अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी विलासनगर येथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. या प्रक्रियेसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून, सुमारे 170 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जारी केला.
अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे मतमोजणी कक्ष क्र. दोनचे प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अकोल्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुखराजन एस., बुलडाणाचे जिल्हाधिकारी एस. राममुर्ती, यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे अनुक्रमे टेबल क्रमांक एक ते तीन, टेबल क्रमांक चार ते सात, टेबल क्रमांक आठ ते दहा, टेबल क्रमांक अकरा ते चौदा यावरील संशयास्पद मतपत्रिका तपासने व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उप आयुक्त (पुनवर्सन) प्रमोद देशमुख, उप आयुक्त (पुरवठा) अजय लहाने, उप आयुक्त (करमणूक शुल्क) विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांच्याकडे अनुक्रमे टेबल क्रमांक एक ते तीन, टेबल क्रमांक चार ते सात, टेबल क्रमांक आठ ते दहा, टेबल क्रमांक अकरा ते चौदा यावरील रो ऑफीसर म्हणून मतमोजणीच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उप आयुक्त (महसूल) गजेंद्र बावणे यांच्याकडे संपूर्ण मतमोजणीचे कार्यान्वयन व समन्वयनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. टपाली मतपत्रिका प्राप्त करुन घेणे व त्याअनुषंगीक आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी उप आयुक्त संजय पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी संदिप अपार (अचलपूर), प्रियंका आंबेकर (दर्यापूर), शरद जावळे (वणी), सुभाष दळवी (सिंदखेड राजा), नितीन हिंगोले (मोर्शी), रामेश्वर पुरी (बाळापूर), निलेश अपार (अकोला), निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे (अकोला), अनिरुध्द बक्षी (यवतमाळ), शैलेश काळे (राळेगाव), स्वप्नील कापडणीस (उमरखेड), आर बी. जाधव (खामगाव), व्यंकट राठोड (पुसद), मनिष गायकवाड (भुसंपादन), इब्राहीम चौधरी (चांदूर रेल्वे), राम लंके (रोहयो) आदी अधिकाऱ्यांकडे मतगणना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मतमोजणीच्या अनुषंगाने इतर कामकाजासाठी सुध्दा अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मतपत्रिका मिसळणे, मतमोजणी निकालाच्या प्रती संकलीत करणे, पिजन होल प्रभार, रिसेप्टीकल, सुरक्षा कक्षाचे प्रभारी अधिकारी तसेच सुरक्षा कक्षातील मोहरबंद मतपेट्या पुरविणे तसेच निकाल जाहिर झाल्यानंतर सिलींगचे काम पूर्ण करणे, निकालपत्र तयार करणे तसेच संगणकीकरण, मिडीया व्यवस्थापन व प्रसिध्दी, भोजन व इतर व्यवस्था, मतमोजणीनंतर मतपत्रिका कोषागारात जमा करणे, मतमोजणी अधिकारी कर्मचारी यांना दैनिक भत्ता वितरण, मतमोजणीचे सर्व रिपोर्टिंग मा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांना सादर करणे आदी कामे सोपविण्यात आली आहे. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने राखीव मतगणना अधिकारी म्हणूनही काही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची मतमोजणीच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर व 2 डिसेंबर रोजी प्रथम व व्दितीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून 2 डिसेंबर रोजी 3 वाजता शासकीय धान्य गोदाम विलास नगर येथे रंगीत तालीम निश्चित करण्चयात आली आहे. उपरोक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियोजित ठिकाणी नेमून दिलेल्या दिनांकास प्रशिक्षण सत्राकरीता तसेच दि. 3 डिसेंबर, रेाजी सकाळी 6 वाजता मतमोजणीच्या कामाकरीता शासकीय धान्य गोदाम, विलासनगर येथे उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहे.
Contents
hide
Related Stories
November 22, 2024