भारतीय राजकारणात हे फक्त स्वार्थी आणि ढोंगी नेत्यांचं मायाजाल झालं असून त्यांना भारतीय संविधानिक व्यवस्थिचं काही देणं घेणं नाही. आपली खुर्ची सांभाळणे व पक्षांच्या नेत्याचे पाय चाटणे अशीच वृत्ती सध्याच्या राजकारणात दिसून येत आहे महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यमेव जयते नावाचा जयजयकार करून,” सत्य सर्वांचे आदी घर,। सर्व धर्माचे माहेर ।।” असे ठणकावून सांगितले असताना आमचे नेते असत्यमेव जयतेचा जयघोष करीत आहेत.
काही नेत्यांचे इतके झटके यायला लागले आहेत की, ते काय बोलतात हे त्यांना समजत नाही .तसेच काही मंत्री हे तर उंटावरून शेळ्या हाकलणारे राखणदारच आहेत. कारण त्यांच्या वक्तव्यातून देशातील वातावरण दूषित होत असताना देशाचे चालक काहीच म्हणत नाहीत. त्यांना जाणून-बुजून तसे बोलण्याची ट्रेनिंगच दिलेली आहे काय असं वाटते.आज कोण धोक्यात आहेत हे माहीत आहे. पण बहुसंख्य समाजाला धर्माच्या ,जातीच्या नावाची गोळी देऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव नक्कीच देशासाठी घातक आहे.
नुकताच आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना दहा टक्के आर्थिक आरक्षण देण्यात आलेले आहे .जेव्हा १०३ वी घटनादुरुस्ती झाली .तेव्हा सत्तेतील एकाही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय खासदारांनी एकही शब्द न बोलता किंवा त्याला विरोध न करता त्यांनी मुकसंमती या घटना दुरुस्तीला दिलेली आहे. गुलाम मेंदूची नवी जमात आपल्या देशात निर्माण केल्यामुळे हे नेते चमचा युगाचे युगनायकच आहेत. त्यांना समाजाच्या प्रतिनिधित्व म्हणून पाठवल्या जाते पण ते खरे प्रतिनिधित्व करत नसून ते हुजुरी करणारे हुजूरदार आहेत.
आज ते नेते पदावर आहेत पण येणाऱ्या काळात जेव्हा पदावरून खाली येतील तेव्हा समाज त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांसोबत ,भारतीय विषमतामय वातावरणात संपूर्ण देशातील घटकांना समानतेमध्ये रोवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अथक परिश्रमाने भारत एकसंघ, एकखंड झाला.
भारतीय संविधान भारतीय समाजाचा श्वास आहे. भारतीय संविधानातून मूल्यवर्धन असा समाज निर्माण झालेला आहे .भारतीय संविधान जगण्याची नवी प्रेरणा आहे. पण आज वर्तमान शासन व्यवस्था भारतीय संविधानाला पायदळी तुडवत आहे .आर्थिक आरक्षणाच्या नावाखाली संविधानाचा मूलभूत ढाचाच उध्वस्त झाला आहे. पाच सदस्य खंडपिठातील न्यायाधीश पादरीवाला यांनी तर कहरच केला .ते म्हणाले ,की एस .सी .आणि एसटी, या वर्गाला फक्त दहा वर्षासाठी आरक्षण दिलेले होते .आता दहा वर्षापर्यंत आरक्षण थांबायला हवे. या न्यायाधीशांनाही समजायला हवे की दहा वर्षापर्यंत आरक्षण कोणते होते. दहा वर्षे पर्यंत आरक्षण राजकीय आरक्षण आहे. परंतु नोकऱ्यामधील आणि प्रशासनामधील अमर्यादित आहे. त्यांचा निश्चित कालखंड सांगितला नाही .जर सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण समाप्त करायचे असेल तर त्या समाजाची उन्नती झाली का याची तपासणी सुद्धा करणे गरजेचे आहे.
जोपर्यंत त्या समाजातील घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत सामाजिक व प्रशासकीय आरक्षण नाकारता येणार नाही. हा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे .पण आर्थिक आरक्षणाच्या नावाखाली आज देशातील व्यवस्था एका निश्चित कप्प्यामध्ये बंदिस्त झाली आहे. या कप्प्यामधून एससी ,एसटी , ओबीसी यांना जाता येत नाही . ही व्यवस्था भारतीय समाज व्यवस्थेला अंधार युगात घेऊन जाणारी आहे. जर आरक्षण नाकारायचे असेल तर देशातील सर्व नागरिकांना आर्थिक समभागाची विभागणी केली पाहिजे. एकाच रेषेवरून धावणारे सर्वजण असतील तर खरा विजेता कोण हे आपल्याला सांगता येते .पण पहिला रेषेतील स्पर्धक आणि शेवटच्या रेषेतील स्पर्धक यांची तुलना होऊ शकत नाही. म्हणूनच आर्थिक निकषावर असलेले आरक्षण हा संविधानिक ढाच्याला उध्वस्त करणार आहे. आर्थिक विकास हा भारतातील लोकांचा होणे अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही.आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना आहेत .त्या योजनेच्या माध्यमातून स्वर्ण समाजाचा तुम्ही विकास करू शकता.
