तुम्हाला पुरस्कार पाहिजे का ?
तुम्ही जी काही ‘प्रगती’ केली, काम केले, ज्याचा तुम्हाला ‘पुरस्कार’ मिळाला आहे. ज्याचा गवगवा आपण सतरा ठिकाणी पेपरला प्रसिद्धी देऊन करतो ते काम’ संविधानविरोधी चळवळ चालविणाऱ्या प्रतिक्रांतीवाल्यांना खरोखरच ‘प्रत्युत्तर’ देणारे आहे का? किंवा तुमचे काम तुमच्या समाजाची वर्तमान छळातून सुटका करून घेण्यासाठी पूरक आहे का? याची जाणीव असू द्या, तरच गळ्यात ‘हार तुरे ‘घालून, खांद्यावर शाल पांघरून घ्या…!
तुम्हाला तुमच्या समाजाला सुखाचा ‘घास’ पुढच्या पिढीला खाऊ घालता येईल का? यावर विचार करा यासाठी आपण केलेले ‘काम’ खरोखरच पुरेसे आहे का ? याबाबतीत आपल्याला विचार करणे गरजेचे वाटत नाही का? तुमचे सर्वच अधिकार, हक्क, काढून घेतले जात असतांना आपण कसे काय केलेल्या कामाचे समाधान मानत आहात ?आपण केलेल्या कामाचे फळ राष्ट्रीय स्तरावर चाललेल्या असंविधानिक हालचालींना अटकाव करू शकले आहे का? यावर विचार मंथन करणे गरजेचे वाटत नाही काय?
राजकीय, सामाजिक सर्वच स्तरावरील समीकरणे आपली चुकीची ठरलेली असतांना आपण कुठल्या गोष्टीचा पुरस्कार घेऊन मिरवतोय ? कळत नाही. कुणाच्या तरी ताटाखालचं मांजर
होऊन खाल्ल्याशिवाय कोणीच कोणाला पुसत नाही. आपल्यातला सतत वाढता जाणारा स्वार्थी अहमभाव, आणि ‘मेरा गट नही छोडूंगा.. किंवा मला जे कळते ते इतर कोणाला कळतच नाही या अविर्भावात आपली ‘विद्वान’ मंडळी वावरत असतात. तिकडे घुटण्यात अक्कल असलेली ‘शेंबडी पोरं’ आपल्या’ पक्षा’ला, आपल्या माणसाला, मत कसे मिळेल यासाठी अहोरात्र प्रयत्न करत राहतात आणि ते आपल्या पदरात पाडून घेतात.. आणि आपला प्रतिनिधी’ निवडून आणण्याच्या दृष्टीने कायम ‘सतर्क’ असतात. आपण मात्र त्याला म्हणजे आपल्याच माणसाला कसं पाडता येईल, यासाठी हित- शत्रूला जाऊन मिळतो आणि आपल्या माणसाचा’ पराभव’ करतो. काही ‘बहाद्दर’ तर मतदान म्हणजे दोन दिवसाच्या जेवणाची चंगळ ‘समजतात. पुढे पाच वर्षे त्याचे काय हाल होतात त्याचं त्यालाच कळत नाही. अनेक जण सामाजिक कार्यामध्ये ‘नारेबाजी’ करण्यासाठी पुढे असतात मात्र आपली सुखदुःख मांडणारा प्रतिनिधी निवडून देण्याच्या भानगडीमध्ये तितकी जीव ओतून काम करत नाहीत.
उलट असेही एक चित्र आहे की, आपल्यातलाच एखादा प्रतिनिधी निवडून आला की, त्याला स्वतःचं डोकं राहत नाही म्हणून तो इतर पक्षांमध्ये विलीन होतो आणि पाच वर्षे सुखात काढतो. निवडून येईपर्यंत त्याच्यात ‘जोर’असते त्यानंतर त्याच्या गरीब जनतेचे काय होते ?त्याला काही घेणं नसतं किंवा तसं ‘कौशल्य ही त्याच्यात नसतं की, जनतेचे प्रश्न तो मार्गी लावेल.
