प्रेम म्हणजे न मांगता देणं

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    माणूस हा भावनिक नात्यांची विण गुंफणारा सहोदर आहे. आपल्याला जर जग जिंकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेम ह्या शब्दांनीच जिंकता येतं. प्रेमाशिवाय जीवन म्हणजे मृत्यूतत्त्वांचा नुसता अंधारकल्लोळच असतो .आई-बाबा, भाऊ-बहीण, नाते-गोते,मित्र-मैत्रिणी असे विविध नाते प्रेमाने मोहरून येतात. त्याचा सुवास सदोदित दरवळत असतो. पण त्या प्रेमाला माणुसकीची किनार असावी लागते. भावनिकतेचा ओलावा असावा लागतो .मातृत्वाची किनार असावी लागते. आपल्या मनात जोपर्यंत निखळ व स्वच्छ भावगर्भ निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण खरच प्रेम करतो काय..? हा यक्षप्रश्न माझ्या मनाला पडत असतो .संत कबीर आपल्या एका दोह्यात लिहितात की,

    पोथी पढि-पढि जग मुआ पंडित भया न कोय।
    ढाई आखर प्रेम का पढै सौ पंडित होय ।।

    आपण कितीही ग्रंथाचे पारायण केले पण जर लोकांशी प्रेमाने वागलो नाही तर त्या पारायणाला काहीच अर्थ उरत नाही.

    प्रेम ही एक अनमोल अशी देणगी मानवाला लाभलेली आहे. हृदयगम्य स्पंदनाचे तरंगमय तार म्हणजेच प्रेम होय. तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या पंचशीलातील पहिले तत्व प्राणीमात्रावर प्रेम करावे.. हे दिलेले आहे .तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा मानवतेच्या प्रेमावर उभा आहे. कारण त्याचा पाया हा बंधुत्व आहे.ते आपल्या तत्त्वज्ञानात म्हणतात की, “द्वेषाने द्वेष कधी संपत नाही. हा केवळ प्रेमाद्वारे संपुष्टात आणला जाऊ शकतो. हे एक नैसर्गिक सत्य आहे .” तर पुढे म्हणतात की,

    सब्बे सत्ता सुखी होन्तू
    सब्बे होन्तू च खेमिनो
    सब्बे भद्दानि पस्सन्तू
    मा कच्चि दुःखमागमा।।

    ही सर्व प्राणीमात्रा विषयीची कळवळ त्यांच्या शिकवणीतून आपल्याला दिसून येते.

    आज प्रेमाला विविध उपमा दिल्या आहेत. काही तर प्रेमाला कलुषित नजरेने पाहतात. मित्र मैत्रिणीच्या नात्याला जाती, धर्म, भाषा, पंथ, रंग यावरून पाहत असतात. पण प्रेमाला कोणतेच बंधन अडकवू शकत नाही. प्रेमाची निर्मयता जगाला आपल्यासमोर झुकवू शकते. संहारक यंत्राचा वापर करून जगातील युद्धे महायुद्ध आपण जिंकू शकत नाही. तर ते फक्त प्रेमाने व शांतीनेच जिंकता येते.

    प्रेम कुणालाही विकत घेता येत नाही. प्रेम कर म्हटलं तर प्रेम होत नाही. प्रेम हा आंतरिक मनोमिलनाचा सृजोत्सव सोहळा असतो. आम्रवनातील मधुर गंध आम्रबहार असतो .वसंताच्या फुलातील गंधकोष असतो .मानवी हृदयातील कंपगतीचा श्वास असतो. कवी यशवंत मनोहर यांनी उजेडाचे महाकाव्य या कवितेत प्रेमस्विनीच्या ओढीचा अविष्कार अत्यंत निरामयपणे रेखाटलेला आहे.

    प्रेमस्विनी. ..!
    मी दुःख मागे धावायचो
    वाऱ्याच्या काचानी फाटायचो
    माझ्या अश्रूंच्या कुशीत दडायचो आता
    तुझ्याच कुशीत हा ज्वालामुखी कवितेचे ताटवे फुलवितो
    प्रेमस्विनी…!
    मी विनाशाच्या दरीतून काठावर आलो
    तुझा हात धरून
    मी नव्या ऋतू सोबत झुललो
    तुझ्या हृदयात बसून
    मी उजेडाचे महाकाव्य लिहू लागलो तुझा हात हातात घेऊन ….
    प्रेममयी भावजीवनाला मोठ्या खुबीने कवीने प्रस्तुत केलेले आहे.

    आज व्हॅलेंटाईन डे ला देशात विरोध होतो. जात धर्मातील तरुण-तरुणीला अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागते.यावरून असे लक्षात येते की माणसातील विकृती व विषमतेच्या भिंती अजूनही गळून पडल्या नाहीत. उच्चशिक्षण घेणारे अनेक महाभाग प्रेमाला विरोध करतात .ऑनर किलिंग, लवजेहाद अशा विविध वृत्तीतून समाजाला घातक रोग लागलेला आहे .हा रोग फक्त प्रेमानेच दूर केल्या जाऊ शकतो .कारण प्रेम म्हणजे तरुणाईच्या वेलीवर उमललेले नाजूक फुल असते. तसेच ऊर्जादायी अग्नीगर्भ असतो. मानवाच्या सुंदर नात्याला गुंफण्याचे काम प्रेम करते. त्याचे विविध रंग आज दिसत असले तरी माणुसकीचे प्रेम हेच खरे प्रेम आहे. कवी कुसुमाग्रज आपल्या कवितेत लिहितात की,

    प्रेम करावं भिल्लासारखं
    बाणावरती खोचलेलं
    जमिनीवर उगवून
    आकाशापर्यंत पोहोचलेलं…

    प्रेमाला एका बंधनात गुंफता येत नाही. प्रेम हे जिवंत माणसाची शक्ती आहे. तो मानवाच्या जीवनाला फुलवणारा मूल्यसापेक्षकोच आहे. धर्माधिष्ठित व जातीधिष्टीत मानवाला हरवणारा हाच एक शस्त्रज्वाळ आहे. प्रेम या विषयी माझी कविता मला आठवते की,

    तुझ्या खोलं खोलं डोळ्यातं
    मन माझं भरलं होतं
    तुझ्या हृदयाच्या स्पंदनात
    प्रेम तरंग उमटलं होतं..
    पहिल्या मृगाचं पावसानं
    गंध सुटला मातीतं
    कोवळं फुटलं अंकुर
    नव्या कोऱ्या बीजातं..

    प्रेमाने जग जिंकता येते. प्रेमाने आपण आपले भारतीयत्व टिकवू शकतो .तरुण-तरुणाईने थोडे सजग व्हावे .प्रेमात आकंठ बुडून न जाता आपले जीवन कसे फुलेल याचा पण विचार करावा. आपल्यामुळे स्वतःला व इतर सहकाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेम निखळ व स्वच्छ करावे. न भिणारे प्रेम माणसाला उच्चक्रांतीसाठी महाऊर्जा देतात. कधी प्रेमात यशस्वी तर कधी प्रेमात अयशस्विता होतो .पण प्रेम हे प्रेमच असते .काही न मागता माणसाच्या भल्यासाठी, भारताच्या नवनिर्मितीसाठी ,बुद्धाच्या शांतीसाठी, जगाच्या उत्थानासाठी प्रेम अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मला वाटते प्रेम म्हणजे न मागता देणे ..

    प्रा.संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Leave a comment