गझल प्रांतात महिलांचे लक्षणीय प्रमाण – शोभा तेलंग
प्रशांत वाघ
पुणे, (प्रतिनिधी) : गझल हा काय महिलांचा प्रांत नाही. महिलांनी गझलेच्या वाटेला जाऊ नये. गझल ही विधा खूप कठीण आहे. म्हणून गझल महिलांना झेपणार नाही, असे म्हणून सुरवातीला महिलांना हिणवले गेले. परंतु आज गझल प्रांतात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. हे पाहून समाधान वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकारा शोभा तेलंग यांनी केले. गझल मंथन साहित्य संस्था आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीतर्फे सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन, पुणे येथे आयोजित पहिले अखिल भारतीय महिला गझलसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी त्या म्हणाल्या की, अलीकडे गझल लिहिणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. तसेच महिला उत्तम आणि उत्कृष्ट लिहित आहेत, याचा आनंद आहे. तुम्ही सगळ्यांनी एकोप्याने एकमेकांच्या गझला ऐकून, वाचून आणि कौतुक करून पुढे जावे. कुणाचा मत्सर न करता आपण कसे उत्कृष्ट लिहू, याचा विचार करावा. असे म्हणत त्यांनी गझल मंथन साहित्य संस्थेच्या विविध उपक्रमांचे देखील कौतुक केले. स्वागताध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी ह्या महिला गझलकारांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, गझल हे वास्तवाचे काव्य आहे. गझलकाराचे जे काही व्यक्तित्व असते, आणि त्यातून जे काही प्रतीत होते, ते त्याच्या शेरांमधून उतरत असते. आणि जे काही उतरत असते ते कलातत्व असतो. कलाविष्कार असतो. तो उत्कृष्ट शेर असतो. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण म्हणाले, आपण जे लिहितो ते निर्भयतेने लिहिले पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ गझलकारा देवका देशमुख यांना गझलक्रांती पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून म. भा. चव्हाण, उर्मिला बांदिवडेकर, डॉ. संदीप गुप्ते, किरण केंद्रे, प्रमोद खराडे, शाम खामकर, संस्थेचे सचिव जयवंत वानखडे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर आदी उपस्थित होते.
संमेलनात गझल मंथन साहित्य संस्थेचा गझल अमृत दिवाळी अंक आणि गझलयात्री मालिकेतील तिसऱ्या गझलसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन गझलकारा वैशाली माळी यांनी केले.
या संमेलनात दिवसभर मुशायरे रंगले. त्यात देशभरातील नामांकित महिला गझलकारांनी आपल्या गझला सादर केल्या. संगीता जोशी, रत्नमाला शिंदे, श्रद्धा खानविलकर, डॉ. मीना सोसे, सुनीती लिमये, उत्तरा जोशी ह्या ज्येष्ठ गझलकारा मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान भूषविले. तर सूत्रसंचालन प्राजक्ता पटवर्धन, यशश्री रहाळकर, अमृता जोशी, रजनी निकाळजे, सरोज चौधरी आणि विजया नवले यांनी केले.
पहिले महिला गझल संमेलन यशस्वी करण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, पुणे विभाग प्रमुख प्रदीप तळेकर, उपप्रमुख डॉ. मंदार खरे, सचिव वैशाली माळी, पुणे जिल्हाध्यक्ष बा. ह. मगदूम, डॉ. रेखा देशमुख, रेखा कुलकर्णी व पुणे जिल्हा कार्यकारिणीने परिश्रम घेतले. अशी माहिती संमेलनात सहभागी गझलकार सौ मृणाल सुनिल गिते, गझल मंथन साहित्य संस्था अध्यक्ष नाशिक जिल्हा यांनी दिली.