आपल्या डोळ्या- देखत चुकीच्या ‘प्रतिनिधी :निवडीमुळे समाजाची आर्थिक, सामाजिक अनंत स्वरूपाची हानी होत आहे. आणि आपण हातावर हात ठेवून इतरावर टीका करण्यातच मशगुल होत आहोत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली काही मंडळी कायम कुठे शाल भेटते का? कुठे पुरस्कार भेटते का? हेच पाहत राहतात आणि आपण फार मोठे समाजसेवक आहोत किंवा एखादे कार्यकर्ते आहोत ,एखादे लेखक, साहित्यिक, आहोत या नादातच राहून आपल्या समाजाचं वाटोळं झालेलं पाहत असतो. आजवरची आपली भूमिका आपण राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजेत.. आता ही भूमिका बदलल्याशिवाय इलाज नाही. आता आपण राजकारणामध्ये आपल्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती कसा प्रतिनिधी म्हणून निवडून आणू शकू… याबाबतीत प्रयत्नशील राहणे शहाणपणाचा ठरणार आहे. आता हा अलिप्ततावाद सोडून देऊन आपल्या अस्तित्वासाठी, एकमेकांच्या मनामध्ये असलेले भेदाभेद, दूर करून आपले प्रश्न योग्य मार्गाने मांडणारा प्रतिनिधी पुढे आणला पाहिजे. प्रतिनिधी मध्ये संघटन कौशल्य अभ्यास आणि आपले सामाजिक प्रश्न मांडण्याची कसोटी, कसब आणि लढण्याची जिद्द असली पाहिजे. असाच प्रतिनिधी ‘पुढे जाणे गरजेचे आहे. शासनकर्ती जमात बना …हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीमध्ये फारसं कुणी मनावर घेतल्यासारखं दिसत नाही. याचाच परिणाम चुकीचं प्रतिनिधित्व पुढे गेलं तर तुमचा कुठलाच प्रश्न मांडल्या जाणार नाही. कारण सगळेच मागेपुढे व्यवस्थेचे बगल बच्चे होऊन आपल्या सोयीप्रमाणे काम करतात. आणि आम्ही मात्र कोणं अंगावर शाल पांघरली की, गळ्यात ‘हार’ घातला की, गदगद होऊन जातो.
आताशा तर कोणीही बाबासाहेबाचं नाव तितक्यापुरतं घेऊन तुमच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचं सर्व घरदार त्यांच्याकडे मतासाठी ओढण्यासाठी ,वळवण्यासाठी आपली मानसिकता बदलवून टाकतात. आणि लगेच आपण अर्ध्या हळव्या हळकुंडानं पिवळे होऊन जातो. गल्लीतल्या बाब्याला देश पातळीवर कुठलंच राजकीय गणित कळत नाही की, सामाजिक गणित कळत नाही.. तरीही तो वारंवार ऐकू येतंय त्या दिशेने आपलं धान्य उफनत जातो. ही उलट्या दिशेने ऊफनत जाणारी मंडळी ‘आज-काल समाजात फार वाढलेली आहेत. नव्या पिढीला व्यवस्थेचा फारसा अभ्यास नाही. त्यामुळे मित्र प्रेमामध्ये ते आपल्या समाजाचा राजकीय बळी’ देतात. आपल्या मांडीला मांडी लावून बेगडीपणाने बसणाऱ्याला नीट न ओळखता आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आणतात. ही बाब वेळेवरच ओळखता आली पाहिजेत तरच समोरच्या पिढीचं भवितव्य त्यांना मिळालेले अधिकार, सवलती ते टिकून ठेवू शकतील, अन्यथा आपल्याकडे चालू घडामोडी चा राजकीय बाबीचा अभ्यास नसेल आणि आणि अशातच चुकीचं प्रतिनिधित्व समोर येत असेल तर उद्याची पिढी गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही जे कमावलं असेल आपल्यासाठी त्या महामानवांने ते आपल्या डोळ्यादेखत आपल्या डोळ्यासमोरून कोणी हिसकावून घेतलं तरीही आपल्याला अभ्यासपूर्ण प्रतिउत्तर देण्यासाठी आपल्याकडे तयार नसेल तर अशीच आपली वैचारिक लुटमार होऊन मानसिक लुटमार होऊ शकते. त्यामुळे आता नुसतेच मत खाणारे भुरटे डमी पुढारी कार्यकर्ते यांना नीटपणे ओळखून बाजूला टाकलं पाहिजे आणि योग्य प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती पुढे आला पाहिजे.
