बुद्धविचारामध्ये ‘दुःखमुक्ती’ला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. दुसऱ्याला दुःखमुक्त करण्यासाठी आपल्यात ‘करुणा’ हवी. आजाऱ्यांची सेवा करण्यासाठी करुणा हा नैसर्गिक गुण समजला गेला आहे. विनयपिटकमध्ये भिक्खूंना उद्देशून बुद्ध म्हणतात, “जो आजाऱ्यांची सेवा करतो, तो माझी सेवा करतो”. म्हणूनच धम्माचरण करणाऱ्यांनी गेली अडीच हजार वर्षे आजाऱ्यांची शुश्रूषा केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. बुद्धांचे हेच विचार अंमलात आणत सम्राट अशोक यांनी दुसऱ्या प्रस्तर लेखात स्पष्ट लिहिले आहे कि त्यांनी राज्याच्या सर्व महामार्गांवर मनुष्य आणि जनावरांसाठी दवाखाने, औषधालय आणि उपयोगी झाडांची लागवड केली आहे. बुद्धविचार ज्या देशांत गेला तेथील सांस्कृतिक आणि वैद्यकीय ज्ञानाची आदानप्रदान झाली आणि म्हणूनच भारतीय चिकित्सा आणि औषधविज्ञान क्षेत्रात बौद्ध धम्माचे अनन्यसाधारण योगदान आहे. प्रत्येक व्याधीकडे मनोवैज्ञानिक दृष्टीने पाहावे असे बुद्धविचार सुचवितात. धम्मपद मधील यमक वग्गातील पहिल्याच पदात, मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध दाखविला आहे. आज, अडीच हजार वर्षांनी, आधुनिक विज्ञानाने हे मान्य केले असून त्या दृष्टीने सकारात्मक संशोधन करीत आहेत. बौद्धमतानुसार जीव हा नाम (मन) आणि रूप (काया) याने बनला आहे. जिवाच्या अस्तित्वासाठी हे दोन्ही घटक गरजेचे तसेच एकमेकांवर अवलंबून आहेत. बुद्धांनी सांगितलेला ‘प्रतित्यसमुत्पाद’ म्हणजेच ‘कारणकार्यभाव’ हा विचार आजच्या काळातील प्रतिबंधात्मक औषधांचा ‘आरोग्यमंत्र’ झाला आहे. अनेक बौद्ध आचार्य हे उत्कृष्ट वैद्य होते आणि आजही अनेक बौद्ध राष्ट्रातील भिक्खू हे सर्वसामान्यांना आरोग्यवर्धक उपाय सांगत असतात. दीघनिकाय मधील ‘महासतिपठ्ठान सुत्तांत’ मध्ये संपूर्ण शरीराचे त्याच्या अंतर्गत अवयवांसह वर्णन केले आहे. अनेक प्रकारात मृत अथवा सडलेल्या मृतदेहावर देखील ध्यानसाधना होत असे. हुयान त्सांगच्या वर्णनात तक्षशिला, नालंदा, नागार्जुनकोंडा येथील बौद्ध विद्यापीठात ‘चिकित्सविद्या’ ही महत्त्वाची विद्या तेथील विद्यार्थ्यांना वयाच्या सातव्या वर्षांपासून शिकविली जात.
भारतीय आयुर्विज्ञानाच्या इतिहासात, अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे जीवक कौमारभच्च यांचे योगदान जाणूनबुजून दुर्लक्षित करण्यात आले आहे. एखादी हृदयस्पर्शी कादंबरी अथवा नाटक होऊ शकेल असे आयुष्य लाभलेल्या जीवकांना, साहित्यकारांनी देखील दुर्लक्ष केले आहे. जीवकांचा इतिहास पालि, संस्कृत तसेच चीन आणि तिब्बेती साहित्यात वाचायला मिळतो. जीवकांचा जन्म हा बुद्धकालीन म्हणजे इ.स.