· जिल्हा प्रशासनाचे आवाहन
· कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे
· रात्री 10 नंतर फटाके उडविण्यावर बंदी
बुलडाणा : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या कोविड 19 नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत असले तरी कोविड 19 ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी. या दिवाळीत सोशल डिस्टसिंग, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे व वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा अवलंब करावा. फटाक्यांच्या धुरांचा कोविड बाधीत रूग्णांना त्रास होवू शकतो. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच सर्व खाजगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा. कोविड बाधीत रूग्णांना त्रास न होण्यासाठी कमी आवाजाचे तसेच कमी धूर होणाऱ्या फटाक्यांचा वापर करावा. नागरिकांनी कोविड विषयक योग्य ती खबरदारी घ्यावी. दिवाळी काळात सोशल डिस्टसिंग व सॅनीटायझेशन नियमांचे पालन करावे. कोविडच्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने दिवाळीचे दिवे लावताना तसेच फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापर टाळावा. दिवाळी काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये. अशा कार्यक्रमांना परवानगी नाही. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावे. फटाके केवळ घराच्या आवारातच फोडता येतील. तसेच आकाशात उडणारे आतीषबाजीचे फटाके, मोठ्या प्रमाणात धूर होणारे फटाके व मोठा आवाज करणारे फटाके वाजविण्यावर बंदी राहणार आहे. रात्री 10 वाजेनंतर फटाके उडविण्यावर बंदी राहणार आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आदेशान्वये कळविले आहे.