दिवाळी भेट….
हॉटेलात जेवायला आमच्या समोरच बसलं होतं ते वृद्ध जोडपं.सांपत्तिक स्थिती बेताची असावं असं त्यांच्या एकूण राहणीमानावरून वाटलं. कारण ऐन दिवाळीचे दिवस असूनही अगदी साध्या,धुवट कपड्यात होते दोघेजण. दोघंही कृश म्हणावीत अशा अंगकाठीची.दोघांच्याही वयाने ऐशीचा उंबरा पार केला असावा. त्यातल्या आजींना चालायचा त्रास असावा.कारण आजोबांनी त्यांना हात धरून आणलं होतं.
गर्दी असल्याने दोघंही आमच्या शेजारी, हॉटेलबाहेरच्या कट्ट्यावर आपला ‘नंबर’ लागायची वाट बघत बसली होती,पण तेही तिष्ठत बसायला लागल्याची एकही अठी कपाळावर न पाडता..! “फार दिवसांनी एकमेकांना भेटल्यासारख्या त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या.” हॉटेल मालकाने पहिलं टेबल रिकामं झाल्या झाल्या त्यांना आत बोलावलं. हॉटेलची पायरी चढताना प्रेमाने आजींना आधारही दिला.
थोड्याच वेळात त्यांच्या वयाला शोभेल असं मोजकंच जेवून ते उठायला लागले.आजोबांनी बिल किती झालं विचारलं.तर मालक म्हणाले, “आज तुम्ही पैसे द्यायचे नाहीत आजोबा.दिवाळीनिमित्त आमच्यातर्फे पार्टी समजा.”
मला तर हे अनपेक्षित होतंच पण आजोबांनाही अशी काही अपेक्षा नसावी. त्यांच्या चेह-यावरचं आश्चर्य लपलं नाही.ते म्हणाले, “अहो,कशाला असं करता? संकोच वाटतो हो..” हॉटेल मालक म्हणाले,”अजिबात संकोच करू नका.*तुम्ही दोघं किती वर्ष येताय आमच्याकडे. आजींना किती सांभाळून आणि प्रेमाने घेऊन येता.मस्त गप्पा मारत जेवता.छान वाटतं हे बघायला..आणि मी नेहमी म्हणतो का असं? आज माझ्या आजोबांना पार्टी दिली असं समजा.नकार देऊ नका प्लीज.”
त्यांच्या बोलण्यातली सच्चाई, जिव्हाळा पोचला आजोबांपर्यंत.खिशातून बाहेर काढलेले पैसे पुन्हा ठेवून देत ते आजींच्या कानाजवळ जात बोलले, “अगोsss,पैसे घेतले नाहीत हो आजच्या जेवणाचे. दिवाळीची भेट म्हणतायत आपल्याला…” आजीही चकित झाल्या.हॉटेल मालकाकडे पाहत आजोबांना म्हणाल्या,”काय सांगताय काय…!?”
“आजी,आज तुम्ही आमचे पाहुणे आहात.फक्त आशीर्वाद द्या आम्हाला..” असं म्हणत पत्नीसह हॉटेलमालकांनी वाकून नमस्कार केला.ती दोघं या अनपेक्षित आदरातिथ्याने भारावून गेली. आशीर्वादाचा हात त्या दोघांच्या डोक्यावर ठेवला.
खूप छान वाटलं,त्रयस्थ म्हणून हा प्रसंग अनुभवताना. एका सर्वसामान्य ग्राहकाबद्दल हॉटेलमालकाने दाखवलेली आपुलकी स्पर्शून गेली मनाला. अवतीभवती इतकं काही विपरित घडत असतानाही,चांगुलपणा अजून खूप शिल्लक आहे या जगात.यावरच्या माझ्या विश्वासाला नवं बळ मिळालं त्या दिवशी.
या दिवाळीची सगळ्यात सुंदर भेट…!