धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता‘ यांची जयंती. या दिनाचे माहात्म्य या लेखातून जाणून घेऊया.
भावार्थ : ‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.
वैशिष्ट्ये : हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो. साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर योग्य मार्गाने धन कमवून वार्षिक उत्पन्नाचा 1/6 भाग धर्मकार्यासाठी अर्पण करावा.
महत्त्व : या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम 1/6 भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’ – परात्पर गुरु पांडे महाराज
पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.
धन्वंतरी जयंती
धन्वंतरी जन्म : ‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो.’ – आधुनिक वैद्य श्री. राम लाडे
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
यमदीपदान : प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
यमदीपदान सूर्यास्तानंतर करणे म्हणजेच साधारणपणे सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत करणे. याला लाभाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नंतरचा काळ गौण भाग आहे. गौण भाग जरी असला, तरी त्या वेळेत सुद्धा यमदीपदान करू शकतो.
‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्षमिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलन- श्रीमती विभा चौधरी
संपर्क- 7620831487