गावाकडची माती…
खुणावते मज लाल तांबडी गावाकडची माती,
शोधत फिरतो गावखुणांवर बालपणीची नाती
उंच डोंगरी तरु शिखरावर पाउस नाचत येतो,
जणू बांधिले पायी पैंजण अंगणात अवतरतो
ओढे नाले आर्त ओढिने नदीस मिळण्या येती,
अवखळ खळखळ कडेकपारी मंजुळ सुस्वर गाती
हिरवी राने हिरवी शेते हर्षोल्हासे फुलती,
हिरवा शालू नेसुन झाडे सौंदर्याने सजती
ऐकू येते प्रसन्न मंगल देवळातली घंटा,
दर्शन घेण्या गाव लोटतो कुठेच नाही तंटा
शाळा मंदिर गोठा अंगण
मनाजवळचे नाते,
गाव आजही आनंदाने कुशीत मजला घेते
जरि मी आलो शहरामध्ये कधीच नाही रमलो,
दिवस सुगीचे गावाकडचे मनापासुनी जगलो
■■■
© विजो
(विजय जोशी)
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
*विजो (विजय जोशी)
*वृत्त – लवंगलता (८-८-८-४)