डालड्याचा डब्बा..!
दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.
तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र……!
एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची….!
डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी” नावांच कांही परिमाण समोर आलेल्या अन्न पदार्थांची मजा घेत चवीने खायच्या ऐवजी त्याचा विचका करायची “Diet Consciousness” चिकित्सा संपूर्णपणे अपरिचीत होती त्यामुळे सणासुदीला डालडांत तळलेल्या टम्म पुऱ्या आणि घरच्या दह्याचा (मलमलच्या फडक्यांत बांधून रात्रभर लोंबत ठेवललेली ती गठडी…) चक्का बनवून त्यांत साखर, केशर, वेलची, जायफळ आणि चारोळ्या घालून तयार केलेलं अस्सल श्रीखंड – पुरीच जेवण हादडून सगळी मंडळी दुपारची मस्त ताणून देत असत…तब्येतीत जगत असत.
शाळेतल्या सहलीला जातांना सकाळी लवकर उठून आई बटाट्याची पिवळी भाजी, डालडात तळलेल्या पुऱ्या आणि एका छोट्या डबीत घातलेलं लिम्बाच लोणच असा डबा तयार करायची … त्याच्या वासानेच सकाळी सकाळी सातच्या आत भुकेचा लोळ पोटांत उठायचा….!
दिवळींत घरांतले मोठ्ठाले डबे भर भरून मेसुरपाक (कां म्हैसूरपाक ) , कडक बुंदीचे लाडू , जिलेबी वगैरे पदार्थ सर्रास डालडा वापरून बनवले जायचे आणि ते छान लागायचे….हे खाऊन कुणाच बेली फॅट वगैरे वाढल्याच्या तक्रारी कधी चुकुनही ऐकलेल्या नव्हत्या ना कधी ‘डालडा खाऊ नका हो… मराल’ !! असा कुठल्या डॉक्टरने धमकीवजा सल्ला दिला होता….थोडक्यांत काय डालडा हा खाद्य जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता.
१९३० साली प्रथमच तुपाला पर्याय म्हणून हे Hydrogenated Vegetable Fat डच व्यापारी भारतांत घेऊन आले….हळूहळू त्याचा प्रसार होऊ लागला कारण भारतांत तूप न परवडणारी जनता तेंव्हाही अस्तित्वांत होती. डाडा अॅण्ड कंपनी नामक एका डच कंपनीकडे ह्याचे सगळे व्यापारी हक्क होते…..ह्या वस्तूला हिंदुस्थानात जबर मागणी असणार आहे हे ओळखून त्यावेळच्या Lever Brothers ह्या कंपनीने Hindustan Vanaspati Manufacturing Company नांवाने एक कंपनी सुरु करून Hydrogenated Vegetable Fat भारतातच बनविण्यासाठी मुंबईच्या शिवडीला एक कारखाना टाकला. डाडा अॅण्ड कंपनीकडून सगळे हक्क विकत घेतले पण डाडा कंपनी आपलं नाव Product Brand Name मध्ये असावं म्हणून अडून बसली तर Levers आपल्या नावांतल “L” अक्षरावर अडून बसले शेवटी Da Da च्या मध्ये L घालून DALDA (डालडा) हे सोपं सुटसुटीत Brand Name तयार झालं आणि १९३७ सालापासून सर्वसामान्य भारतीयांच्या खाद्य जीवनांत डालडा येऊन बसला तो कायमचा…!
अजूनही डालडाच अस्तित्व आहे पण त्याची पूर्वीची ती शान राहिलेली नाही. हल्ली डालडाला वनस्पती ऑइल म्हणतात.. प्लास्टिकच्या थैलीत तो मिळतो….डालडाचा तो प्रसिद्ध पत्र्याचा दंड गोलाकृती पिवळ्या रंगाचा डब्बा हल्लीच्या पिढीला माहितही नसणार. त्यामुळे त्याचे दिवळीतले महत्व सुद्धा आता इतिहास जमा झाले आहे.
रेडिमेड कपड्यांसारखे रेडिमेड लाडू करंज्याची पार्सलं दादरच्या रानडे रोडवर, दिवाळीच्या मोसमांत ठायी ठायी मिळतात. अगदी अमेरिकेत सेटल झालेल्या लेकरांना ही पार्सलं घरपोंच मिळण्याची व्यवस्था सुद्धा अगदी सहजी होते. अमेरिकेतली पिढी त्यालाही घरचा फराळ मानून धन्य आहे ही त्यांतली जमेची बाजू.. !
एरवी घरांतल्या आया-बहिणीने अपार कष्ट करून बनवलेल्या फराळाला असलेली त्यांच्या हाताची चव, त्यांच्या मायेचा, प्रेमाचा आपुलकीचा दरर्वळ, त्यांतली स्निग्धता ती कशी काय एक्सपोर्ट करणार ? असो.. जे कांही शिल्लक आहे तेही नसे थोडके.. बाकी सारे कालाय तस्मै नम: