आधुनिक तंत्रज्ञान आलं अन् हल्लीची युवापिढी गगनाला गवसणी घालू लागली. त्यांच्या आशा अपेक्षांची झेप वाढली. परंतु मने कोती झाली. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या, विस्तारल्या पण विचारशक्ती कुंठित झाली. माणूस सातासमुद्रापार प्रवास करू लागला. नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी, पगार वाढवून मिळण्यासाठी बॉस किंवा कलिगना हांजी हांजी करू लागला. परंतू घरातल्यांची पत्रास ठेवेनासा झाला. त्यांची किंमत पायपूसणीसारखी झाली. बुद्धीची उंची खूप वाढली, परंतु हृदये आकूंचित झाली.आपले कोण आणि परके कोण याचा सारासार विचार करण्याची कुवत नाहिशी झाली.सख्खा भाऊ पक्का वैरी झाला. आई वडिलांची जागा शहरातल्या बागेमधल्या बाकड्यांनी आणि गॅलरीतल्या झोपाळ्यांनी भरू लागली.साक्षरतेचे नारे लावले गेले. पण स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन निरक्षर आई-वडिलांना घरात जागा नाही. घरे महालाप्रमाणे झाली, पण त्यात कुत्र्या मांजराना ठेवले गेले. जन्मदात्या आई वडीलांना गॅलरीतला एक कोपरा पुरेसा झाला.
शरीराची उंची वाढली परंतु व्यक्तिमत्त्वाची उंची ढासळली. आज सुखलोलुपता, चंगळवाद आणि पैसा यांचे स्तोम वाढले. त्याच्यापुढे रक्ताचीही नाती फिकी पडली. देवधर्म, कुळाचार, उपास-तापास आऊटडेटेड झाले. गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरचे कुंकू गावंढळपणाची साक्ष झाली. पूर्वी आनंद मिळविण्यासाठी माणूस घरात विसावायचा, आई-वडिलांशी गप्पा मारायचा, खरेदी करताना आई वडिलांचा सल्ला घ्यायचा. पण आज निरक्षर आई-वडिलांना काय कळतेय असा न्यूनगंड निर्माण झाला. पूर्वीचे चौसोपी वाडे आणि त्यांचे दरवाजे दारातून आल्यागेल्याला आणि अतिथींसाठी सतत उघडे असायचे. आता फ्लॅटचे नि मनाचेही दरवाजे लॅचबंद झाले. कामापुरतेच घराबाहेर पडायचे, शेजारधर्मही हाय-हॅलो करण्याइतकाच सीमित झाला. पैशांचे, पगाराचे पॅकेज भरमसाठ झाले. परंतु नात्यांचे पॅकेज बोटावर मोजण्याइतके, तेही गरजेपुरतेच. सुखलोलुपतेपुढे इतरांचे अस्तित्वही नको वाटू लागले.
पूर्वीच्या काळी रविवारी घरात पाहुणे येणे यजमानांच्या अगत्यशील पणाचे द्योतक असायचे. आज रविवारी पाहुण्यांसाठी dnd चाच जणू बोर्ड लावलेला दिसतो. किंवा रविवार हा फक्त फिरणे, शॉपिंग करणे ,सिनेमा, हॉटेल यासाठी राखून ठेवलेला दिसतो. त्यामुळे पाहुणे घरी येऊन त्यांच्यासाठी खस्ता खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी गावातील मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी मिळून देवधर्म किंवा तीर्थयात्रेला एकत्र जात. गावातील सण, सोहळे, जत्रा, यात्रांच्यावेळी एकत्र येऊन आनंद लुटत. आता मात्र देवालाच कुलपात बंद ठेवून हिलस्टेशनला चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबातील सदस्य जाताना दिसतात. यात्रेला फिरण्याची मजा लुटण्यात जो आनंद मिळायचा तो युरोपभर फिरूनही हिरावल्याप्रमाणेच वाटते. जन्मदाते आई-वडीलच अडगळ वाटू लागले, तिथे इतर नात्यांची काय पत्रास! मन मोकळं करून हासू किंवा रडू शकत नाही. फक्त कुढलेली मनं घेऊन चेहऱ्यावरची इस्त्रीची घडीही न बिघडवता जगणे होऊ लागले आहे.
