वाळवंटातच तेलांचे साठे का मिळतात ?
हा प्रश्न तितकासा बरोबर नाही कारण तेल केवळ वाळवंटातच मिळतं नाही असं नाही. ते अंटार्क्टिक प्रदेशातही मिळतं तसंच सागरी आखातात किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातही मिळतं. आपल्या बॉम्बे हाय आणि कृष्णा, गोदावरी खोऱ्यातील तेलांचे साठे याची प्रचिती देतात. तरीही वाळवंटात तेल मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत, यात शंका नाही या काही भौगोलिक प्रदेशात ते का मिळतं हा प्रश्न उरतोच.
याची दोन कारणं आहेत तेलाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि ते तयार झाल्या नंतर त्याचे साठे हलवले जाण्याची प्रक्रिया. पहिल्या प्रक्रियेसाठी सूक्ष्मजीव झटपट आणि ऑक्सिजन विरहित वातावरणात गाडले जाण्याची आवश्यकता असते. कारण अशा वातावरणातच त्यांच्यामधले हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामधले बंध शाबूत राहू शकतात, त्यांच्या पासून हायड्रोकार्बन रूपातल्या खनिज इंधनांची निर्मिती होऊ शकते असं वातावरण नद्यांच्या त्रिभूज प्रदेशात तसेच सागरी आखाता मध्ये तयार होत असतं. शिवाय आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचे जे निरनिराळे भूखंड आहेत ते जिथे एकमेकांना भिडतात, तिथल्या फटी मध्येही असं वातावरण मिळतं अशा प्रदेशामध्ये वाहून आलेल्या सेंद्रिय गाळाची आणि त्या सूक्ष्मजीवांची प्रक्रिया होऊन त्यापासून मग हायड्रोजन खनिज इंधनाची निर्मिती होते. ती तिथे साठत जातात या प्रक्रिया अर्थात अतिशय संथगतीने होत असल्यामुळे या निर्मितीला लक्षावधी वर्षांचा काळ लोटावा लागतो.
मध्यंतरीच्या काळात पृथ्वीचे हे प्लेट टेक्टॉनिक्स या नावाने ओळखले जाणारे भूखंड एकाच जागी स्थिर राहत नाहीत. त्यांची सतत हालचाल चालूच असते. त्यामुळे खोलवर भूगर्भात तयार होत असलेले हे साठेही त्यांच्या बरोबर इतरत्र वाहून नेले जातात. त्यांची घनता पाण्या पेक्षा कमी असल्यामुळे अर्थात ते वरवर येत राहतात तरीही ते या भूखंडांच्या पृष्ठभागावर येण्यासाठी त्या भूखंडा मधील फटींची गरज भासते. ही सर्व परिस्थिती जिथे अनुकूल होते तिथे मग हे वर येतात आणि तिथेच मोठ्या प्रमाणावर साचून राहतात. जिथे वाळवंट तयार होतात तिथे किंवा सागरी आखातामध्ये याची शक्यता वाढीस लागते. अंटार्क्टिक प्रदेशातही ते तयार होतात पण तिथून ते दुसरीकडे हलवले जातात आणि वाळवंटामध्ये किंवा त्रिभुज प्रदेशात डोके वर काढतात.
-दिनेश विष्णु ढोले
पुणे
98503 25069