पूर्व ६०० साली, सालवती नावाच्या गण नायिकेच्या पोटी झाला. जन्मतःच जीवकांना त्यांच्या आईने नाईलाजाने त्यागले होते. बिंबिसार यांचा मुलगा, राजकुमार अभय याला हे मुल रस्त्याच्या कडेला सापडल्याने त्याने त्याला राजमहालात आणून त्याचे भारणपोषण केले आणि म्हणून या मुलाचे नांव ‘जीवक कौमारभच्च’ पडले. लहानपणापासून राजवाड्यात वाढलेल्या जीवकाला जेव्हा आपल्या जन्माचे सत्य समजले तेव्हा आपले आयुष्य हे समाजाच्या उपयोगासाठी यावे हा उदात्त हेतू ठेवून, त्याने तक्षशिला विद्यापीठात आचार्य अत्रेय (काही ठिकाणी ‘स्त्रेय’) यांच्या हाताखाली सात वर्षे आयुर्विज्ञानाचे शिक्षण घेतले. अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा आणि चिकित्सेत अव्वल म्हणून जीवकाची ओळख विद्यार्थ्यांमध्ये झाली होती. जीवकाचे निरीक्षण किती सूक्ष्म असे हे एका उदाहरणावरून देता येईल. एकदा आचार्य विद्यार्थ्यांना घेऊन दुसऱ्या गावी जात असताना, वाटेत काही विद्यार्थ्यांना जनावराच्या पायाचे ठसे दिसले आणि ते म्हणाले कि हत्तीच्या पायाचे ठसे आहेत. जीवकाने ते पहिले आणि म्हणाला, “हे ठसे हत्तीचे नसून, गाभीन हत्तिणीचे आहे. तिच्यावर एक गरोदर स्त्री बसली आहे आणि ती आज एका बाळाला जन्म देणार आहे”. आचार्य अत्रेय आणि विद्यार्थी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी जीवकाला स्पष्टीकरण विचारले. जीवक म्हणाला, “हत्तीच्या पायाचे ठसे गोल असतात तर हत्तीणीच्या पायाचे ठसे उभट असतात. हे ठसे उभट असून, उजव्या पायाचे ठसे खोलवर उमटले आहेत. म्हणजे हत्तींनी गाभण आहे. ती उजव्या डोळ्याने अंध आहे कारण तिने वाटेवरचे फक्त डावीकडचेच गवत खाल्ले आहे. तिच्या पाठीवर एक गरोदर स्त्री बसली आहे जी उजव्या डोळ्याने अंध आहे कारण तिने फक्त डावीकडच्या झाडांची फुले तोडली आहे. ती हत्तीणीवरून उतरल्यावर तिच्या टाचेचे ठसे खोलवर आढळले तसेच ते मागच्या बाजूला जोर दिलेले आहेत म्हणजेच कंबरेतून मागच्या बाजूला झुकल्यामुळे झाले आहेत. याचाच अर्थ ती स्त्री गरोदर असून तिची बाळंतपणाची वेळ झाली आहे”. जीवकाचे स्पष्टीकरण ऐकून आचार्यांसह सर्व विद्यार्थी थक्क झाले. निरीक्षण, निदान आणि निष्कर्ष कसे असावे हे आजच्या डॉक्टरांनी देखील, जीवकांच्या या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे. अभ्यासाच्या शेवटी, परीक्षा म्हणून आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एखादी वनस्पती शोधायला सांगितले जी औषध म्हणून अतिशय निरुपयोगी आहे. विद्यार्थ्यांनी वनात जाऊन काही वनस्पती बरोबर घेऊन आले जे त्यांच्या दृष्टीने काहीच उपयोगाच्या नाहीत, मात्र आचार्यांनी प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही महत्त्व विशद केले. बऱ्याच वेळाने जीवक रिकाम्या हाताने आला आणि सांगितले कि त्याने संपूर्ण वन पालथे घातले मात्र एकही वनस्पती सापडली नाही कि जी निरुपयोगी आहे. प्रत्येक झाडात उपचाराचे काहीतरी गुण आहेत, मात्र ते सर्वस्वी चिकित्सा आणि निदान यावर अवलंबून आहे. जीवकाच्या या उत्तराने आचार्य आनंदित झाले आणि त्यांनी त्याला शाबासकी देत, आपला सक्षम वारसदार म्हणून मान्यता दिली. वनस्पती आणि रोग्याचे शरीर यांच्याबद्दल जीवकांचे खूप सूक्ष्म निरीक्षण होते आणि त्यांनी सुचविलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण उपचार पद्धती अतिशय अनोख्या होत्या. जे ज्ञान जीवक शिकले त्यात त्यांनी स्वयं अध्ययनाने अनेक पटीने भर घातली.
