” बालपणीचा काळ सुखाचा “
[ भाग १ ]
“जिव्हाळा” (पूर्वीचे लग्न)
आमच्या बालपणी लग्न म्हणजे एक आनंद सोहळा असायचा . लग्न एक महिना लांबच आहे तर जवळच्या पाहुण्यांची जमवाजमव सुरू झालेली असायची . आताच्या काळाएवढी दळणवळण आणि संदेशवहनाची मुबलकता नसल्याने किमान वीस ते पंचवीस दिवस अगोदर पत्रिका पोहचवणे आणि मु-हाळी जाणे या प्रक्रिया सुरू व्हायच्या. जवळचे नातेवाईक जसे आत्या, मावशी, मावस भाऊ, मावस बहिणी ,आते भाऊ, आत्या बहिणी, चुलत बहिणी, या किमान आठ ते दहा दिवस अगोदर पोहोचलेल्या असायच्या .घर अगदी भरलेले “गोकुळ ” होऊन जायचं .सर्व एकत्र आले म्हणजे चालणाऱ्या गमतीजमती आणि हास्यविनोदात सर्व न्हाऊन निघायचे.
त्याकाळात एवढी सधनता ,संपन्नता नसली तरी मनाची श्रीमंती मात्र ओसंडून वाहत होती . बारामाही वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे.
घरामध्ये जरी जागा कमी असायची परंतू मनात प्रेमाची उणीव नसायची.मातीची घरं जाऊन सिमेंटची घरं झाली.दोन रूम च्या चार रूम झाल्या , परंतु मनाचा कप्पा मात्र संकुचित झाला. आलेले पाहुणे म्हणजे साऱ्या गावाचे पाहुणे . त्या काळात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाचं शेतात गराडे केलेले असायचे. जेवण झाले कि झोपायला शेतात. एक पट्टी टाकली की सर्व पाहुणे एकाच रांगेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने चांदण्या टिपोर रात्री गप्पाची उधळण करता करता केंव्हा झोप लागायची ते कळायचे नाही.
लग्न हे केवळ ज्याच्या घरी आहे त्याचं नसायचं तर ते पूर्ण गावाचं असायचं .
एक महिन्या पासून लगनघरी गहू निवडायला ,डाळी निवडायला गावातील बाया जमा होत. लग्नाच्या दिवशी मांडवाच्या दारी त्या सर्वांना बांगड्या भरल्या जायच्या.
मु-हाळी जाणे पत्रिका वाटणे हे कामं वाटून दिलेली असायची. कुठेही कोणाचाही नकार नसायचा.
लग्न आठ दिवस पुढेच आहे तं गहू दळण्यासाठी सर्वजण हजर .
लग्नासाठी लागणारे जळतन तोडायला ही भाऊकीतील मंडळी हजर असायची. तीन-चार दिवसात एवढे जळतन तोडले जायचे कि लगन घरी ते वर्षभर पुरेल.
लग्न जुळले की तेंव्हा पासूनच पत्रावळी आणि द्रोण बनविण्याचे काम सुरू होऊन जायचे . दुपारी शेतातून येतांना पोते -दोन पोते पळसाची पाने तोडून आणलेली असायची. दुपारी सर्व मंडळी लगन घरी जमायची चहाच्या घोटासोबत ,गप्पाच्या मैफिलीत पत्रावळी तयार केल्या जायच्या.आठ पंधरा दिवसात पाहुण्यांना पुरेल एवढ्या पत्रावळ्या तयार व्हायच्या.
कारण गावातील सर्वजण त्या काळात ताटपेला घेऊन जेवायला यायचे.
लग्नामध्ये जर बुंदी ठेवलेली असेल तर बुंदी काढण्याचा कार्यक्रम लग्नाच्या अगोदरच्या दिवशी रात्री ठेवलेला असायचा. आचाऱ्याला मदत करण्यासाठी किती तरी मंडळी हजर असायची. बुंदी तळणे, तळलेली बुंदी सुकवायला टाकणे,सुकलेली बुंदी कोठ्या मध्ये भरून ठेवणे या प्रक्रिया मध्ये पूर्ण रात्र जायची.
जसे लग्न जवळ यायचे गोतवळा वाढत जायचा . लग्नाच्या दिवशी दारी हिरवा मांडव टाकण्याची पद्धती तेंव्हाही होती आज ही आहे. त्या मांडवा साठी जांभळीच्या डहाळ्या कोणी तोडून आणायच्या याची जबाबदारी सोपवलेली असायची. हिरवा मांडव टाकण्याच्या अगोदरच भाऊकीतील सर्वजण जमा झालेले असत .अंगणात पट्ट्या टाकून ठेवलेल्या असत. डफडे वाजायला लागले की गावातील लोक त्या आवाजाने जमा व्हायला लागायचे .बाहेर लोक जमायला लागले की घरात एका मोठ्या पातेल्यात चहा उकळायला सुरुवात झालेली असायची. लोक जमा होत असतांना तडफदार कार्यकर्ते उठून मांडव टाकण्याची तयारी करत. तोपर्यंत गावातील वारीक (न्हावी) ताटात कुंकवाचा करंडा घेऊन जमलेल्या या सर्वांना कुंकू लावण्याचे काम करत असे. कुंकू लावून होताच दुसऱ्या एका ताटात
बिडयांचे बंडल असायचे. वारकाने ते बंडल फिरवून आणले की जे बिड्या ओढतात त्यांनी झुरके मारायला सुरुवात केलेली असायची. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची ही पूर्वापार चालत आलेली परंपरा!!!
