जिनकर राठोड यांचे आमरण उपोषण गोरबंजारा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी..! सरकार लक्ष देईल का?
ग्राऊंड रिपोर्ट -ब्राह्मणगाव- पुसद तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या ब्राह्मणगाव (शामपूर) या गावांमध्ये गोरबंजारा समाजातील 37 वर्षाचा तरुण व अखिल भारतीय तांडा सुधार समितीचा विदर्भ अध्यक्ष जिनकर सुदाम राठोड हा 14 मागण्या घेऊन उपोषण करतो आहे . सध्या महाराष्ट्र हा आंदोलनाच्या वातावरणाने गाजत आहे.
गोरबंजारा समाजाच्या मागण्याकडे हे नावालाच असलेले गतिमान सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे जिनकर राठोड यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केलेली असून तो आता थेट आमरण उपोषण करून सरकारचे लक्ष वेधण्याचा तो प्रयत्न करतो आहे. आणि त्याला प्रचंड पाठिंबा मळत आहे. त्यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस असून काल मा.संजयभाऊ राठोड जलसंधारण मंत्री यांचे प्रतिनिधी व दिग्रस तालुक्यातील अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे लोकप्रिय अध्यक्ष मा. रमेश पवार (कारभारी), पुसद पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश राठोड आणि मी ब्राह्मणगाव येथे जाऊन उपोषण मंडपाला भेट दिली असता बरीच गावकरी मंडळी बसली होती. आमरण उपोषण करते जिनकर राठोड यांची प्रकृती खालावलेली दिसली. अजुनही प्रशासनाने या आमरण उपोषणाची तातडीने दखल घेतलेली नाही. त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू त्या ठिकाणी दिसून आला. तेवढ्यात महसूल विभागाचे अधिकारी आले होते. जिनकर राठोड यांनी गोरबंजारा समाजाच्या मागणी करिता मागच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात संजय मदन आडे यांना घेऊन गहुली ते नागपूर पदयात्रा काढली होती. त्यानंतर हिवळणी येथेच जंगल प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण होण्याकरिता अर्धमुंडन आंदोलन सुद्धा केले होते. त्यानंतरच हिवळणी येथे संजय मदन आडे सोबत माळपठारावरील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी जल आंदोलन सुद्धा केलेले आहे. त्यानंतर एक दिवस रास्ता रोको सुद्धा त्यांनी केलेले असून सन 2019 ची पुसद विधानसभा सुद्धा त्यांनी लढवली होती. जिनकर राठोड म्हणजे धडपड्या तरूण आहे. गोरबंजारा समाजाच्या मागणीसाठी त्यांनी अखिल भारतीय तांडा सुधार समिती मध्ये काम करण्यास सुरुवात केलेली आहे.
सन 2012 पासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्राचार्य डॉ. प्रकाश धोटे यांच्यासोबत काम केलेले असून सन 2018 पासून श्री सेवा दत्त अकादमी पुसद येथील पाच अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च ते उचलतात. आपल्या अल्पसा व्यवसायामध्ये आपले कुटुंब चालवून त्यांनी गोरबंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता वेगवेगळी आंदोलन केलेली असून गेल्या 30 सप्टेंबर 2023 पासून ते आमरण उपोषणास बसलेले आहे. जेव्हा त्यांना मी प्रश्न केला की एवढ्या कमी वयामध्ये आमरण उपोषण करण्यासाठी आत्मबळ आले कुठून? त्यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिले की, मी एक ते सात वर्गापर्यंत गहुली येथील आश्रम शाळेत शिकत असताना महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या प्रेरणाभूमीत मला हे आत्मबळ प्राप्त झाले असल्याची त्यांनी कबुली दिली.ते संत सेवालालबापु आणि नाईकसाहेब यांना आपले प्रेरणास्थान मानतात. आज गोरबंजारा समाजाच्या अनेक समस्या आहे. त्यावर समाजातील कोणताही माणूस बोलायला तयार नाही.
