भाविकांचे श्रद्धास्थान श्री संत शंकर महाराज

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
    * श्रीसंत शंकर महाराज यांचा प्रगटदिन (हरितालिका दि ३० ऑगस्ट) निमित्ताने

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संत परंपरेचा वारसा हा अमरावती जिल्याला सुद्धा लाभलेला आहे.महाभारत काळापासून तर आधुनिक काळापर्यंत अनेक संत/महात्मे याच भूमीत जन्मलेले आहे.अशा या संताच्या भूमीमध्ये पूर्वीचा तिवसा आणि विद्यमान धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळखुटा या लहानशा खेड्यामध्ये श्री संत शंकर महाराज यांचा १९४५ मध्ये गरीब व निरक्षर कुटुंबामध्ये हरितालिका या दिवशी जन्म झालेला आहे. बुधाजी नागपुरे व भागीरथीबाई नागपुरे हे त्यांचे माता-पिता.श्री संत शंकर महाराज हे त्यांचे सातवे रत्न.

    बाबाचा जन्म तसा अत्यंत दारिद्र्यमध्ये व्यतीत करणाऱ्या भूमिहीन कुटुंबामध्ये झालेला आहे.त्यातच श्री संत शंकर महाराज त्यांच्या बंधू पैकी सर्वात ज्येष्ठ.गरिबीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाला आपला सुद्धा आर्थिक हातभार असावा म्हणून शंकरबाबा तत्कालीन वेळेस गावातील शेतकऱ्याकडे चाकरी करणे,गवताची ओझे वाहणे,वखरणे,नांगरणे,डवरणे, गुरेढोरे चारणे,जनावरांची देखभाल करणे,खोदकाम करणे,इत्यादी अंगमेहनतीचे कामे करित असे.हा संपूर्ण भार घेत असताना बाबांचा ओढा मात्र बालपणापासूनच अध्यात्मिक क्षेत्राकडे अधिक होता.माता पिता धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने बाबाला धार्मिक वातावरण कुटुंबातच लाभले.दिवसभर काबाडकष्ट तर करायचेच शिवाय ईश्वराचे ध्यान,चिंतन,मनन, करण्यात माञ कधीही विसरत नव्हते.श्री संत लहानुजी महाराज यांचे परमभक्त असलेले बाबा नित्यक्रमाने श्रीक्षेत्र टाकरखेडा येथे पायी दर्शनासाठी जात असे.१९५७ मध्ये श्री संत शंकर महाराज यांची श्री समर्थ सद्गुरु लहानुजी महाराज यांच्याशी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी भेट झाली.

    श्री सद्गुरूनी “अक्कल साया चार वर्षे”असे म्हणून त्यांना अनुग्रहित केले.तसेच श्री समर्थ लहानुजी महाराज यांच्या चाचणी मध्ये बाबा सर्वात अव्वल ठरले. शिवाय त्यांनी प्रिय शिष्याची जागा घेतली.श्री संत लहानुजी महाराज व श्री संत सत्यदेव बाबा यांना श्रद्धास्थानी ठेवून बाबा त्यांची नियमित भक्ती करू लागलेत.बाबांना तशी गुरु परंपरा लाभली आहे.भगवान शंकर,श्री गुरुदेव दत्त,मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ,गहनीनाथ,निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर माऊली,हैबती नाथ,संत मायाबाई,संत आडकूजी महाराज,श्री संत लहानुजी महाराज अशी गुरू परंपरा त्यांना लाभली आहे.गुरु परंपरेला श्रद्धास्थानी ठेवून बाबा त्यांची भक्ती करू लागले.ईश्वर,प्रेम, जिज्ञासा,सात्विकता या वृत्तीचा गावकऱ्यांनाही अनुभव येऊ लागला होता.गुरेढोरे चारत असतानासुद्धा ईश्वराच्या नामस्मरणासह देवी-देवतांची गाणी गात असत.बाबांची ईश्वराप्रती श्रद्धा गाड होऊ लागली.सद्गुरूच्या आज्ञेवरून शंकर बाबा यांनी बारा वर्षे उपवास आणि मौनव्रत धारण केले.कालांतराने श्री संत सत्यदेव बाबा यांनी त्यांना मौनव्रत सोडण्याची आज्ञा केली आणि त्यानुसार श्री संत शंकर बाबा यांनी सालबर्डी या पावन भूमीमध्ये मौनव्रत सोडले.

