परवा खोतवाडीच्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानिमित्ताने समाजात उमटलेले प्रतिबिंब न्याहाळताना… असे व्हिडिओ किंवा अशा बातम्याचे मथळे पाहिले की अंतर्मुख व्हायला होतं. आणि मग अनेक तर्क वितर्क, शिव्या शाप, पोलिसीखाकी, घराण्याची बदनामी, लेकासुनेवर कार्यवाही व्हावी इतपत सामाजिक दडपण, इ. असे एक ना अनेक चर्चा करत विविध समाजसुधारक जागे होतात आणि प्रत्येकजण आपल्या पद्धतीने शक्कल लढवतात. खरंतर अशा घटना घडायलाच नको हेही तितकच खरं आहे. परंतु घटनेची अगोदरची पार्श्वभूमी अथवा त्या घरातली वास्तव परिस्थिती कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. ही एक पुढारलेल्या समाजातील शोकांतिका म्हणावी लागेल फार वर्षांपूर्वी सासुरवास नावाचा डंख समाजामध्ये खोलवर रुजला होता. त्याची पाळेमुळे एवढे खोलवर रुजले होते की अगदी अनेक समाजसुधारकांची आणि साधुसंतांची देखील या त्रासातून सुटका झाली नव्हती. अज्ञान, अंधश्रद्धा आणि परंपरा यात गुरफटलेल्या स्त्रिया बाहेर पडायला अनेक शतके गेली. समाज प्रबोधन, शिक्षण याने मोठा फरक पडला परंतु सरते शेवटी शारीरिक, मानसिक अत्याचारातून सुनेला संरक्षण देण्यासाठी शेवटी कायद्याला पुढे यावे लागले. हे तर आपण सगळेच जाणतो.
यानंतर बदललेली परिस्थिती थोडीफार सुखावह गेली. थोडाफार कालावधी आदरयुक्त धाकात का असेना पण घरा-घरात समाधान निर्माण झाले. तुरळ ठिकाणी असेल ही सासरवास. पण बऱ्यापैकी समाज सुधारला, स्त्रिया शिकल्या त्यामुळे घराघरात सुसंस्कृत वातावरण निर्माण झालं. थोडाफार कालावधी हाही गेला आणि नंतर..मध्यंतरी पुन्हा अगदी उलट परिस्थिती निर्माण झाली. आणि सासू-सासऱ्यांना छळ होऊ लागला. मुलं आई-वडिलांना सांभाळत नाहीत, सुनेकडून अत्याचार होतो, अशा मथळ्याखाली अनेक बातम्या पेपर मध्ये येऊ लागल्या. अनेक उच्चभ्रू कुटुंबात देखील ही परिस्थिती सध्या उद्भवत आहे. आणि पुन्हा नवीन कायदा सरकारला करावा लागला ज्यामध्ये मुलांनी आई-वडिलांना सांभाळणं हे सक्तीचे केले गेले.
खरंतर कौटुंबिक नाते संबंध दृढ विश्वासाने आणि तितक्याच प्रेमाने,जिव्हाळ्याने,आपुलकीने जपले जावेत. हे सांगायला भारतासारख्या अति प्राचीन संस्कृती असणाऱ्या देशात कायदा करावा लागतो हीच मोठी शोकांतिका आहे. मुलांना मोठे करण्यासाठी आई-वडिलांनी अतोनात कष्ट केलेले असते. जे कष्ट मला पडले ते माझ्या मुलाला पडू नये यासाठी प्रत्येक गोष्टीत अति आत्मीयतेने विचार केलेला असतो आणि प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देण्याचा आटोकाठ प्रयत्नही आई-वडील करीत असतात. परंतु मूले वाढवत असताना मुलांवर आई वडील यांच्याकडून होणारा प्रत्येक संस्कार हा म्हातारपणीची पुंजी बनून राहत असतो, हे आई वडीलांनी विसरून चालणार नाही. तो संस्कार कसा होतो? कोणत्या परिस्थितीत होतो? हे मुले जवळून अनुभवत असतात हेही आई-वडिलांनी लक्षात घ्यायला हवं.
काही वर्षांपूर्वी डॉक्टर दांपत्यांचा मृत्यू हा चर्चेचा विषय झाला होता. कारण त्यांची डॉ मुले परदेशी असूनही त्यांची झालेली परवड ही बातमी तुम्ही आम्ही सगळेच जाणता. खरंतर कोणत्याही घरामध्ये नातं कसं सांभाळलं जावं हे सांगण्याची वेळच येऊ नये. वयस्कर लोक हे वय परत्वे हेकेखोर, हट्टी झालेली असतात. डोमिनेटिंग स्वभाव असेल तर मात्र तिथे समुपदेशनाची किंवा वैद्यकीय उपचाराची नक्कीच आवश्यकता असते. कारण खूप कमी वयस्कर प्रगल्भ असतात.
मान्य आहे लेकाने सुनेने त्यांना संभाळलेच पाहिजे ही त्यांची नैतिक जबाबदारीच आहे. मात्र नाहक मानसिक त्रास अथवा जाणीवपूर्वक समाजामध्ये लेका सुनेची वेगळी प्रतिमा तयार करणारी वृत्ती असेल तर मात्र हा त्रास घरापुरताच मर्यादित न राहता सामाजिक होऊन जातो. म्हणूनच वरील प्रमाणे व्हिडिओ अथवा मथळ्याना उचलून धरणाऱ्या तरुण पिढीने, अथवा समाज प्रबोधकांनी लेका सुनेचे प्रबोधन करताना कधीतरी वयस्कांचेही प्रबोधन करायला हवे. कारण जशी टाळी एका हाताने वाजत नाही तशी नाण्याची एकच बाजू गृहीत धरून चालत नाही. भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. संस्कृती ही कुटुंबापासूनच जपली गेली पाहिजे.
- -सौ. आरती अनिल लाटणे
- इचलकरंजी