चार डिळी रोवून त्यावर बंधाट्या बांधून मांडवाची तयारी होत नाही तोपर्यंत सर्व जण गप्पांमध्ये रंगून जायचे. सोयरे असलेल्यांची हसी मजाक, थट्टा मस्करी चालायची .त्यातच मग गप्पांच्या सोबतीला चहा आलेला असायचा. सर्वांचा चहापाणी झाला की लगेच सर्वांनी उठायचे व जांभळीच्या त्या छोट्या डहाळ्या घेऊन तयार केलेल्या त्या मांडवावर डहाळ्या टाकायच्या .जणूकाही प्रत्येक जण प्रत्येक डहाळी सोबत आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद लगीन घरी देत आहे. हिरवा मांडव टाकून झाला म्हणजे लग्नाच्या दिवसाच्या कार्याची सुरुवात झाली.
त्यानंतर लगेच तरुण मंडळी कापडी मांडव टाकायच्या कामाला जायची .एकदा कापडी मंडप पडला की त्यावर सुरू झालेल्या लाऊडस्पीकर वर सुरुवातीच्या सुखकर्ता दुःखहर्ता सह एक दोन आरत्या वाजल्या की दिवसभर त्या काळातील सुपरहिट हिंदी ,मराठी चित्रपटांची गाणी चालू असायची. वाजणा-या प्रत्येक गाण्याबरोबर जिकडेतिकडे आंनद आणि उत्साह ओसंडून वाहयाचा…
मंडपाच्या बाजूला स्वयंपाकाची लगबग सुरू झालेली असायची. गावातील सर्व जेष्ठां सह तरुण मंडळी तिथे हजर झालेले असायचे . जेष्ठ मंडळी जमून विचार करायचे कि लग्न कोणत्या गावचे ? किती पाहुणे येतील ? गोतावळा कसा आहे ? हे पाहून गावात पीठ किती वाटायचे ? वांगे किती लागतील ? शिदा वाटायचा असेल तर किती दयायचा ? या सर्व चर्चा होऊन योग्य त्या सूचना मिळाल्या कि तरुणांनी कामाला लागायचे.
मग जमलेले सर्वच जण जळतन ,भांडी, सामान तिथे पोहोचविण्याचे काम करायचे .काही लागले कि बिनदिक्कतपणे लग्न घरी जायचे व हक्काने जे वाटेल ती वस्तू घेऊन यायची त्या वेळेस कोणालाही परवानगीची आवश्यकता नसायची .
ती तयारी होत नाही तं आपल्या घरचे विळे आणि पावश्या घेऊन वांगे चिरायला मंडळी मंडपात आलेली असायची.
आताच्या सारख्या त्या काळात पाणीपुरवठा योजना आलेल्या नव्हत्या ,त्यामुळे स्वयंपाकासाठी आणि पंगती साठी पाणी भरपूर लागायचे. तेंव्हा सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन डोक्यावर पाणी आणतांना पाहिलेले आहे .तर काही वेळा बैलगाडी वर ड्रम ठेवून हि पाणी भरले जायचे.
सकाळ पासून हिरवा मांडो टाकणे, कापडी मांडो टाकणे, स्वयंपाकाची तयारी करणे, पाणी भरणे हे सर्व कामे करून जोराची भूक लागत असे.
तोपर्यंत लगन घरीच खमंग बेसन -भाकरी तयार झालेल्या असायच्या. काम करून थकल्या मुळे बेसना वर येथेच्छ ताव मारायचा.
दुपारची वेळ होता होता लाऊडस्पीकर वरून दादा कोंडके च्या ” घ्याल काहो राया एक शालू बनारसी ..पासून ..एक रुपया हरवला ‘ पर्यंतची जनमाणसात लोकप्रिय गाणे हमखास वाजयचे. हिरो , सरगम ,मैने प्यार किया ,राम लखन, बेटा, साजन, दिल पासून सुरू झालेला गाण्यांचा प्रवास गोविंदा च्या ‘पक चीक पक राजा बाबू ‘ पर्यंत पोहचलेला असायचा.
लगनसराईचा काळात गावातील कोणाचीही चर्चा ऐकली तर तुम्हाला हेच ऐकू येईल की “आता तर या महिन्यात खूपच लग्न आहे.” “अमूकजीच्या घरचे झाले की तमुकजीच्या घरचे” .”त्याचे झाले की त्याच्या घरचे.” शेतामधील कामांची मुहूर्तही अमुक अमुक लग्न झाले कि काढले जायचे .