    अध्यात्मबरोबर बाबांच्या जिभेवर सरस्वती सुद्धा वास करते.त्यातून केलेली ग्रंथनिर्मिती सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे.श्री संत लहानुजी महाराज यांनी त्यांना ग्रंथरचना करण्यासाठी आदेश दिला की,”हा घे डोळा ! काही तरी लिहीत जावे !” या गुरूच्या आज्ञेतून केवळ चौथा वर्ग शिकलेले असताना सुद्धा श्री संत शंकर बाबा यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी “ज्ञानामृत” मराठी ओवीत (भगवद्गीता ग्रंथ) शब्दबद्ध केला.याशिवाय अनेक ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यात प्रामुख्याने १९७४ ला गुरुकृपा कशी लाभली याविषयी “सद्गुरु दर्शन”नावाची पुस्तिका लिहिली.गुरुकृपा,परंपरा सद्गुरुची लक्षणे,शुद्ध सात्विक शिष्य कसा असावा या संदर्भात १९७९ ला “सद्गुरु महिमामृत” या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

    याशिवाय “अनुभव ब्रह्म”, “श्रद्धांजली” या ग्रंथासह अनेक संदर्भ ग्रंथाची निर्मिती केलेली आहे.बाबाकडे चमत्कार, बुवाबाजी व अंधश्रद्धेला अजिबात स्थान नाही.श्रीक्षेत्र पिंपळखुटा येथील विश्व मंदिर भक्तीधाम आश्रमाच्या सर्वव्यापक कार्यावरून हे सहज लक्षात येते. बाबाचे धार्मिक प्रवृत्ती बरोबरच सामाजिक कार्याची सुद्धा जोड आहे.ग्रामीण क्षेत्रातील शैक्षणिक दर्जा उंचवावा आणि गोरगरिबांच्या मुला मुलींना शिक्षणासाठी संधी उपलब्ध व्हावी म्हणून श्री संत शंकर महाराज विद्यामंदिर,कनिष्ठ (कला) महाविद्यालय,किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तसेच कला व कृषी महाविद्यालयाची स्थापना केली आहे.१९८९ मध्ये केवळ १४ विद्यार्थ्यांच्या भरवशावर शाळा सुरू केली.१९९४ ला किमान कौशल्यवर आधारित एम.सी.वि.सी., १९९५ ला कनिष्ठ कला महाविद्यालय,२००२ ला कला व वाणिज्य महाविद्यालय,आणि सन २००८ ला कृषी महाविद्यालय सुरू केले आहे.त्याचबरोबर कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेशित मुला-मुलींकरिता निवासी वसतिगृह तसेच खेड्या-पाड्यातून येणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता स्वतंत्र स्कूल बसची व्यवस्था केलेली आहे.

    आता या शैक्षणिक रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे.आज या संस्थेच्या माध्यमातून हजाराच्यावर मुलं-मुली शिक्षण घेत आहे.या शैक्षणिक उपक्रमामुळे सर्वसामान्याना शिक्षणाची द्वारे खुली झाली आहेत.जे दूरवरच्या गावात जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हते अशा लोकांच्या पाल्याकरिता अगदी हाकेच्या अंतरावर शैक्षणिक सुविधा निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक मुलं-मुली पदवी-पदव्युत्तर झालेले आहे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.गरीब,होतकरू व मागासवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी समाजकल्याण विभागाशी संलग्नित वसतिगृह सुद्धा सुरू केलेले आहे.या वसतिगृहामध्ये जवळपास दोनशे च्या जवळपास विद्यार्थी राहातात.त्यात १२४ विद्यार्थ्यांचा खर्च शासन तर उर्वरित विद्यार्थ्यांचा खर्च मात्र संस्थेद्वारा उचलला जातो.याशिवाय श्री संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्याने आश्रम परिसरामध्ये दर गुरुवारी मोफत आरोग्य शिबीर घेतले जाते. लवकरच श्री संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.

    प्रारंभीच्या कालखंडामध्ये बाबाचे वास्तव्य गावांमध्ये होते. बाबांची भटकंती तशी सुरूच होती.श्रीसंत शंकर बाबा यांचा आश्रम असावा असे अनेक भक्तांना वाटत असे.मात्र बाबांच्या होकाराशिवाय या कल्पनेला मूर्तरूप येत नव्हते.दहेगाव मुस्तफा या गावी आश्रमाची निर्मिती करावी अशी तेथील भक्तांची प्रांजळ इच्छा होती. आणि त्यासाठी जागा आणि संपूर्ण आर्थिक बाजू उचलण्याचा मानस सुद्धा तेथील भक्तगणांनी व्यक्त केला.मात्र शंकर बाबा यांनी याबाबतचा निर्णय हा गुरुवर्य अर्थात लहानुजी बाबा यांच्यावर सोपविला.त्या अनुसरून लहानुजी बाबा यांनी आज्ञा केली की,”आपले जुनेच गाव चांगले राहील.ती बुढी शेती देण्यास तयार व तेच घ्यावं”.लहानूजी बाबा यांचा कल हा पिंपळखुटा येथेच आश्रम बांधावा असा होता.त्यानुसार पिंपळखुटा येथे आश्रमाची निर्मिती करण्याचा संकल्प झाला.त्यासाठी सत्यदेव बाबा यांनी तत्कालीन वेळेस दोन रुपयाची महान देणगी दिली होती.गुरुवार्याचा आशीर्वाद आणि भक्तगणांच्या सहकार्यातून सर्व सोयीने युक्त पिंपळखुटा येथे आश्रम अस्तित्वात आला आहे.आज या आश्रमाला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.कालांतराने विश्व मंदिर भक्तीधाम पिंपळखुटा सह,धायरी नऱ्हे,पुणे,सावरी (जवाहरनगर) तालुका जिल्हा भंडारा,या ठिकाणी सुध्दा आश्रमाची बांधणी केली असून श्री क्षेत्र पंढरपूर येथील विश्वमंदिराचे बांधकाम सुरू आहे तर नागपूर आणि आळंदी येथे आश्रम बांधणी करण्याचे नियोजन आहे.

