विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्ह्यात शुभारंभ
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यादृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या यात्रेचा जिल्ह्यात आज शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आयईसी (माहिती, शिक्षण व संवाद) व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.
केंद्र शासनाच्या योजनाची जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये सात वाहनाव्दारे नियोजीत कार्यक्रमानुसार आयईसी वाहनाच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देवीदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडगे, बाळासाहेब बायस, पोलिस उपायुक्त विक्रम साळी आदी उपस्थित होते.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम ग्राम व शहरी स्तरावर राबविली जाणार आहे. भारत सरकारच्या एकूण 17 फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी ही मोहिम महत्वाची ठरणार आहे. लोकप्रतिनिधी, लाभार्थी, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.