वारशाची खरी ताकद ओळखायला शिका-डॉ.प्रज्ञा दया पवार
वारशाची खरी ताकद ओळखायला शिका-डॉ.प्रज्ञा दया पवार
गौरव प्रकाशन
नाशिक (प्रतिनिधी) : स्थानिक मायको हॉलमध्ये २६ नोव्हें. २०२३ रोजी पाचवे साहित्यसखी एकदिवसीय राज्य महिला साहित्य संमेलन संपन्न झाले. सदर संमेलनाच्या अध्यक्षा मा.प्रज्ञा दया पवार होत्या. आपल्या परखड व अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थित महिलांना त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, ” लहानपणापासून वेदना,अपमान सारे पाहिले आहे त्यामुळे विद्रोहाचा वारसा माझ्या रक्तातच आहे. आपल्याकडे वाचनाची असोशी असली पाहिजे.
‘मुक्ताबाई चांगदेवांना म्हणतात त्याप्रमाणे घरातील कोनाड्याप्रमाणे स्त्रियांच्या शरीराकडे बघण्याची दृष्टी असली पाहिजे. वेदनेतूनच कविता जन्माला येते. स्त्रियांच्या लेखनावर पुरुषी व्यवस्थेची सेन्सॉरशिप नको. मध्यमवर्गीय स्त्री मानसिकता हा सुद्धा एक तुरुंग आहे. तो भेदता आला पाहिजे.मानवता व समतेची साथ कधीच सोडू नका.स्त्रीलाही सन्मान हवा असतो. विचार व भावना विलग होता कामा नये. जातीपातीच्या भिंती तोडून ‘माणूस’ म्हणून एकत्र येणे गरजेचे. तत्वाशी तडजोड करू नये.मानवतावादी विचारांच्या महापुरुषांचा वारसा आपण जपला पाहिजे.” प्रास्ताविक साहित्यसखी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव यांनी केले त्यातून प्रागतिक विचारसरणी, स्त्री आत्मसन्मान, विवेकवाद, अभिव्यक्ती यासाठी साहित्यसखीची निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंचावर साहित्यसखीच्या सचिव अलका कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार मिलन खोहर ह्या उपस्थित होत्या. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही साहित्य चळवळ अल्पवधीत महाराष्ट्राभर वेगाने लोकप्रिय झाल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, लातूर, भिवंडी, चेंबूर, यवतमाळ, अमरावती, कल्याण, जालना, ठाणे, नागपूर व नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून साहित्यिक महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या.डॉ.प्रतिभा लिखित व डॉ.अरविंदकुमार कांबळे अनुवादित ‘द अनटोल्ड स्टोरीज ऑफ कोव्हिड १९’ ह्या इंग्रजी भाषेतील कथासंग्रहाचे तसेच प्रा.सुमती पवार लिखित ‘अप्रतिम’ ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात डॉ.प्रतिभा जाधव यांनी विनोदी नाट्यछटा सादर केल्या. त्यानंतर प्रा.सुमती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेले कवयित्री संमेलन उत्तरोत्तर रंगत केले. कवयित्री अलका कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत कवयित्री संमेलनाचे सुत्रसंचालन केले तर संपूर्ण साहित्यसंमेलनाचे सूत्रसंचालन आरती डिंगोरे व रंजना बोरा यांनी केले. समग्र साहित्यसखी कार्यकारिणीने संमेलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.