्मा फुले कृतिशील विचारांचे होते. याआधी पण मिशनऱ्यांनी शिक्षणाचा प्रयत्न केला पण असफल झाला, पण महात्मा फुलेंनी हा प्रयत्न यशस्वी करून दाखविला.हे सर्व करीत असतांना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सनातंनाच्या शिव्याशाप मानसिक,.शारीरिक त्रास सर्व सहन करावे लागले पण ज्योतिबा डगमगले नाही..सावित्रीबाईंनी त्यांना खंबीर साथ दिली..सावित्रीबाई आणि ज्योतिराव स्त्री पुरुष समानतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे. महात्मा फुले यांचा दृष्टिकोन आधुनिक होता. स्त्री आणि पुरुषांना समान शिक्षण समान वागणूक मिळावी अशी त्यांची विचारसरणी होती.. ज्योतीरावांची शिकवण समता, न्याय, बंधुता यावर आधारित होती. स्त्री, पुरुष समानतेचा त्यांनी पुरस्कार केला.. स्त्री प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी विधवा पुनर्विवाह, केशवपन बंदी, बालहत्या प्रतिबंधक गृह, या चळवळीत तळमळीने काम केले. अस्पुश्यांना स्वतःच्या घरचा पिण्याचा पाण्याचा हौद उपलब्ध करून दिला.. ते कृतिशील विचारांचे समाज सुधारक होते!
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, पाण्याचे नियोजन, शेती सुधारणा, धार्मिक सुधारणा, तसेच एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. महात्मा फुले यांनी समाज व्यवस्थापन सुधारण्यासाठी मूलगामी चळवळी केल्या.. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. शिक्षणाला उत्तेजन मिळावे, ग्रामीण भागात राहणारे शेतकरी, तसेच गरिबांची मूले शिकावी.. त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षण पद्धती कसी असावी या संबंधात हंटर शिक्षण आयोगाकडे आपले निवेदन दिले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे, मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, शाळेची संख्या वाढवावी, शिक्षकांना वेतन, प्रशिक्षित शिक्षक, शेतकरी वर्गातील शिक्षक आवश्यक,. शेतकरी मुलांना शिक्षण, व्यावसायिक शिक्षण पद्धती, स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षण, सर्व जातीच्या मुलांना प्रवेश, मोफत पुस्तके, नोकरीत आरक्षण, अशा विविध उपाययोजना त्यांनी नमूद केल्या होत्या यावरून त्यांना शिक्षण पद्धती कशी अपेक्षित होती हे स्पष्ट होते!
भारतीय जीवनाचा अविभाज्य घटक असणारी शेती ब्रिटिश पूर्व काळात अडचणीत होती. अज्ञानाचा दारिद्र्याचा फायदा घेणारे लोक, विविध कारणांनी शोषण करणारी यंत्रणा,.यांच्या दुष्टचक्रात शेतकरी आणि शेती अडकली होती. अज्ञानी शेतकऱ्यांची लूट करणारे पुरोहित, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे दैन्य वाढले होते. शेतकऱ्यांना सावकाराशिवाय पर्याय नव्हता. मारवाडी, बनिया ब्राम्हण या लोकांना शूद्र, अतिशूद्र जातिविषयी अजिबात सहानुभूती नव्हती. त्यांना कर्जात अडकवून जमिनी हळपल्या जायच्या आणि त्यांना शेतमजूर बनविल्या जायचे! या शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीची वस्तुनिष्ठ मीमांसा महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम केली. शोषणाला वाचा फोडली. शेतकरी चळवळीचे रण पेटले. शेतकऱ्यांना आत्मभान मिळाले.. अन्यायाविरुध्द लढण्याचा नवा मंत्र मिळाला आणि परिवर्तनाचा मार्ग मिळाला. नवी विकासाची दिशा मिळाली.
ज्योतिबा स्वतः एक शेतकरी असल्यामुळे शेतीचे ज्ञान त्यांना होते. शेतीला आधुनिक तंत्र उपलब्ध करण्यासाठी त्यांनी नवीन सूचना दिल्या. पाण्यावाचून शेती होऊ शकत नाही; तेव्हा ठिबक पद्धतीने पाणी देण्याची माहिती द्यावी. शेतीच्या उन्नतीचा पाया ज्योतिबा मुळे रचला गेला. कृषी संस्कृती जागरण ही संकल्पना प्रत्यक्षात ज्योतिबाच्या प्रेरणेतून साकार झाली हे निर्विवाद सत्य आहे.. यावर चिंतन, मनन करून त्यांनी “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहिले.. सामाजिक विषमता जात, धर्म हे निर्मिकाने निर्माण केले नसून मानवाने आपल्या सोयीनुसार तयार केले आहे. गुलामाला गुलामीची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी १८७३ साली गुलामगिरी पुस्तक प्रकाशित केले. अखिल मानवीय एकसंघ समाज निर्माण व्हावा यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मानवाचा खरा धर्म एकच आहे. आणि सर्वांचा निर्माणकर्ता एकच आहे. अखिल मानवते विषयी ऐक्याची जाणीव त्यांनी निर्माण केली. निती हाच मानवाचा धर्म आहे हे सांगणारे फुले तत्वचींतक व्यक्तिमत्व होते!!
“धर्म, राज्य भेद मानवा नसावे,
सत्याने वागावे इशासाठी||
महंमद, मांग, ब्राम्हणांशी|
धरावं पोटाशी बंधुपरी,
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक|
भांडणे अनेक कशासाठी||”
ज्योतिबांनी असे साधे सोपे जीवनाचे तत्वज्ञान मांडले.. हजारो वर्षाच्या परंपरेवर आसूड ओढून स्त्रियांच्या, अस्पुश्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, पुरोग्रामी विचारांना कृतीची जोड देणारे, आधुनिक भारताच्या उभारणीसाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी झटणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे, युगप्रवर्तक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे भविष्याचा वेध घेणारे विचार नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी समाजाला दिशा देणाऱ्या दीपस्तंभासारखे होते.. त्यांच्या विचारांवर उभारलेल्या देशाने आज जी प्रगती केली त्याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला जाते.
संदर्भ: क्रांतीरत्न महाग्रंथ
-निशा नरेंद्र खापरे
नागपूर
ReplyForward |
खूप छान