विनयपिटक, अपादान, मज्झीम निकाय, मनोरथपूरनी, धम्मपद अठ्ठकथा या पालि आणि अवदान, आगम, धर्मगुप्त टीकाग्रंथ या संस्कृत ग्रंथांमध्ये तसेच चीनी भाषेतील ‘आम्रपालीसूत्र’ आणि ‘जीवकसूत्र’ मधून जीवकांची माहिती तसेच त्यांच्या अचूक चिकित्सा (तिकिच्छका) पद्धती यावर प्रकाश टाकला आहे. एका प्रसंगात जीवकांनी एका श्रेष्ठीच्या पत्नीची सात वर्षांपासूनची ‘शीषबाधा’ म्हणजे डोकेदुखी, नाकातून दिलेल्या औषधाने (नत्थूकम्म) बरी केली. जीवकांनी जगातील सर्वात पहिली डोक्याची शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख आहे. राजगीरच्या एका व्यापाराच्या डोकेदुःखीची चिकित्सा करताना जीवकांनी त्याच्या कवटीचा सांधा उघडून त्यातून दोन कृमी बाहेर काढल्या होत्या. या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेचा साधा उल्लेखही आत्ताच्या आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये केलेला नाही! मगध सम्राट बिंबिसार यांचे मूळव्याध काही विशिष्ट वनस्पतींचे मिश्रण तयार करून केवळ एकाच मात्रेमध्ये बरे केले होते. या नंतर जीवक हे बिंबिसार राजाचे वैद्य म्हणून रुजू झाले. काशी येथील एका व्यापाराच्या मुलाची पोटदुखी, ‘अंतगांठबाधा’ झाल्यामुळे होती हे जीवकांनी ओळखले आणि त्याच्या पोटाची शस्त्रक्रिया करून आंतडें व्यवस्थित करून बसवले. नंतर त्या मुलाचे पोट शिवून त्यावर एक लेप लावला. उज्जयिनीचे राजे पज्जोत यांचे ‘पंडुरोगबाधा’ हा आजार, औषधांच्या एका मात्रेने बरे केला होते. एका व्यक्तीच्या अंडकोशाची शस्त्रक्रिया (अंडवुद्धी) देखील जीवकांनी केल्याचा उल्लेख आहे. जीवकांची कीर्ती खूप पसरली आणि त्यांनी राजगीरमध्ये स्वतःचे चिकित्सालय उघडले. विनयपिटकात लिहिल्याप्रमाणे एकदा बुद्धांना पोटाचा आजार झाला होता. जीवकांनी त्यांना तीन कमळांच्या फुलांवर काही विशिष्ट वनस्पतींचे द्रव्य शिंपडून त्याचा वास घेण्यास सांगितले. त्यामुळे बुद्धांना तीन वेळा जुलाब होऊन पोट ठीक झाले. त्यानंतर जीवक हे बुद्धांचे वैद्य झाले. देवदत्तने मारण्याच्या हेतूने डोंगरावरून सोडलेल्या एका मोठ्या दगडाच्या तुकड्याने बुद्धांच्या पायाला जखम झाली. जीवकांनी ती जखम औषध लावून बरी केली. बुद्धांच्या प्रति आदर व्यक्त करीत, जीवकांनी भिक्खू संघासाठी ‘जीवक आम्रवन विहार’ बांधून दान दिले. जीवकांना खरं तर भिक्खू व्हायचे होते पण बुद्धांनी त्यांना नकार दिला आणि सांगितले कि लोकांच्या आरोग्याची सेवा हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यानंतर मात्र जीवकांनी आपले सारे कौशल्य आणि ज्ञान वापरून अनेक जणांच्या रोगाचे निवारण केले. जीवक सर्वात आधी आजारी भिक्खूंची सेवा करीत आणि नंतर इतर रुग्णांची. भिक्खूंची संख्या जास्त असल्याने सर्वसामान्य रोग्यांना खूप उशिरा वेळ मिळे. त्यामुळे अनेकांनी केवळ जीवकांकडून उपचार लवकर व्हावेत म्हणून भिक्खू संघात प्रवेश करीत आणि उपचार झाले कि संघ सोडून जात. जेव्हा जीवकांच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी बुद्धांकडे तक्रार केली. त्यानंतर बुद्धांनी आजारी लोकांना भिक्खू संघात प्रवेश घेण्यास मनाई केली. पूर्वी बुद्धांसह, भिक्खू संघ पांसुकूलिक म्हणजे फेकून दिलेले कपड्याचे तुकडे किंवा स्मशानातील एखाद्या प्रेतावरचे काढून टाकलेले वस्त्र, एकत्र शिवून घालीत. जेव्हा असे कापड मिळत नसत तेव्हा भिक्खूंना जुने किंवा फाटलेले पांसुकूलिक घालावे लागत. त्यामुळे भिक्खू आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले होते. जीवकांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी बुद्धांना विनंती केली कि भिक्खुंनी पांसुकूलिक ऐवजी उपासकांनी दिलेल्या चिवरांचा उपयोग करावा. बुद्धांनी ते मान्य केल्याचे विनयपिटकातील ‘चीवर स्कंधक’ मध्ये