नमो ‘नमा’
प्रा. न.मा. जोशी पत्रकारितेतील एक नामवंत नाव. गेली ४५ वर्ष न.मा. जोशी हे नाव अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या लेखणीमुळे गाजत आहे. न.मा. जोशी यांच्या लिखाणातील माहितीचा धबधबाच वाचकांवर मनसोक्त आदळत असतो तो सर्वांनाच सोसतोच असे नाही. अशावेळी शास्त्रीय गायनात काही कळो न कळो माना डोलावल्या जातात तसं काहीसं अनेकांच्या बाबतीत सरांच्या लेखनाबद्दल होतं तथापि, प्रा.न.मा. जोशी यांचे बहुतांश लिखाण अत्यंत सहजसुलभ असतंच असतं. अत्यंत माहितीपूर्ण लिखाणाचा खजिना असलेलं नमा यांचं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रात व्यतीत झालेलं असलं तरी त्यांची ओळख एक उत्कृष्ट पत्रकार आणि विनामुखवट्याचा माणूस म्हणून प्रचलित आहे. माणसं आणि मुखवटे यांचं आताशा एवढं घट्ट नातं बनलय की माणूस कोणता आणि मुखवटा कोणता हेच कळत नाही. तसा प्रत्येकच माणूस मुखवटा घालूनच मिरवत असतो. मुखवट्यालाही कळणार नाही एवढ्या बेमालूमपणे माणूस मुखवट्याला वापरत असतो. आपण जे नाही ते जगाला दाखविण्याचा प्रयत्न या सर्व खटाटोपामागे असतो. काही-काही माणसं तर तहहयात मुखवटेच धारण करून असतात अशा माणसांना कालांतराने स्वतःचाच शोध लागत नाही.
प्राध्यापक न.मा. जोशी हा माणूस मुखवट्यापलीकडचा जसा आहे तसा त्याला जे आवडतं त्याच वाटेवर चालणारा. मग त्याबद्दल कोणी काहीही बोलो कितीही बोलो, नमा सरांना फरक पडत नाही. माझं आणि नमा सरांचं गेल्या ४०-४५ वर्षांचं घट्ट नातं. या नात्याला नेमकं कोणतं नाव द्यावं हे आणखीनही ठरलेलं नाही. तशी वेळही आली नाही कारण नातं हे ठरवलं जात नसतं ते जपल्या जात असतं आणि अशी जपलेली नाती ही निरपेक्ष नाती या सदरात मोडतात. त्यामुळे ती ‘ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी’ या सदरात मोडत नाहीत. नमा सर यांची आणि माझी पहिली ओळख त्यांच्या पत्रकारितेच्या सुरुवातीपासूनच आहे. त्यांची आणि माझी पत्रकारिता अशी मागेपुढे असावी. दारव्ह्याच्या साप्ताहिक आत्मबलमध्ये मी पुसदचा वार्ताहर असताना नमा सरही आत्मबलमध्ये यवतमाळमधून लिखाण करायचे. त्यानंतर तरुण भारत आणि लोकसत्ता या प्रतिष्ठित वृत्तपत्रात नमा सरांनी वर्षानुवर्ष आपली लेखणी झिजविली. नमा सरांची वार्तापत्रे वृत्तपत्रांना प्रतिष्ठा देऊन जात.दैनिक मतदारमधील त्यांचं ‘नमाक्ष’ नावाचं सदर असंच गाजलं होतं.पत्रकार म्हणून नमा सर यांचं नाव खरंच खूप मोठं असून त्याहीपेक्षा एखाद्याला त्याला हिंदीत ज्याला ‘ शिशे मे उतारना’ म्हणतात त्या कलेत तर सर पारंगत आहेत. अल्पशा भेटीत ते समोरच्या माणसाला अल्पावधीत गुंडाळून टाकतात.त्यांच्या पुढ्यात आलेला कितीही प्रभावी माणूस नमा सरांना भेटताच पार पुडका होऊन जातो याचा प्रत्यय मला आलेला आहे.
किस्सा तसा यवतमाळचा.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी एक मनोहर पंत जोशी विरोधी पक्षनेते म्हणून यवतमाळात आले असतांना पत्रकारांचा गोतावळा जमला.पत्रकारांच्या समूहाने पंतांचा हाका करून प्रश्नांची सरबत्ती केली. त्या गोंधळ-गोंगाटात पंतांनी थातूरमातूर उत्तरे देऊन स्वतः ची सुटका करून घेतली खरी,परंतु कोणत्याही पत्रकाराला त्याला जे हवे होते ते काही मिळाले नाही. सुटकेचा श्वास घेत पंत लाल दिव्याच्या गाडीत बसले तेवढ्यात नमा सर गाडीजवळ पोहोचले आणि त्यांनी पंतांना काय सांगितले कोण जाणे! पंतांनी चक्क त्यांना स्वतः सोबत गाडीत बसवून घेतले आणि नेरपर्यंत त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या .जे पत्रकारांच्या अख्ख्या मतदारसंघाला जमले नाही ते यवतमाळ ते नेर या मार्गात नमा सरांनी त्यांना जे हवे होते ते मिळवले. दुसऱ्या दिवशी पंतांची अर्ध्या पानाची मुलाखत प्रकाशित होताच यवतमाळच्या पत्रकारितेची उंची महाराष्ट्राने मापली. अनेक मंत्री नमा सरांशी जवळीक राखून असत. त्यांचा सल्लाही घेत हे सर्व जोपासत असताना नमा सरांच्या पत्रकारितेचे कधी राजकारण झाले नाही अर्थात सरांच्या बेधडक लिखाणामुळे पत्रकार जगतात जळतनाच्या साथीचा उपद्रव मात्र त्यांना सहन करावा लागत असे.
कापसावरील लाल्या असो की राजकीय गव्हातील सोंडे नमा सरांची लेखणी सडेतोड चालत असते. पत्रकारितेतील एकांडा शिलेदार म्हणूनच त्यांची उभी कारकीर्द गाजली. तळपत्या लेखणीची धार कशी असते हे नमा सरांनी दाखवून दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रात रमलेल्या नमा सरांनी कधीही आपले संबंध ज्यांच्याशी आहेत त्यांच्याशी कधीच दुरावा केला नाही. दर्जा राखणारा पत्रकार म्हणून सरांची ख्याती असून संवेदनशीलतेच्या प्रांतातील रहिवासी असणाऱ्या नमा सरांनी कधी कुणाला दुखावल्याचे ऐकिवात नाही. अत्यंत संवेदनशील आणि ज्याला आपलं मानलं त्याच्याशी नातं निभावणारा, नवनवीन नातेसंबंध जोडणारा माणूस म्हणून नमा सरांना डॉ. व्ही एम पेशवे सामाजिक संशोधन संस्थेच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज इथे सहा नोव्हेंबरला आयोजित एक दिवसीय राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेत हा पुरस्कार दिल्या जाणार आहे.
ही अत्यंत आनंदाची आणि ज्यांच्या खात्यात नमा नावाचे बॅलन्स आहे त्यांच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. सरांच्या आयुष्यभराच्या प्रवासात त्यांच्या सौभाग्यवती आणि आमच्या ताई सौ.चंदन जोशी यांचा सिहिंणीचा वाटा आहे. सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
ॲड्. दिलीप एडतकर
संपादक