माणुसकीचा दीपोत्सव.!
मानवी जीवन प्रगतीचे सामर्थ्य घेऊन आलेले असते. मानव हा एक स्वतंत्र प्राणी आहे .त्याला बंदिस्त जीवन आवडत नसतं. हजारो वर्षांपासूनचा माणूस स्वतंत्र सृजन विचारातून उत्तरोत्तर परिवर्तनाची नवे क्षितिजे पादाकांत करत आला आहे.नव्या प्रकाशाच्या शोधात त्यांनी जीवनाला फुलवले आहे. अंधाराकडून उजेडाकडे मार्गक्रम करून जीवनाच्या ध्येयापर्यंत पोहोचणे याला सम्यक जीवन म्हणतात .
माणूस हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्यांच्या चिंतन व तर्कशक्तीच्या बळावर त्यांनी आपले समस्त जीवन उन्नतीच्या शिखरावर पोहोचले आहे. पण माणसाच्या जीवनात दुःख आहे. त्याला कारण आहे .ते कारण म्हणजे तृषा होय. तृष्णेवर म्हणजेच दुःखावर विजय प्राप्त करायचा असेल तर अष्टांमार्गाचा उपयोग करावा व दुःख नष्ट करावे असे मत तथागत गौतम बुद्धाने मांडले होते.
ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत गौतम बुद्धांनी या जगाला नवाप्रकाश मार्ग दाखवला. माणुसकीचा दीपोत्सव समजावून सांगितला. त्या विचारधनातूनच भारताने व जगाने माणुसकीची नवी फुलबाग फुलवली. कार्यकारणभावाचे नवे तत्त्वज्ञान जगाला दिले .पण आज त्यांचे तत्त्वज्ञान माणूस विसरत चालला आहे. स्वतःच्या महत्त्वकांक्षेपाही जगातील माणसांना दुःखाच्या गर्द काळोखात लोटल्या जात आहे. माणूसच माणसाला गुलाम करत आहे. पण जो गुलाम होणारा माणूस आहे. तो क्रांती करताना दिसत नाही. फक्त काही माणसेच क्रांतीचे पलित घेऊन समाजाला व जगाला नवामार्ग दाखवत आहेत. त्यातून नव्या युगाची नवी प्रेरणा मिळत आहे.
रोज उगवणारी सकाळ नवनवोन्मेषशालीनी असते. प्रासंगिक तेजोनिधिची मंगलप्रभा शांतता व समृद्धी घेऊन येते. त्या मंगलमय प्रभेतून सकल जणांनी आपले अंधार विचार सोडून देऊन समस्त जीवनाच्या प्रगतीसाठी आपले जीवन वेचावे.
भारत देश हा अंधारातून ठेचाळत असताना अनेक दीपस्तंभ क्रांतीच्या प्रकाश देत आहेत.स्वातंत्र्य व प्रजासत्ताकाचा क्रांतीदीपक प्रत्येक भारतीय प्रज्वलित झाला पाहिजे. ज्वाज्वल्य राष्ट्र प्रेमाने प्रत्येक जीव प्रकाशमान झाला पाहिजे. राष्ट्रप्रेमाचा ओजळभर उजेड घेऊन सारा देश माणुसकीच्या दीपोत्सवानी तेजोमय व्हावा. नव्या विचारांचे नवे संकल्प आपण तयार करावे. मनामनातील द्वेषाला हद्दपार करून समतेची नवीन गाणी गावी. माणसाला नव्या भारताची नवे स्वप्ने पडावी .जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा वेध घेण्याची दृष्टी माणसात निर्माण व्हावी. निसर्गातील बदलांचा मागोवा मनुष्यला घेताच आला पाहिजे. प्रा.कार्व्हर एके ठिकाणी म्हणतो की, “जो निसर्गाच्या प्रेमात पडून त्यांच्याशी जवळीक साधतो त्यांच्याशीच निसर्ग गुजगोष्टी करतो. युवकांनो सृष्टी काय शिकवते. इकडे उघड्या डोळ्यांनी.. उघड्या कानांनी.. लक्ष द्या म्हणजे आयुष्यात प्रत्येक दिवशी तुमच्या ज्ञानात अमूल्य माहितीची भर पडेल. निसर्गाशी तादात्म पावल्याखेरीज त्यांची रहस्य कळत नसतात. तुम्ही बँकेत किती माया जमवली आहे. तुम्ही पोषाक कसा करता हे तुमच्या यशाचा गमक मानू नका .तुम्ही समाजाची किती व कशी सेवा करू शकाल यावर तुमच्या आयुष्याची सार्थकता अवलंबून आहे.” हे विचार माणुसकीचा दीपोत्सव निर्माण करण्यासाठी अत्यंत क्रांतिकारक आहेत. आपल्या मनाला उत्तुंग भरारी देऊन नव्या विजयाचे गीत गाण्यासाठी आपण तयार व्हायला हवे. पण आज ही परिस्थिती दिसून येत आहे.