बोलताना सगळेच आपली बाजू अगदी दणकटपणे मांडून मोकळे होतात तेव्हा समाज संभ्रमणात पडतो की ,हा बोलतो तेच बरोबर आहे आणि तो बोलतो तेही बरोबर आहे पण नेमकं कोणाला प्रतिनिधी निवडलं पाहिजे याविषयी विचार केला तर असं लक्षात येतं की, उथळ ज्ञानाचा आणि ज्याला काहीच समोरची दिशा स्पष्ट नसेल असा प्रतिनिधी आपल्या काहीच कामाचा नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. यानंतर त्याला काही मिळवता आले नाही तरी चालेल पण जे मिळवलेलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी त्याच्या अंगी असलेल्या संघटन कौशल्य आपण हेरलं पाहिजे. त्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेतृत्व असलेली व्यक्ती समाजासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दुसऱ्याचे हात बळकट होणार असतील तर असा प्रतिनिधी निवडताना शंभर वेळा विचार केला पाहिजे. आपल्यातल्या कुरघोडीनं लेकाच्या विरोधात बाप आणि बापाच्या विरोधात लेक अशा परिस्थितीनं एकमेकांच्या’ पायात पाय ..घालून आजवर समाजाचे 48 तुकडे झालेले बघून आपण नुसत्याच एकमेकांवर टीका करत आहोत. समाजाला अहितकारक प्रतिनिधित्व देऊन आपण आपल्याच अंगाखालची चादर काढून देण्यात आपणच गुन्हेगार ठरलो आहोत. याचे समाज भान ठेवून आता समाजाची रचना अशा प्रतिनिधित्वाने गुंफून आपले हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपणच आता समोर आलं पाहिजे नसता उद्याचे दिवस फार कठीण आहेत. याविषयीची जाणीव जागृती प्रत्येक घराघरात गावागावात विहारा विहारात हीच एक चर्चा घडवून आणणे आता महत्त्वाचे आहे. उगाच इतिहासातल्या जातक कथा, आणि वंदना पाठांतराच्या त्याच त्याच धड्यामागे न लागता आता विहारा विहारांमध्ये सामाजिक बचावाचे राजकीय भान असलेले संस्कार आपल्या नव्या पिढी तरुणांमध्ये रुजवणे महत्त्वाचे आहे.
आपल्यातील अनेक गटआता एकाच पक्षात विलीन करून टाकले पाहिजेत. चार खांदेकरी अजूनही जर वेगवेगळ्या चार दिशेने ओढत असतील तर हे बेकीचं’ मडं वेशी बाहेर नेऊन टाकण्याऐवजी तसंच कायम पडून राहील. म्हणून आता एकच झालं पाहिजे… यासाठी सुशिक्षित, अशिक्षित सर्वांनी एकत्र विचार करून तशी बैठक लावली पाहिजे. तसा धम्मकारण आणि राजकारण हा विषय वेगळा असला तरीही, आता केवळ आणि केवळ राजकारणा मधून समाजातील सुरक्षा करणारा प्रतिनिधित्व जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत समाजाचे सर्वच हक्क अधिकार टिकूनच ठेवण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकणार नाही… आणि मागचे दिवस पुढे यायला काहीच वेळ लागणार नाही आणि ते आलेच आहेत. आता त्या पुरस्काराच्या मागे, हार तुर्याच्या मागे लागून कार्यकर्त्याचा काहीच फायदा नाही आपण प्रत्येक कसोटीवर हारलेले आहोत. असेच समजून चला.. सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे म्हणत असताना ‘सत्य परिस्थिती’ ही डोळ्यासमोर ठेवता आली पाहिजेत आणि कटू सत्य स्वीकारता आलं पाहिजे. समाज प्रत्येक टप्प्यावर मागे येत असताना किंवा आपले हक्क अधिकार आपल्या डोळ्यासमोरून काढून घेत असताना आपण कुठलाच पुरस्कार किंवा हार, सत्कार स्वीकारणे म्हणजे आपण आपलीच केलेली दिशाभूल होय. आता बुद्धिवंतांना इतकेही कळाले तरी भरपूर झाले. आता हार तुर्याची वेळ नाही तर आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ आहे.
आता एकाच नेतृत्वात, एकाच विचारात, एकाच ध्येयात प्रयत्न रत राहून येणारी काळी रात्र पुन्हा एकदा पिटाळून लावू या… हीच सद्विवेक बुद्धी प्रत्येकाला येवो यासाठी हा लेखन प्रपंच…!
-प्रा. नंदू वानखडे
मुंगळा जि. वाशिम 9423650468