सूर..
माझ्या ताईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरी कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या. लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो, त्यामुळे सासू-सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव द्यायची गरज नाही. सुरवाती पासूनच त्यांना निग्लेक्ट करत त्यांच्याशी रोखठोक वागायचं, म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाहीत हे मी मनावर पक्क बिंबऊन घेतलं होतं.
आई सांगत असे. ताईचं लग्न झालं. नवलाईचे नऊ दिवस संपले. संसार सुरु झाला. ज्या सासू-सासरे नामक व्यक्तींना आता पर्यंत कधी पाहिलेही नव्हते त्यांना एकाएकी आई-बाबा म्हणणे तिला खूप जड जात असे. संसाराला दोन वर्ष झालेयत ताईच्या. सासरी अजून पाहिजे तसे सूर जुळले नाहीत तिचे इतरांशी. आता मलाही त्या दिव्यातून जायचे होते.
ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या. आमची एवढी सगळी तयारी असूनही ऐन वेळेवर थोडासा गोंधळ उडालाच! पण आईच्या अपेक्षे प्रमाणे माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर आठ्या अशा काही दिसल्या नाहीत. उलट “अहो एवढ्या मोठ्या कार्यात थोडं मागे पुढे होतंच असतं” म्हणत त्यांनी समजूतदारपणाने घेतलं.रिसेप्शनसाठी मी प्रांजल सोबत डायसवर बसले तेव्हा मी त्याला ‘अरे-तुरे’च करत होते. आई म्हणे तुझी सासू हे खपवून घेणार नाही.
ग्रुप-फोटोच्या वेळेस त्या मला लागूनच उभ्या होत्या. हळूच कानाशी येऊन म्हणाल्या अग ‘अरे’ म्हणण्यात आपलेपणा, जिव्हाळा दिसतो, काही हरकत नाही. पण चारचौघांत आपल्या नवऱ्याचा मान आपण राखायचा, त्याचा पाणउतारा होऊ द्यायचा नाही.
कंपनीच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप मला काँग्रेट्स द्यायला आला. नकळत मी ओळख करून देतांना म्हंटले,”या माझ्या सासूबाई”. तशी सर्वांसमोरच त्या उद्गारल्या, “अगं, एखाद्याच्या आई-बाबांची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. आधी ते, त्यांच्या नंतर आम्ही! बरं का, तू आम्हाला काका-काकू म्हणू शकतेस!”
सो-कॉल्ड आऊटडेटेड सासू कडून मी इतका समजूतदारपणा एक्सपेक्ट केला नव्हता.सत्य-नारायणा नंतर पहिल्या रात्री झोपायला साडेतीन झाले. गेले पाच सहा दिवसाच्या दगदगीमुळे इतकी गाढ झोप लागली की सकाळी सव्वा नऊलाच जाग आली. नवरोबा केव्हां उठून बाहेर गेला होता कुणास ठाऊक.
लगबगीने आवरून किचनकडे निघाले. पहिली रात्र उलटून पहिल्या सकाळी, जेव्हां एक नव-विवाहीता नव्या घरी, चार-चौघ्या पाहुण्यांच्या गजबजाटात, नॉर्मल चेहरा ठेवण्याचा असफल प्रयत्न करत सुनेच्या भूमिकेत वावरू लागते, तेव्हां लज्जा आणि संकोचाने तिची काय तारांबळ उडते ते एक नव-विवाहिताच जाणे!
इतक्या साऱ्या लोकांमध्ये मी एकटी पडल्या सारखे मला वाटू लागले. एक तर मला उठायला उशीर झाला. आता सासूबाई चारचौघात चार शब्द बोलतील कि काय! त्यांना तितकेच बाणेदार उत्तर देण्याची पूर्व तयारी आईने माझ्याकडून करून घेतली होती. पण तो माझा आवेश कुठल्याकुठे गळून पडला होता. त्या क्षणी गरज होती ते कुणीतरी मायेने माझ्या मनाची अवघड अवस्था समजून घेऊन मला आपलसं करण्याची.
अचानक सासूबाई प्रकटल्या. “अगं ये गं बाई बैस. लाजतेस काय! अग हेच तर जीवनातले खरे सोनियाचे दिवस असतात! स्वतःला आनंदाच्या महासागरात झोकून देण्याचे”. म्हणत अक्षरशः मावशीने घ्यावे त्या मायेने त्यांनी मला जवळ घेतले.