आर्थिक आरक्षण नव्याने लागू केले. न्यायालयीन आरक्षणाची मर्यादा आहे तिचे उल्लंघन आहे.एखाद्या समाज घटकाला तुम्ही जर आरक्षण आर्थिक निकषावर देत असाल तर हा चुकीचा अर्थ आहे .आजही देशातील राष्ट्रपती एका मंदिरात जातात पण त्याला त्या मंदिराच्या गाभार्यात जाता येत नाही. पाणी पिणारा मेघवाल छोटा बालक याला राजस्थानातील शिक्षकाने माठातील पाणी पिलं म्हणून जोरात मारतो .त्यामध्ये मरण पावतो ही संवेदना न्यायाधीशांना का समजत नाही .न्यायाधीशाने केवळआपल्या समाज व्यवस्थेचा विचार करावा का..? जर तसे होत असेल तर न्यायाधीश यांनी खरंच संविधानाचा अभ्यास केला आहे का ..? हे आपण समजून घेतलं पाहिजे .इथे दोष कुणाला द्यायचा नाही परंतु जे सत्य आहे ते आपण मांडले पाहिजे.
आज देशातील माणसांना धर्माच्या नावावर ,जातीच्या नावावर करकचून बांधता येणार नाही. देश हा काही एकाची मक्तेदारी नाही. हा देश जसा तुमचा आहे तसा आमचा आहे .आम्ही भारताचे लोक आहोत. भारताचे भाग्यविधाते आहोत .भारताचे मूलनिवासी आहोत. म्हणून देशातील बांधवांनो तुम्हाला आता एक निश्चय करावा लागेल.
● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
तुम्हाला आता तर्कशास्त्र वापरावा लागेल. तुम्हाला विज्ञानवाद वापरावा लागेल. विचार करून एक प्रश्न स्वतःलाच विचारावा लागेल. तुम्हाला धर्म हवा की देश, तुम्हाला शाळा हवी की मंदीर, तुम्हाला समता हवी की समरसता, तुम्हाला बंधुभाव हवा की शत्रुत्व ,तुम्हाला भारत हवा की हिंदुस्थान, तुम्हाला शांती हवी की अशांती, तुम्हाला बुद्ध हवा की युद्ध .हे आपण समजून घेतले पाहिजे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक घटक, स्त्रीवर्ग यांना धर्मानी काय दिले. सर्व काही दिले ते संविधानाने.
संविधान निर्मितीनंतर इथल्या संपूर्ण समाज व्यवस्थेत अमुलाग्र बदल झालेला आहे. सामाजिक ,आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञानिक ,वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचा जो विकास आहे. तो संविधानाच्या मार्गातूनच झालेला आहे. आता संविधानावर दोषारोप करता आणि असत्याच्या पायावर आपला देश उभा करत आहात.ही भूमिका अत्यंत चुकीची आहे .आज आपण नोकरीत आहोत पण उद्या तुमच्या मुलाला नोकरी मिळणार नाही . तुमच्या मुलाला योग्य जीवन जगण्याची संधी मिळणार नाही. तर काय होईल ? आणि देशच राहणार नाही, तर तुमच्या अस्तित्वाचं काय .?
म्हणून देशातील बांधवाने आता खोट्या प्रचाराला बळी पडू नये. सत्यनिष्ठता जोपासणाऱ्या क्रांतिवीराची आज खरच गरज आहे. आपल्या देशाला एकात्मतेमध्ये बांधून ठेवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. आज धर्म, जात, पंथ, पक्ष ,वर्ग, भाषा यामध्ये भेद करणाऱ्या साऱ्या प्रवृत्तीचा बिमोड केला पाहिजे. आपल्या देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या घरापासूनच चालला पाहिजे. सत्यमेव जयतेचा जयजयकार करून असत्यमेव जयतेच्या नाऱ्याला हद्दपार केलं पाहिजेत.यातच देशाचं हित आहे. हाच खरा मार्ग आहे. दुसरा माहित नाही.
- संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–