झाकलेल्या गोष्टीतील कुतूहल…
आपली भारतीय संस्कृती अतिशय उत्तम आहे.. आहार ,सण यामधे प्रचंड वैविध्य आहे.. आपलं शास्त्र उत्तम आहे पण प्रचंड प्रमाणात अज्ञानही आहे .. प्रचंड प्रमाणात लोक संस्कृती , संस्कार , लोक काय म्हणतील यात नको तितके जखडले गेल्याने हव्या असलेल्या आणि आयुष्यातील महत्वाच्या गोष्टीवर आपण भाष्य करत नाही.. यात अनेक उच्चशिक्षीत मंडळीही आहेत..
जे झाकुन ठेवायचय ते झाकायचच आहे पण ते वस्त्रानी .. विचारांनी ते उघडं करायलाच हवं हा विचारच आपल्या मानसिकतेत डोकावत नाही .. मी लैगिकतेवर काम करत असताना किवा लिहीत असताना .. काउन्सिलींग करत असताना ही गोष्ट इतकी प्रकर्षाने जाणवते की असं वाटतं की पुढील हजारो वर्षे या मानसिकतेत बदल व्हायचा नाही.. कधीकधी माझ्री चिडचिड होते.. लोकांच्या मागासलेपणाची किव येते.. चोरुन माझ्याशी संवाद साधताना त्यांना इतके सारे प्रश्न पडलेले असतात की त्यावेळी वाटतं, अरे तुम्ही व्यक्त का होत नाही ??.. यात वाईट काहीही नाही.. किती तरी गोष्टी कित्येक लोकांना माहीत नाही तरीही त्यांना त्या जाणुन घ्यायच्या नाहीत .. अनेक पुरूष माझ्याकडे व्यक्त तरी होतात पण स्त्री एकही नाही हे तर अजूनच विशेष .
बायको समाधानी आहे की नाही हे कसं ओळखायचं मॅम ??. हा प्रश्न अनेकजण विचारतात.. ती समाधानी आहे की नाही हे तिनेच त्याला सांगावं… दोघांनी एकमेकांशी बोलावं तरच या प्रश्नाचा उलगडा होइल.. म्हणुनच लैंगिकतेचा अभ्यास हवा.. त्यासाठी वाचन हवं.. जाणुन घ्यायची तयारी हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला बदलवायची तयारी हवी..
मला रोज सेक्स हवा बायको देत नाही हाही सगळ्याचा कॉमन प्रश्न .. मला कळत नाही , बायको मशीन आहे का ??.. तिलाही भावना आहेत , मन आहे, रोज हवं असणं ही मुळात शरीराची गरजच नाही… तो सगळा मनाचा खेळ आहे.. मी म्हणेन तसं बायकोने केलं पाहिजे ही पुरुषांची विकृत मानसिकता बदलणं गरजेचं आहे.. ती उपभोगाची वस्तु नाही तर एक निसर्गाची सुंदर कलाकृती आहे.. प्रेम ,काळजी , आदर , मैत्री याचा खळखळणारा झरा आहे ..
काउंसीलींग करत असताना अजुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्याकडे असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन नसलेल्या गोष्टीत जास्त लक्ष दिलं जातं आणि ती व्यक्ती आनंदी रहात नाही.. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या आठवड्यात एक काउंसीलींग केलं तर त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की माझं लिंग वाकडं आहे त्यामुळे मला माझ्यात काहीतरी कमी जाणवते.. त्यांना एक मुलगा आहे.. उत्तम व्यवसाय आहे.. छान पर्स्नॅलीटी आहे.. सुंदर चेहरा आहे मग जे फक्त त्यालाच दिसणार आहे त्यासाठी एवढा आटापिटा का ??.. कोणाचं काय तर कोणाचं काय..
ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा असलेल्या गोष्टीवर अजुन काम करुन अजुन स्वतःला घडवण्यात जास्त शहाणपण आहे.. सोच बदलो.. देश बदलेगा..
– सोनल गोडबोले