“बरं कागss, आज पासून ही लक्ष्मी आहे बरं का आपल्या घरकुलाची. हिला आपल्या मध्ये मुरेपर्यंत सगळ्यांनी मदत करायची हं. कुणी हिची टिंगल बिंगल केलेली मी सहन करणार नाही बरं का !” म्हणत पाठीवर थोपटले. मायेच्या या अनपेक्षित ओलाव्याने मी पुरती विरघळून गेले.
सकाळी माझी वाट न पहाता सासूबाईनेच किचन आवरून सकाळचा उपमा सुद्धा तयार केला होता. “अग तुझ्यापुढे सगळं आयुष्य पडलं आहे कामासाठी” म्हणत त्यांनी माझ्यासाठी उपम्यावर शेव पेरली. सगळ्यांचा नाश्ता झाला होता, मीच काय ती राहिली होत्ये.
मी उपमा खात असतांना माझे न ऐकता त्यांनी गॅसवर चहा सुध्दा टाकला. “उद्यापासून तुलाच करायचाय की” म्हणाल्या. शेवटी चहा मात्र मी गाळून घेतला. “अगं तुझ्या आई कडून तुझ्या आवडी निवडी आधीच विचारून घेतल्या होत्या, ही घे तुला पालेकर बेकरीची नानकटाई लागते नं चहासोबत!” आता मात्र मला गहिवरल्या सारखे झाले.
मांडव परतनी, हनीमून सर्व आटोपले. रोजचे रुटीन सुरु झाले. सकाळी माझी कंपनीत जाण्याची घाई असे. सकाळी किचनचा ताबा सासूबाईं कडेच असे. संध्याकाळी आल्यावर मी माझ्या पद्धतीने कुकर लावत असे. भाजीचा चॉईसही माझाच. पोळ्यांसाठी बाई होतीच.
कधी “अग तू थकली असशील” म्हणत काकू – माझ्या सासूबाई – माझा चहा सुद्धा ठेवत असत. स्वयंपाकात माझी बाजू लंगडीच! मग त्या एक एक करत मला शिकवायच्या, ते ही मला कमी न लेखता! प्रांजल लवकर आला तर आम्ही दोघे संध्याकाळी फिरून येत असू. त्या निमित्याने भाजी, किराणा होत असे. बदल म्हणून सॅटरडे, संडेला नाटक सिनेमा, होत असे.
घर आणि ऑफिस या धावपळीत आईला सुद्धा फोन करायला वेळ मिळत नसे. अन तो केलाच तर आईचा एकच सूर असे, “अगं मला कळतं तिकडे तुझी आबाळ होत असेल. नोकरी करून घर सांभाळणं म्हणजे तारेवरची सर्कस! त्यात तुझ्या सासूबाई जाऊन बसत असतील भागवत किंवा कीर्तनाला!
सुट्टीच्या दिवशी मग सासऱ्यांची लुडबुड राहात असेल. हे इथे ठेवा, ते तसं करा, साफसफाई करा. तशात तुझा नवरा म्हणजे आईच्या आज्ञेत!” त्यावर मी “अग तसं काही नाही आई इकडे” म्हंटले तरी तिचं समाधान होत नसे. तसे पाहिले तर मी खरंच सुखात होत्ये. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले, माझी आई म्हणजे ना अगदी पारंपारिक बुरसटलेल्या जुन्या विचारांची! तिच्या दृष्टीने सासू म्हणजे सुनेचा छळ करणारी एक दुष्ट आणि कजाग व्यक्ती!
तिने माझ्या मनात भरवलं त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या होत्या माझ्या सासूबाई. त्या मला नुसतंच समजून घेत नव्हत्या तर माझं कौतुकही करत असत. माझ्या आवडीचे ड्रेसेस, जीन्स-टॉप घालण्यावरही काही निर्बंध नव्हते. माझे सासरे, म्हणजे काका ते सुद्धा किती जॉली आणि सतत चार्मिंग परसनॅलीटी! अजिबात जुनाट विचार नाहीत. बदलत्या जगाशी जुळवून घेण्याकडे त्यांचा कल असे. रिडींग, मित्रमंडळ आणि फिरणे यात ते निवांत वेळ घालवत असत. मी ऑफिस मधून घरी आले की आपुलकीने विचारत, कसा गेला आजचा दिवस?
