धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना देणार निवेदन
* अमरावती जिल्हा धनगर समाजाच्या बैठकीत निर्णय
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : धनगर समाजाला केंद्र सरकारकडून लागू असलेले अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण लागू व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला जाणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा धनगर समाजाची बैठक स्थानिक सातुर्णा स्थित ममता प्रकाशन येथे ॲड. दिलीप एडतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विधिमंडळावरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय दौरे करून या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला. त्यानुसार तालुकानिहाय निवेदन देण्याचे नियोजनसुद्धा करण्यात आले. या नियोजनानुसार 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता दर्यापूर येथे तर अंजनगाव सुरजी येथे दुपारी दोन वाजता आणि अचलपूर तहसीलदारांना दुपारी चार वाजता निवेदन दिले जाणार आहे.
28 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता चांदूरबाजार तहसीलदार, दुपारी दोन वाजता मोर्शी तहसीलदार तर चार वाजता वरुड तहसीलदार यांना निवेदन दिले जाईल. 29 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता तिवसा तहसीलदार, दुपारी दोन वाजता चांदूर रेल्वे तहसीलदार, दुपारी चार वाजता धामणगाव रेल्वे तहसीलदार यांना निवेदन दिले जाईल.
30 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता नांदगाव खंडेश्वर तहसीलदार तसेच दुपारी दोन वाजता भातकुली तालुका तहसीलदार यांना निवेदन दिले जाणार आहे. निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी नियोजित वेळेत तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन धनगर समाज अमरावती जिल्ह्यातर्फे करण्यात आलेले आहे.