जर शासनाने मी केलेल्या मागण्या मंजूर केल्या नाही. तर येणाऱ्या अनेक पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मी मेलो तरी चालेल परंतु या मागण्या मंजूर केल्याशिवाय मी हटणार नाही. अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी कालच्या भेटीमध्ये केलेली आहे. जोपर्यंत मंत्रिमंडळातील एखादा मंत्री या उपोषण स्थळाला भेट देणार नाही. तोपर्यंत मी कुठल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही अशी कबुली त्यांनी दिली. आज माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस असून अजून पर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नसून स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व संघटनाचे पदाधिकारी, सगळ्या गावाचे नायक ,कारभारी आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती या सर्वांनी या मंडपाला भेटी देऊन हा गोर बंजारा समाजासाठी चालवलेला लढा. त्यांनी यशस्वी करावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मी जे उपोषणाला बसलेलो आहे हे माझ्या स्वार्थासाठी नसून तमाम गोरबंजारा समाजाच्या भल्यासाठी आहे. म्हणून या विभागातील पत्रकार, लेखक, समाजधुरीण या सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करावे अशीही अपेक्षा त्यांनी आमच्या भेटीदरम्यान व्यक्त करून कोणत्याही परिस्थितीमध्ये मागणी मान्य झाल्याशिवाय मी आमरण उपोषण सोडणार नाही. असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे.
त्यांनी केलेल्या मागण्या
१) बंजारा समाजाला तेलंगणा राज्याच्या धर्तीवर अनुसूचित जमाती प्रवर्गाचे एसटी आरक्षण देण्यात यावे.
२) विमुक्त जाती प्रवर्गात सुरू असलेली बोगस घुसखोरी रोखण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी.
३) संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीदिनी 15 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी.
४) विमुक्त जाती भटक्यात जमातीला चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली नाॅन क्रिमीलियरची अट कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी.
५) जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
६) शासकीय शाळा खाजगी उद्योगपतींना देण्याचा, विकण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.
७) खाजगी सेवा पुरवठा दराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने होणारी नोकर भरतीचा निर्णय रद्द करण्यात यावा.
८) वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेच्या निधीत 50 कोटी रुपयापर्यंत वाढ करण्यात यावी.
९) प्रेरणाभूमी गहुली येथील वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे सौंदर्यकरण करण्यात यावे.
१०) शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे.
११) यूपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेली आयएएस दर्जाच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या.
१२) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणा नुसार महाराष्ट्रातील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे.
१३) लोककलावंत, शाहीर भजनकरी व त्यांच्या साथीदारांना दरमहा प्रत्येकी 5000 रुपये मानधन देण्यात यावे.
१४) गाव खेड्यातील शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी पांदण रस्ता देण्यात यावे.
वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात शासनाला वेळोवेळी शेकडो निवेदन देण्यात आलेले असून संजय मदन आडे यांच्यासह यापूर्वी साखळी उपोषण, धरणे आंदोलन केलेले असून गहुली ते नागपूर पदयात्रा सुद्धा हिवाळी अधिवेशन दरम्यान काढण्यात आली होती. परंतु हे नावालाच गतिमान असलेले सरकार कुठल्याही प्रकारच्या गोरबंजारा समाजाच्या मागण्यावर लक्ष द्यायला तयार नाही. आणि मागणी सोडू शकत नाही. तर जगण्याला अर्थ काय? हा प्रश्न ,जिनकर सुदाम राठोड यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे वरील मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2023 पासून ब्राह्मणगाव येथील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिर परिसरात आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आणि या आमरण उपोषणास दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असल्यामुळे तात्काळ प्रशासनाने उपोषणाची दखल घ्यावी आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपाययोजना करावी अशीच चर्चा उपोषण मंडपात दिसून आली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासारखेच जिनकर सुदाम राठोड यांनी सुरू केलेले उपोषण दिसत असुन लोकांचा पाठिंबा वाढत आहे. खरोखर जिनकर राठोड यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
सर्वांनीच या उपोषणाला पाठिंबा देऊन हे उपोषण यशस्वी करण्यासाठी सोबतची आणि परिसरातील मंडळी झटत असल्याबाबत जनमानसात चर्चा दिसुन आली आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन जलद गतीने न्याय मिळणे गरजेचे आहे. जिनकर राठोड तुला सलाम..!
-याडीकार पंजाबराव चव्हाण
पुसद
-94 21 77 4372