मला सासरी परकं वाटू नये, मनावर दडपण राहू नये म्हणून सुरवाती पासूनच दोघेही खूप मनमोकळे वागत. आणि मुख्य म्हणजे मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. एकदा माझ्या हातून गिझर चालूच राहिला, तर एक वेळा कुकर मध्ये पुरेसं पाणी टाकायला विसरले. एक-दोन वेळा वरच्या मजल्यावरचा पंखा सुरूच राहिला. पण काकू, “अगं चालायचंच” म्हणून समजून घेत.
एक दिवस मी गडबडीतच कंपनीत निघून गेले होते. सकाळी आंघोळी नंतर माझे कपडे साबणाच्या पाण्यात बुडवून बकेट मागच्या अंगणात ठेवायला विसरले. नेमक्या त्या दिवशी कामवाल्या बाई आल्या नाहीत. काकूंनीच माझे सर्व कपडे धुवून वाळत सुद्धा टाकले होते. मला इतकं लाजल्या सारखं झालं.
मन आज भूतकाळात गेलं. मी तेव्हां ट्वेल्व्हथ मध्ये होते. नुकतंच दादाचं लग्न झालं होतं. या ना त्या कारणाने आई सतत वहिनीला टोकत असे. कधी तिच्या स्वयंपाकावरून, कधी पोशाखावरून, कधी विसरण्यावरून, एक ना दोन! वहीनी खालच्या मानेने ऐकून घेई.
एकदा वहिनी अंघोळी नंतर पेटीकोट वगैरे कपडे बाथरूम मध्येच अस्ताव्यस्त विसरून आली होती. आईने घर डोक्यावर घेतलं होतं. माझ्या समोरच आई तिला – – – – पोरकट – – – – निर्लज्ज – – – – हेच का तुझ्या आईचे संस्कार – – – आणखी नाही नाही ते म्हणाली.
वहिनीच्या मनावर तो मोठाच आघात होता. त्यानंतर तिने दादाला मुंबईला बदली करून घ्यायला भाग पाडलं. तेव्हापासून दादा-वहिनी दुरावलेच ! खरं तर घरी मी सुद्धा आंघोळी नंतर बाथरूम मध्ये माझे अंडर गारमेंट्स निर्धास्तपणे तसेच टाकून पळायची. मग वहिनी का वेगळी होती. ती ही तिच्या घरी तेवढीच निर्धास्त का नसावी! ते तिचंही हक्काचं घर होतं.
रात्रभर मला झोप येईना. त्या काळात मी ही वहिनीशी काही फारशी चांगली वागले नव्हती. माझ्या आईने कधी मोठ्या मनाने स्वतःच्या सुनेला समजून घेतलं नाही. आता माझी सासू तिच्याच सारखी कोत्या मनाची असेल असे समजून तिला धडा शिकविण्यासाठी ती मला ट्रेनिंग देत होती. मला अपराध्या सारखे वाटू लागले.
तसेही सहा महिने झालेत, मी कंपनीत सुट्टी घेतली नव्हती.* *सकाळीच काकुंजवळ जाहीर केलं, मी पंधरा दिवसांसाठी माहेरी चालले. प्रांजलची ना नव्हतीच. आधीच फोनवर आईला सांगून ठेवले, बॅग भरून तयार ठेव. नागपूर ते सी एस टी, दुरान्तोचे दोन तिकीटं ऑन लाईन बुक करून घेतले. आई नाही नाहीच करत होती. पण मी तिला राजी केले.
धाडसाने मीच वहिनीला फोन केला. काही प्रस्तावना न करता सरळ सांगून टाकले “वहिनी आम्ही दोघी येत आहोत, नवीन सुरुवात करायची आहे.” मन म्हणत होतं, म्हणावं “झाल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत, माफी मागायची आहे.” पण मन धजले नाही.
