बुलडाणा : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा शहर व संपूर्ण जिल्ह्यात दिवाळी व अन्य सण उत्सवांच्या अनुषंगाने अन्न पदार्थ तपासणीची विशेष मोहिम अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत विविध स्वीट मार्ट, उपहार गृह व इतर अन्न पदार्थ विक्रेते अशा एकूण 47 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 61 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये मिठाईचे 12 नमुने, विविध प्रकारच्या खाद्यतेलाचे 20, मैदा, रवा, बेसन यांचे 6 नमुने, मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर व इतर मसाले यांचे 10 नमुने, दुध 6 नमुने व इतर अन्न पदार्थांचे 5 अन्न नमुन्यांचा समावेश आहे. सदरचे सर्व नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याअनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार भविष्यातही अन्न पदार्थ तपासण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. जेणेकरून जनतेस निर्भेळ व चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ उपलब्ध होतील. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके व श्री वसावे यांनी सहभाग घेतला. अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास जनतेने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) स. द केदारे यांनी केले आहे.