नवरदेव वा नवरीला त्यांच्या करोल्या सह गावभर शेवया,चहा साठी बोलावत असत. करोल्यानां त्यांच्या सोबत फिरणे म्हणजे कोण आनंद !
दुपारी चार पाच पर्यंत स्वयंपाक तयार झालेला असायचा .लग्न जर गावात लागायला आलेले असेल तर आल्याबरोबर पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी मंडळी तयारच असायची त्यानंतर लगेच रंगीत सरबत वाटले जायचे .
लग्नापूर्वीचे विधी आटोपले की मध्ये जो अवकाश असायचा त्या काळात शेतात असलेल्या आपल्या गुरा ढोरांना चारापाणी करून यायचे कारण एकदा लग्न लागले की सर्व पंगती ची निरापिरी होईपर्यंत कोणीही मंडप सोडत नसे.
बुंदी ,भाजी ,सादन (डालडा) हे कुणी वाढायचं ते ठरलेले असायचे . आजही वरील वस्तू आठवल्या म्हणजे विशिष्ट चेहरे डोळ्यासमोर येतात . उरलेले इतर उदक, वरण, पोळ्या वाढायला आहेचं.
पंगती जेंव्हा चालायच्या तेव्हा लाऊडस्पीकरवरून अहिरांची यादी वाचणे सुरू व्हायचे .दोन रुपयापासून असलेले आहेर मला आजही आठवतात. आहेर वाचणे होत नाही तर लाऊडस्पीकरवरून “तुला दिल नाही ग ! दिलं नाही वनांमदी । तुझा सासरा ग ! सासरा बापावानी ।।
अन तुझी सासू ग! सासु आई वाणी ।। अशी गाणी सुरू झालेली असायची. आणि विशेष म्हणजे ती गाणी अर्थपूर्ण असायची. गाणी म्हणणाऱ्या मुली ठरलेल्या . त्यांचे लग्न होईपर्यंत तो वारसा त्यांनी कुणाकडे तरी दिलेला असायचा. तिकडे जेवणाच्या भर मोसमात पंगतीमध्ये श्लोक म्हणण्याची ‘जीवघेणी ‘स्पर्धा सुरू झालेली असायची .ते चालू असतानांच वरमाय आपल्या सर्व जावांसह पंगतीमधून तांदूळ पेरून गेलेली असायची .अशा तीन चार पंगती झाल्या की घरातील गावातील मुख्य माणसांची पंगत शेवटी व्हायची . त्यानंतर फळ भरणे हा कार्यक्रम व्हायचा. मला तरी वाटते या कार्यक्रमाचा उद्देशच असा असावा कि दोन्हीकडील भाऊकीची चांगली ओळख व्हावी.
मध्यरात्र होता होता
नवरीला वाटी लावण्याचा कार्यक्रम यायचा .आई वडिलांना कायमची पोरकी होणारी मुलगी धाय मोकलून रडायची. तिचे ते रडणे पाहून तिच्याबरोबर सर्वांना रडायला यायचं. नवरी वाटी लावताना वाद्याचा आवाज कानावर आल्याबरोबर झोपेत असलेले बरेच जण उठून नवरीला वाटी लावायला यायचे.
लग्नानंतर दोन किंवा तीन दिवसांनी मुलीला घ्यायला जाण्याचा कार्यक्रम असायचा त्याला घाटावर “ओवाळणे” म्हणतात. ओवाळन्याला जवळचे नातेवाईक धरून शे-सव्वाशे माणसं सहज जायची. त्या निमित्ताने मुलीकडील सर्वांना मुलीचे गाव ,घर पाहण्याचा योग असायचा.
आज जर आपण या गोष्टींचा विचार केला तर तो नातेवाईकांचा गोतावळा, पंधरा दिवसापासून जमा होणे, जळतन तोडायला जाणे,दळण दळायला एकत्र येणे, विहीरी वरून पाणी भरणे, ते रात्री जागून बुंदी काढणे, कापडी मंडप टाकायला सर्वानी हजर राहणे, शेवटच्या पंगती पर्यत वाढू लागणे, पोळ्या गावातच बनवणे, नवरीला वाटी लावायला सर्वानी हजर राहणे, अशा अनेक गोष्टी काळाने खाऊन टाकल्या परंतु त्याच बरोबर निरागस माणुसकीला हि त्याने संपवले.
कालोघात हा जिव्हाळा ,हे प्रेम कुठे हरवले ?कोणी हिसकावले ? ते कळलेच नाही.आता फक्त उरली आहे औपचारिकता. फक्त कोरडी औपचारिकता . प्रेम केंव्हाच निघून गेलयं.
जसजशी सधनता येत गेली ,प्रगती होत गेली .प्रत्येकजण आपल्या अहंकारात गुरफटत गेला . निरागस प्रेमाची जागा स्वार्थाने घेतली. मी आजही शोधतोय त्या हरवलेल्या प्रेमाला. जिव्हाळ्याला.!!
धनराज कन्नर
खामगाव
जि.बुलढाणा
9881229504