लग्ना नंतर पहिल्यांदाच आईकडे आले होते. दिवसभर मी काहीच कामं केली नाहीत. स्वयंपाकापासून किचन आवरण्यापर्यंत आईनेच केलं. इतक्या दिवसांनी रात्री आईच्या कुशीत लाडाऊन झोपण्याची गोडी काय वर्णावी! आईने विषयाला हात घातलाच. “काय म्हणते तुझी सासू!”
मग मात्र मी तडकलेच! “आई कोणत्या जगात वावरत आहेस तू! तुला माहीत तरी आहे का तुझ्या कल्पनेपेक्षा जग किती वेगळं आहे ते! खूप चांगली आणि समजूतदार आहे माझी सासू. उलट आपणच वहिनीवर अत्याचार केलेत. आपण अपराधी आहोत तिचे”.
आईला हे उत्तर अपेक्षित नव्हते. मी तिला दुखविले होते. रात्री आम्ही दोघी काहीच बोललो नाही. दुसरा दिवस. रात्री दोघी दुरान्तो एक्सप्रेस मध्ये बसलो. सकाळीच सी एस टी ला पोचलो. दादाचं ऑफिस होतं. स्टेशनवर वहिनी आली होती घ्यायला. कोचच्या दाराशी येऊन तिने आधी आईच्या हातातली बॅग हातात घेतली. प्लॅटफॉर्मवर उतरतांना आईला तिनेच हात दिला.
“अहो सकाळी सकाळी थोडं गारच असतं” म्हणत स्वतःच्या अंगावरची शाल आईच्या खांद्याभोवती गुंडाळली. आईला ओशाळल्या सारखे झाले. दादाच्या नेहमीच्या ओळखीतला टॅक्सीवाला होता. टॅक्सी कडे जाता जाता वहिनीने आईचा हात हातात धरला. म्हणाली,”आई, आता चांगल्या महिनाभर मुक्काम करा. आता हळू हळू इकडचेच व्हायचंय!
आता पर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या कष्टाने पार पाडल्यात तुम्ही. आता तुमचे एन्जॉयमेंटचे दिवस आहेत. डायबेटिसची काळजी करू नका. तुमच्या आयुर्वेदिक टॅब्लेट्स इथे सुद्धा मिळतात. घरी फोनवर मागवून घेऊ”. आईला अगदी गहिवरल्या सारखे झाले.
“दादा, तृप्ती कॅफेला थांबायचं आहे आपल्याला पंधरा मिनिटं” वहिनी ड्रायव्हरला म्हणाली.
“अगं, आईंचा सकाळचा चहा व्हायचा असेल. ट्रेन मध्ये शुगर फ्री चहा मिळत नाही ना. त्यांना कसं सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो, त्याशिवाय त्यांना डोकं हलकं वाटत नाही”.
“आई, अहो घरी पोचायला अजून दीड तास आहे, इथे ‘तृप्ती’ मध्ये तुमच्या टेस्टचा, शुगर फ्री टाकून झकास चहा मिळतो. आधी तो घेऊ या. घरी पुन्हा घेता येईल.” — वहिनी.
*”आणि हो, बाहेरचं पाणी चालत नाही न तुम्हाला, हे मिनरल वॉटर आणलंय.”*
*आता मात्र मला हुंदका आवरेना. तशी वहिनीने एकदम मला आपल्या जवळ ओढले. मिठीत घेऊन वात्सल्याने ती माझी पाठ थोपटू लागली. मी जे सांगू शकले नाही ते वहिनी समजून गेली होती.*
*माझ्या लग्नात बिदाईच्या वेळेस ताईने मला असेच मिठीत घेतले होते. ताईला न सापडलेला संसाराचा सूर मला मात्र गवसला होता.*
*एका सुनेच्या भूमिकेतून वहिनीच्या विशाल मनात आमच्यासाठी प्रेमाचा अथांग महासागर ओतप्रोत होता. आम्हालाच आतापर्यंत त्याचा थांग लागला नव्हता.
*फ्री वे ला खिडकीच्या फटीतून झुळझुळ हवा आत आली. कधीपासून आईच्या चष्म्याच्या फ्रेमला अडकून पडलेल्या अश्रूबिंदूंना मोकळी वाट मिळाली.
-प्रकाश बोकारे,
नागपूर.
*(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
ReplyForward
|