मायेची पाखर घालणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले : सुधीर मुनगंटीवार
मुंबई, : ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते पद्मनाभजी आचार्य यांच्या निधनामुळे ईशान्य भारतावर अखंड मायेची पाखर घालणारे, ईशान्य भारतासाठी जीवनभर झटणारे एक समर्पित व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागालॅंड आसामचे माजी राज्यपाल श्री पद्मनाभ आचार्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की पद्मनाभ आचार्य जुन्या पिढीतील तत्वनिष्ठ आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या मांदियाळीतील वरच्या पंक्तीतील व्यक्तीमत्व होते. अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले पद्मनाभजी यांनी ईशान्य भारताच्या उर्वरित भारताशी एकरूपतेसाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले. “आंतरराज्य छात्र जीवन दर्शन” (SEIL) आणि “माय होम इंडिया” या ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना उर्वरित भारतातील कुटुंबात काही काळ राहून भारतीय सांस्कृतिक एकतेचा अनुभव देणाऱ्या “आंतरराज्य छात्र जीवन दर्शन” आणि ईशान्येतील विद्यार्थ्यांना उर्वरित भारतात शिक्षण देणाऱ्या “माय होम इंडीया” या अभाविपच्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या आणि ५७ वर्षांहूनही अधिक काळ आजही सुरू असलेल्या प्रकल्पांचे ते जनक मानले जातात. ईशान्य भारतातील विविध जनजातींची स्थानिक संस्कृती व परंपरा, विविध जनजातींच्या अनेक भाषा यांचा त्यांचा अभ्यास आचंबित करणारा होता. त्याच ईशान्य भारतात त्यांना एकाच वेळी नागालॅंड आणि आसाम या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम करायला मिळाले. त्रिपुरा, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेशच्याही राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार काही काळ त्यांच्याकडे होता. त्यांनी ईशान्य भारतातील बंडखोरी शमविण्यात आणि तेथील जनजातींना उर्वरित भारताशी जोडून ठेवण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ईशान्य भारताचे प्रभारी म्हणून त्यांनी केलेले कामही इतिहासात नोंदले जाईल असेच ठरले आहे.
आज आम्ही एका पितृतुल्य व्यक्तिमत्वाला मुकलो आहोत. त्यांचे कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. मी आचार्य कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर पद्मनाभजींना सद्गती देवो, असे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.