गाडगेबाबांचे श्रद्धास्थान नागरवाडी येथे ३० ला भजन संध्या
अमरावती(प्रतिनिधी) : निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांचे अंतिम श्रद्धास्थान असणाऱ्या नागरवाडी येथे सोमवार ३० ऑक्टोंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध गायिका मयुरी बेन सोनी यांच्या भजन संध्या चा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिसरातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. निष्काम कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या अभिवचनाप्रमाणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील संतोष झुंझुनवाला चॅरिटेबल ट्रस्टच्या सहभागातून मेळघाटमधील माखला येथे आदिवासी बांधवांकरिता वस्त्रदानाचा कार्यक्रम रविवारी २९ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुंबई येथून गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट दादरचे प्रशांत देशमुख, श्रीमती सीतादेवी झुंजूझुनवाला, संजय झुनझुनवाला, संदीप झुनझुनवाला, सारिका झुंझुलवाला यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत.
याचबरोबर गाडगे महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुंबईत रुग्ण सेवा करणाऱ्या तसेच आपल्या गायनाच्या माध्यमातून गाडगे महाराजांचा विचार अधिक व्यापकपणे नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रसिद्ध गायिका मयुरी सोनी ह्या सुद्धा गाडगे महाराज यांचे अंतिम श्रद्धास्थान असणाऱ्या नागरवाडी येथे येणार आहेत. नागरवाडी येथील आश्रमातील मुला मुलीं समोर तसेच नागरिकांसमोर ते बाबांची विविध गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.