जादा भाडे दर आकारणाऱ्या खाजगी बस वाहतूकदारांवर कारवाई
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे खाजगी बस वाहतुकदारांनी प्रवाश्यांकडून जादा भाडे आकारणी करु नये, यासाठी नियमित कारवाई करण्यात येते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल दर शासनाने जाहीर केले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रवाश्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतुकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयांना भेटी देऊन तसेच प्रवाशांशी संवाद साधून भाडे आकारणी योग्य होत असल्याची खात्री करण्यात येत आहे. तक्रार करण्याऱ्या प्रवाश्यांनी लेखी अर्जात त्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच तिकिट जोडावे, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
गर्दीच्या हंगामाच्या कालावधीत खाजगी बस वाहतूकदारांनी प्रवाश्यांकडून जादा भाडे आकारणी करु नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. खाजगी वाहतूदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाश्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी तक्रार करावी अथवा हेल्पलाईन क्र. 02262426666 व www.rto.27-mh@gov.in किंवा www.mh27@mahatraanscom.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
(छाया : लोकमत)