वर्तमान पेपर ‘पुढारीने’ घडवून आणलेल्या उपक्रमात अनेक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला पाहून खरंच समाधान वाटलं. कित्येक विद्यार्थी कलाम साहेबांच्या वेशभूषेत वर्तमान पेपर वाटताना दिसत होते. एवढेच नव्हे तर “मी डॉक्टर अब्दुल कलाम बोलतोय” या सदराखाली आपले स्वगत व्यक्त करताना पाहायला मिळाले. यानिमित्ताने का होईना कित्येक विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांचे चरित्र चाळायला सुरुवात केली.
डॉक्टर कलाम साहेब बनून रस्त्यावर उतरलेली मुलं पाहताना खरंच कलाम साहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं? पुढारीने राबवलेल्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला हे पाहून कदाचित कलाम साहेबांना पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटलं असेल. ज्या काळात त्यांना वाचनाची भूक भागवण्यासाठी वर्तमान पेपर विक्रेता व्हावे लागले, ज्ञानाची खूप काय असते? वाचनानंतर मिळणार समाधान काय असतं? हे सांगण्यापेक्षा अनुभवाने जास्त समजतं, हे कलाम साहेबांनी प्रत्यक्ष अनुभवलं होतं.
परंतु आजकाल वर्तमान पेपर तर सोडाच शाळेतील क्रमिक पुस्तकांची देखील आवड कमी झाली आहे. हल्ली पुस्तकातल्या ज्ञानाबरोबरच मोबाईलवर मिळणाऱ्या ज्ञानाची भूक अधिक वाढली आहे. असं असताना देखील एक दिवस का होईना मुलांना वर्तमानपत्र विक्रेता म्हणजे किती कष्ट असतं? हे समजलं. ऊन, वारा,पाऊस याला न जुमानता, महापुरात मरण समोर दिसत असताना देखील देशभराच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणारे विक्रेते आणि त्यांची कष्ट याची नकळत जाणीव झाली असावी.
एक दिवसाच्या उपक्रमात कित्येक मुलांनी वर्तमानपत्र पहिल्यांदाच हाताळले असेल हेही नाकारता येत नाही. कारण एका क्षणात शेकडो वर्तमानपत्र मोबाईलवर ओपन होत असताना चार पाच रुपये खर्च करून प्रत्यक्ष पेपर वाचण्याची गोडी फारशी राहिली नाही हे ही तितकच खरं. मात्र मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर पेपर वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष कागदावर वाचन हे नेहमीच परिणामकारक असते आणि प्रत्यक्ष वाचनाची मजा ही काही औरच असते हे मात्र नक्की. म्हणूनच अनेक गावातून नारा ऐकू येत होता, “मोबाईल टाळा आणि वर्तमान पेपर चाळा”.
परंतु काही म्हणा वर्तमानपत्र विकून डॉक्टर कलाम यासारखी एखादी व्यक्ती एवढी मोठी होऊ शकते हे वास्तवच कल्पनेच्या पलीकडचे आहे. कलाम साहेब खूप कष्टातून शिकले हा आदर्श जसा या उपक्रमातून प्रकाशाने दिसतो तसाच वाचनाची जनजागृती आणि वर्तमान पेपर विक्रेत्यांचा टाहो देखील या उपक्रमातून आपल्याला निदर्शनास येईल.
अनेक पिढ्यांचे आदर्श आपण बघतो जे आदर्श खूप कष्टातून मोठे झाले आहेत याचा अर्थ असा नव्हे की मोठे होण्यासाठी गरिबी असावी लागते पण यश मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न ही देखील एक तपस्याच आहे. कुठलंही काम कमी प्रतीचं नसतं हेही आज मुलांना नक्कीच उमगलं. हा दिवस पाहून असे अनेक मिसाईल मॅन निर्माण व्हावेत असे नक्कीच कलाम साहेबांना वाटले असेल. अग्नि पृथ्वी यावरच समाधान न मानता नव्या पिढीने जागतिक पातळीवर भारताला याहीपेक्षा उच्च स्थानावर न्यावं, असेही कलाम साहेबांना वाटलं असेल. वाचण्यापेक्षा किंवा टीव्हीत बघण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव मुलांना बरंच काही सांगून गेला हे मात्र नक्की.
- -सौ आरती अनिल लाटणे
- इचलकरंजी