कारण आज सारे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अंधाराची नवी पोकळी निर्माण झाली आहे. प्रकाशाच्या साऱ्या वाटा बंदिस्त केल्या जात आहे. मानवी जीवनाला उध्वस्त करण्यासाठी अनेक षडयंत्र रचले जात आहेत. देव ,धर्म ,जात ,भाषा, पंथ ,वंश यांच्या वर्चस्ववादी विचारातून समतेचासूर्य अंधकारमय युगात चाचपडत आहे. अशा अंधकारमय लंबवर्तुळकार युगात विकृतीने मानवासमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. नव्या वाटा प्रकाशमान करण्याचे, अंधाराचा अस्त करून उजेडाची नवी लिपी खोदण्याचे काम माणसाचे आहे.
मुजोरवृत्तीच्या विचाराला जमीनदोस्त करून मानवी जीवनाला नवे उन्नयन देणाऱ्या विचाराची आज गरज आहे .हे जीवन बुद्धाच्या ज्ञानातून प्रचलित व्हावे. कारण त्यांना मानवी दुःखाच्या अंधकाराचा नाश करण्यासाठी नव्या प्रकाशचा मार्ग दाखवला आहे. अशा महाप्रज्ञावान ऊर्जेची आज जगाला अत्यंत आवश्यकता आहे.
माणसाने आपली माणुसकी न सोडता जगाचे कल्याण कसे होईल याच विचारातून स्नेहबंध निर्माण करावा .मानवी जीवनाला सदोदीत प्रज्वलित ठेवावे .दारिद्र्य अन्याय ,विषमता ,दंगल ,जाळपोळ, लुटालूट, विटंबना अशा विविध बाबींना मुठमाती देऊन सकल मानवाच्या प्रगतीच्या नव्या लोकशाहीच्या सूर्योदय करात घेऊन सारा देश माणूसमय करावा. जातीभेताच्या, विषमतेच्या, धर्मांधतेच्या भिंतींना उध्वस्त करून संविधानसूर्याची प्रकाशउर्जा घेऊन आपल्या जीवनाला फुलवावे. कारण ,
“जीवन एक संघर्ष आहे
जीवन एक पाठशाला आहे
जीवन एक महायुद्ध आहे
जीवन एक बुद्ध आहे …”
आपण आपल्या सभोवतालच्या अंधार नाहीसा करण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनातील अज्ञानअंधकाराचा नायनाट केला पाहिजे. माणुसकीची पाठशाला निर्माण करून मानवतावादाची पेरणी सातत्याने केली पाहिजे. तेव्हाच धरतीवर माणुसकीचे नंदनवन निर्माण होऊ शकते.
दीपत्वाच्या प्रकाशात न्हाऊन निघताना सारे वाईट विचार जळून जावेत .तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा जोतीराव फुले , राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा यांच्या विचारधानातूनच समतेचा सूर्य आपण करात घ्यावा. काळोख पेरणाऱ्या प्रवृत्तीवर समतेच्या सूर्याची प्रखरता प्रज्वलित करून त्यांना भस्म करावे. नव्या मानवाच्या निर्मितीसाठी स्वतः दीपत्वाची ज्योत व्हावे. अखंड तेजोनिधितून नवा प्रकाश पृथ्वीतलावर पसरत राहावा. दुःख, वेदना, आक्रोश नष्ट व्हाव्यात. धम्म विचारांची नवी सकाळ व्हावी. माणसाच्या मनाला लागलेले अज्ञानाचे ग्रहण दूर करून नव्या स्वयंदीपाच्या शोधात पुढे जावे. दीपत्वाच्या नव्या पर्वातून नव्या सुजनाची निर्मिती करून मानवतेचे बंध घट्ट व्हावे. अमानवतेच्या प्रवृत्तीवर वार करून नव्या विश्वाचे नवे रेशिमबंध जुळावे. मानवाच्या जीवनात नव्या आकांक्षा निर्माण व्हाव्या. काळोख साम्राज्यवर माणुसकीचा दीपोत्सव उजळून यावा.नव्या विचाराची नवी प्रभा जगात निर्माण व्हावी.
“चला सारे मिळून एक गीत गाऊ.
माणुसकीच्या दीपोत्सवाचा प्रकाश मनी पेरू.
विसरून सारे भेद एक होऊ .
जगात माणुसकीचे नवे नंदनवन फुलवू.
पर्वताना दूर सारून मानवाना आत घेऊ
क्रांतीसूर्याचा दिशादर्शक विचार मनी रूजवू.
माणुसकीचे नवे विहार जगतात निर्माण करू….”
– संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००