फसवणूक..
“अहो, संकेत काय म्हणतोय एकलं का?” रमाने आपल्या नवऱ्याकडे पाहून विचारले.”
पेपर वाचण्यात दंग असलेल्या मनोहरने डोके वर न करताच विचारले, “काय म्हणतोय तुमचा लाडोबा?”
“इथल्या पेक्षा तिथे परदेशात चांगली नोकरी मिळतेय, तिथे जायचं म्हणतोय”
“हां! असे अचानक! काय रे, इथे नोकरी करणार होतास ना? टाटा कंपनीतून बोलावणं आलं म्हणून सांगत होतास ना? मग हे खूळ कसं बरं आलं?”
“बाबा, इथे फार स्कोप नाही हो. इथे जे कमवायला दहा वर्षे लागतील ते मी अमेरिकेत दोन वर्षात कमवेन.”
एवढ्यात संकेतच्या बाबांचे मित्र, सुरेश आले. “काय रे काय एवढा वार्तालाप चाललाय? घरात शिरताच त्यांनी विचारले.
सुरेश आणि मनोहर बालमित्र. शाळा, कॉलेज आणि नोकरी सुध्दा दोघांनी एकाच कंपनीत केली. दोघांनी ठरवून पुण्यात आपली घरे ही जवळ जवळ घेतली. दोघांच्या बायका मात्र वेगवेगळ्या प्रदेशातल्या. एक कोकणातली मराठमोळी तर सुरेशची गुजराथी. एक झूणका, कांदा, भाकर तर दुसरी उंदियो, थेपला. मनोहरचा ‘संकेत’ तर सुरेशची ‘तनया’. दोघा मित्रांची घरे वेगळी असली तरी एकाच घरासारखे वागत होते. ते त्यांच्या बायका मुलांना ही आवडत होते. एवढ्या घरोबा आणि आपुलकीमुळे दोन्ही घरच्यांनी मैत्रीचे रुपांतर नात्यात करायचे ठरवले होते व ते बायका मुलांना ही पसंत होते. संकेत व तनयाची ही लहानपणा पासून मैत्री होती.
वर्षे भरभर जात होती. मुले ही मोठी झाली. त्यांच्या शिक्षणाच्या वाटा ही बदलल्या. संकेत तनयाच्या मित्र मैत्रिणींचा घोळका ही वाढला. तनयाला शिक्षणात जास्त रस नव्हता आणि तिची बुध्दिमत्ता ही थोडी कमीच होती. बऱ्याच वेळा अभ्यासावरून त्यांचे खटके उडत होते. पण त्यांच्या मैत्रीत काही फरक पडत नव्हता. म्हणून दोघे मित्र ही बिनधास्त होते.
संकेतने बुध्दिमत्तेच्या जोरावर बऱ्याच परिक्षा देऊन चांगला उत्कर्ष केला होता व त्यामुळेच एका मोठ्या कंपनीचा त्याला कॉल आल्याने तो अमेरिकेला जाऊ इच्छीत होता. सुरेशने संकेतला सगळे विचारून घेतले. संकेतचे म्हणणे त्यांना ही पटले आणि त्यांनी मनोहरला ही ते पटवून दिले. तनयाच्या आईच्या मनात मात्र पाल चुकचुकली. तनयाला ही त्याचे अमेरिकेत जाणे पटले नव्हते. संकेतची आई मात्र खूश होती. शेवटी सगळी तयारी करून संकेत दोन वर्षानी परतण्याच्या बोलीवर अमेरिकेला रवाना झाला.
दोन दिवसांनी संकेतचा फोन सुरेश काकांना आला आणि तिथे त्या जॉब करता त्याला ट्रेनिंग घ्यावं लागेल व त्याकरता पैसे लागतील असे सांगीतले. “बाबा ओरडतील, पण काका तुम्हीच काही तरी करू शकाल”.
“अरे संकेत, घाबरू नकोस. मी तुझ्या बाबांशी बोलतो आणि काही तरी व्यवस्था करतो. मी आहे ना, तुझा काका!”
असे म्हणून त्यांनी त्याला विश्वास दिला. नंतर मनोहरशी बोलून पैशांची व्यवस्था केली.
तनयाच्या आईला मात्र हे पटले नव्हते. तिने नवऱ्याशी ही बोलून पाहिले. तेव्हा ते बोलले, “नाही गं, संकेत चांगला मुलगा आहे. तो खोटं नाही बोलणार. तिथे एकटा पडलाय बिचारा,” असे सांगून त्यांनी तिला गप्प केले.
एक दोन महिने झालेच असतील, संकेतने बाबांना व काकांना फोन करून नवीन जॉब मिळाला हे सांगीतले. वरून हे ही सांगीतले की, कंपनिने राहायला घर दिलयं. पण ते खूपच लहान आहे. आपण त्यात थोडे आणखी पैसे घातले तर मोठं घर घेता येईल आणि तुम्हा सर्वांना ही इथं येऊन थोेडे दिवस राहता येईल. पैशाची व्यवस्था, म्हणजे आमची गावची जमीन विकली तर प्रश्न सहज सुटेल. नंतर हवी तर आपण दुप्पट विकत घेऊ. “बघा, माझं म्हणणं पटतं का.” काकांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी मनोहरला ही ती पटवली. गावची जमीन जास्त विचार न करता विकून टाकली आणि संकेतला पैसे पोचवले.
दुसऱ्या आठवढ्यात संकेतने तिथल्या बंगल्याचे विडिओ ही पाठवले. इकडे घराचे विडिओ बघून सगळे आनंदित झाले.
बरेच दिवस झाले संकेतचा फोन नाही. काका फोन लावतात तर नॉट रिचेबल. बाकीच्यांनी पण फोन लाऊन बघितले पण संकेतचा काहीच रिपलाय आला नाही. त्याला जॉब लागला होता तिथेही फोन लावला पण बातमी ऐकून घोर निराशा झाली. “ही लेफ्ट द जॉब थ्री मंथस बॅक” असं उत्तर मिळालं. त्या नंतर काकांनी आपल्या ओळखीने त्याचा पत्ता शोधून काढला. संकेतला अमेरिकेला बोलावले होते तेव्हाच तिथे जॉब लागला होता. पण ज्यादा हाव असलेल्या संकेत ने तो सोडला अन् दुसरा धरला. तिथेच सोबत काम करणाऱ्या एका मुलीशी त्याची दोस्ती जमली आणि तो तिच्या प्रेमात पडला. तिच्याशीच लग्न केलेयं व मोठ्या बंगल्यात राहतो हे ही कळले.
संकेतने आपले आई, वडील, काका काकी, आणि तनयाचा विश्वासघात केला. संकेतने मनोहर-सुरेशच्या दोस्तीचे रुपांतर नात्यात करण्याचे स्वप्न पार धुळीस मिळवले.
त्याच्या या वागण्याने संकेतच्या आईवडिलांनी हाय खाल्ली. ते भ्रमिष्टासारखे वागू लागले. तनयाच्या वडीलांना हे सगळं आपण केलेल्या मदतीमुळेच असे वाटले म्हणून त्यांनी मनाला फार लावून घेतले. तासनतास एकाच ठिकाणी नजर लावून ते बसू लागले. तनयाच्या आईला वारंवार मनाचे संकेत मिळत होते, पण तिच्याकडे कानडोळा केला गेला. तनयाला मात्र या चौघांना शेवट पर्यंत सांभाळावे लागले. नियतीचा खेळंच खेळावा लागला.
-शोभा वागळे
मुंबई.
8850466717
ReplyForward
|