अशा या तणावपूर्ण वातावरणात जगणे म्हणजे रोजचे स्मरण असे वाटते. त्याच्यामुळे हृदयविकार, मधुमेह, बीपीच्या रोगांनी शरीरात कायमचे घर केलेले दिसते. हास्याचे फव्वारे फक्त हास्यक्लबला गेल्यावरच ऐकायला मिळतात. तेही नकली, ओढून ताणून आणलेले. एरव्ही चेहरा मात्र कडक इस्त्री केल्यासारखा. त्याग, दातृत्व, आनंद हे शब्दच जीवनातून वळलेले दिसतात.त्यांची जागा आता कृत्रिमतेने घेतलेली दिसते. एखाद्याला नकळतपणे फुटलेले हसू ही वेडात गणले जाते.’सुख सांगावे जनात, दुःख लपवावे मनात’ ही स्थिती झाली आहे. नकली हास्यामुळे नैसर्गिक जगण्यातली मजाच निघून गेली आहे. मनाची श्रीमंती लोप पावली आहे. सुख आणि आनंद हे जगण्याचे घटक न राहता, पैसा हे जगण्याचे मुख्य घटक बनले आहे. ” जास्त पैसेवाला जास्त सुखी” अशी सुखाची व्याख्या हल्ली बनली आहे. माणसाला जगायची सोडाच परंतु मरण्याचीही पर्वा वाटेनाशी झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाने माणसाच्या ज्ञानाची झेप जशी वाढली असली तरी हृदये आकूंचित झाल्याने वर्तमानकाळ अन् भविष्यकाळही दुष्कर बनला आहे.
दुसऱ्याची प्रगती डोळ्यात खुपू लागली आहे. ईर्षा आणि संशय यांनी हृदयात घरटे बनवले आहे. त्यामुळे दुसऱ्याचा विचार मी का करू? अशी वृत्ती वाढत आहे. संतांनी शिकवलेले न्याय, समता, बंधुता, निरपेक्षवृत्ती सर्व काही ग्रंथांमध्ये बंद होऊन गेलेले आहे. जग जवळ येऊ लागले आहे अगदी हाताच्या अंतरावर. पण मनाचं अंतर कोसो दूर जाऊ लागले आहे. मन चपळ आणि चंचल होत असतानाच ते इतके चपळ झाले आहे की पापणी फडफडविताच बदलू लागले आहे. ते
इतके हळवे, भावनाप्रधान राहिले नाही तर ते राकट, कणखर नि स्वार्थी बनले आहे .त्याला अडविणारी शक्ती आता मनुष्यात राहिलीच नाही.
चपळ मन मानवाचे
नावरेच आवरताना
नसे पडत गुंतुनी ते
पळे दूर सावरताना
आयुष्याच्या खडतर प्रवासात माणुसकीचा लोप होऊ लागला आहे. अगदी शेवटच्या क्षणीही पैसा किती नि कुठे आहे याचा विचार केला जात आहे. यामुळे नात्यांच्या या अभेद्य भिंती बुरसटलेल्या विचारांनी कमकुवत होऊ लागल्या आहेत .त्यांच्यात भेद होऊ लागला आहे. मनुष्य पैशाच्या इतका पाठी लागला आहे की निखळ हासणेही विसरला आहे. मनात झालेला आनंद इतरांसोबत वाटण्याचेही भान त्याला राहिले नाही. स्वतःतच तो डुबून गेलेला आहे. तो महासागर बनला आहे.
ज्याप्रमाणे महासागरातून प्रवास करताना सभोवताली जलाचा प्रचंड साठा असतानाही तो त्या पाण्याचा घोट घेऊ शकत नाही. अशी गती मानवाची झाली आहे. मोठ्या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. पायाला चाके लागल्याप्रमाणे तो गतिमान झाला आहे. कोण जाणे याचा शेवट कुठे आणि कधी आहे हे काळच ठरवेल.
जीवन गाणे गातच रहावे
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे………..
कुठून तरी रेडिओवर गाण्याची मंद, सुरेल लकेर कानावर पडत होती आणि मन भूतकाळाची सांगड घालण्यातच गुंतून गेले.
सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835