    आश्रमामध्ये जातिभेद, लिंगभेद,वर्णभेद,धर्मभेद यांना अजिबात थारा नाही.”सबके लिए खुला है मंदिर यह हमारा” याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.अन्नदान हे या आश्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य.भुकेलेला व्यक्ती येथून तृप्त होऊन जातो.आश्रमातील संपूर्ण उपक्रम लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने पर्यटनाचा “ब” दर्जा बहाल केला आहे.

    आश्रमातील वार्षिक कार्यक्रमांमध्ये आषाढी पौर्णिमा, रक्षाबंधन नारळी पौर्णिमा, (श्रीसंत लहानूजी महाराज पुण्यतिथी),श्रीसंत शंकर महाराज प्रकटदिन महोत्सव (हरितालिका),श्रीसंत सत्यदेव बाबा यांची पुण्यतिथी,कोजागिरी पौर्णिमा,काकडा समाप्ती, मकरसंक्रांत,(शंकर महाराज यांच्या लुटीचा कार्यक्रम),श्रीराम नवमी महोत्सव,परमपूज्य बुधाजी महाराज पुण्यतिथी,भागीरथी आई पुण्यतिथी,सकाळी सामुदायिक ध्यान आणि सायंकाळी सामुदायिक प्रार्थना यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात.श्रीराम नवमी महोत्सव आणि श्री संत शंकर महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव हे दोन प्रमुख कार्यक्रम आहेत.श्रीराम नवमी महोत्सवामध्ये दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आणि प्रकट दिन महोत्सवांमध्ये दरवर्षी मागासवर्गीय वस्तीगृहातील गोर गरीब मुलांना मोफत कपडे वाटप केले जाते.

    सालाबादाप्रमाणे १९७१ मध्ये श्री संत सत्यदेव बाबा हे गव्हानिपाणी येथे श्री संत नामदेव महाराज यांच्याकडे श्रीरामनवमी कार्यक्रमाला उपस्थित होते.तेथून पिंपळखुटा येथे आले आणि श्रीसंत शंकर बाबा यांना म्हणाले की,”आता यांच्या पुढे आपली रामनवमी इथेच करत जाऊ,पतली पतली डाळभाजी आणि कण्या करावं व उलीशी रामनवमी कराव”असा आदेश दिला.उलीशी रामनवमीला आज विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या महोत्सवाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात.

    श्री संत शंकर महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव हा दुसरा महत्त्वपूर्ण आणि मुख्य कार्यक्रम आहे.नागपूर येथें सत्यदेव बाबा यांचा जन्म दिवसाच्या पर्वावर सत्यदेव बाबा उपस्थित भक्तांना म्हणाले की,”आमच्या वाल्यांचा असाच करत जा”तेव्हापासून सत्यदेव बाबा यांच्या आदेशाचे पालन म्हणून श्री समर्थ शंकर बाबा यांनी स्वतःचा प्रगट दिन साजरा करण्याची अनुमती दिली. आणि हरितालिकेच्या दिवशी दरवर्षी प्रगट दिन महोत्सव आयोजित केला जातो.

    बाबांचे मराठी,हिंदी,संस्कृत आणि प्राकृत इत्यादी भाषांवर प्रभुत्व असून शिवपुराणातील मनोरंजन कथा,वेद,उपनिषदाचे तत्वज्ञान,भक्तीचे,संताचे मार्मिक उपदेश करीत असल्याने व जीवनाचा खरा मार्ग दिशानिर्देश करीत असल्याने शंकरबाबाकडे भाविक भक्तांचा ओढा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.आज बाबा चे भक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरलेले आहे.

    —————————————-
    *-स्वाती नरेश इंगळे
    *मु.भांबोरा ता.तिवसा
    *जि.अमरावती
    *मोबाईल- ९७६४९९३५२३
    —————————– ——————————————-

Leave a comment