कांदयान केला वांदा.!
एका कांदया वरून फक्त
राज्या तुही माही झाली
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
भाव कांदयाचे वाढले
म्हटलं वाया नको घालू
रागातचं तिनं मले
फेकून मारले आलू !!
माह्या घराची राज्याहो
देशाची संसद झाली
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
गॅस, सोनं, पेट्रोल भावं
म्हणे आभायाले भिळले
शेतकऱ्यांईच्याच पिकाचे
सांगा भावं काहून पळले ?
माह्या घरामंदी भाऊ
अशी विरोधी पार्टी आली
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
नका एक किलो आणू
कांदा अर्धा किलो खाऊ
सुखी होऊ द्या ना जरा
माह्या शेतकरी भाऊ !!
कांदा, लसणा पाई
सांगा आग काहून झाली
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
पाळले सोयाबीन भावं
तेलं बाहेरून आणता
घरचीले ठेवता नागडी
बाहेरचीले चोळी शिवता !!
सांगा पाटील तुमची
लाज, सरम, कुठी गेली
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
उळत उळत माह्या
कानावर आलं होतं
कांदयापाई म्हने राज्या
सरकार पळल होतं !!
असा कांदयान केला वांदा
बंडी माही उलार केली
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
दादा त्याचं असं झालं
मी खरं खरं सांगतो
चुकलं अशील काही
मी माफी बी मांगतो !!
शेतकऱ्याचीच लेकं ति
तिची काय चुकी झाली ?
रागातच बायको माही
माह्य घर सोडून गेली !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556