नमूद केले आहे. बुद्धांना सर्वात पहिले चीवर दान जीवकांनी केल्याचा उल्लेख पालि साहित्यात आहे. भिक्खू जेव्हा भिक्षाटन करण्यासाठी जात, तेव्हा सर्वसामान्य लोक, बुद्धांच्या प्रति असलेल्या श्रद्धेमुळे, त्यांना पंचपक्वाने वाढीत. त्यामुळे भिक्खूंना देखील अनेक शारीरिक व्याधी होत. जीवकांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुद्धांना विनंती केली कि भिक्खूंना व्यायाम करण्याची परवानगी द्यावी जी बुद्धांनी मान्य केली. राजकीय अभिलाषेपोटी बिंबिसार राजाला त्याच्या मुलाने, अजातशत्रूने, बंदिस्त करून तुरुंगात टाकले व कालांतराने त्यांची हत्या करण्याची योजना आखली. जीवकांना जेव्हा हे समजले, तेव्हा त्यांनी अजातशत्रूला तसे करण्यापासून परावृत्त केले. जीवकांनी केलेले निदान अनेकदा आश्चर्यचकित करणारे असे. प्रत्येक रुग्णाचे सूक्ष्म निरीक्षणातून निदान करून ते तसा औषधोपचार करीत. त्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी अतिशय लांबवरून लोक येत. त्यांनी त्याकाळात केलेले चिकित्सा आणि निदान पद्धतीमुळे अनेक जणांना जीवदान मिळाले. पालि साहित्यात भ. बुद्धांना ‘भैषज्यगुरु’ संबोधण्यात आले आहे तर जीवकांना ‘भैषज्यराजा’ संबोधण्यात येते. अनेक थेरवाद देशांत औषधोपचार करण्यापूर्वी जीवकांच्या प्रति श्रद्धा आणि आदर व्यक्त केला जातो. चीनच्या ‘जीवकसुत्र’ मधून कळते कि त्यांना ऍक्युप्रेशर किंवा ऍक्युपंक्चरचा जनक मानण्यात येते. थायलंड मध्ये त्यांना मर्दनचे (मसाज) जनक समजले जाते. जीवक यांना प्राचीन काळातील सर्वोत्तम बालरोगतज्ञ समजले जाते. म्हणून त्यांना “जीवक कुमारभृत्य” या नावाने देखील संबोधण्यात येते. बालरोगांविषयी त्यांची चिकित्सा आणि निदानपद्धतीचे वर्णन आयुर्वेदामध्ये सापडते पण त्याचे श्रेय इतर कोणाला तरी दिले गेले आहे. बुद्धकाळात स्रोतापन्न झालेले जीवक नंतर अर्हत झाले.
भारतीय आयुर्विज्ञान इतिहासात केवळ जीवक यांचा काळ तसेच चिकित्सा आणि निदान पद्धतीबद्दल अचूक माहिती मिळते. केनेथ झिस्क लिहितात कि ब्राह्मणी परंपरा असे मानते कि ब्रह्मदेवाने आयुर्विज्ञान हे प्रजापतीला दिले जे त्याने इंद्रदेवाला दिले. तेथून ते धन्वंतरीची रूपात असलेल्या काशी नरेश दिवोदासला मिळाले जे त्याने सुश्रुतला दिले आणि मग सुश्रुताने संहिता लिहून जगासमोर आणले. इंद्राने हे ज्ञान अत्रेय पुनर्वसू यांना दिले जे त्यांनी अग्निवेशाला दिले आणि अग्निवेशाने ते चरकला शिकविले ज्याने नंतर चरक संहिता लिहिली. या काल्पनिक गोष्टी भारतीय परंपरेत दिसतात हे नमूद करत पुढे झिस्क लिहितात कि वैदिक काळात अशी मान्यता होती कि शाररिक व्याधी या जादूटोणा, राक्षसी शक्ती किंवा तंत्रमंत्र याने होतो. देबीप्रसाद चटोपाद्यांनुसार चरक या शब्दाचा मूळ धातू ‘चर’ म्हणजे फिरणारा असा होतो. म्हणजेच चरक संहिता ही खरे तर त्याकाळात भटकंती करणारे बौद्ध श्रमण यांनी हे ज्ञान एकत्रित केले आहे असा होतो. सुश्रुत यांच्याबद्दल देखील कुठलीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसून, अभ्यासकांच्या मते अनेक जणांनी मिळून ही संहिता लिहिली आहे. १९०७ मध्ये सुश्रुत संहितेचे इंग्रजीत संपादन करणारे कविराज कुंजलाल भीषगरत्न लिहितात कि सुश्रुत संहितेची रचना, माध्यमिक बौद्ध आचार्य नागार्जुन यांनी लिहिलेल्या एका संहितेचा आधार घेऊन लिहिली आहे. सुश्रुतबद्दल आमच्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही असे कविराज कुंजलाल स्पष्ट लिहितात. ग्रीक इतिहासकार मेगॅस्थनिस याने देखील श्रमण आणि त्यांच्या सखोल वैद्यकीय ज्ञानाबद्दल लिहिले आहे. बौद्ध भिक्खू, लोकांना धम्म सांगत असताना त्यांच्या व्याधींसाठी देखील औषधोपचार करीत आणि म्हणूनच आयुर्विज्ञानाची खरी बैठक बुद्धकाळात झाली व बुद्धविचारांसोबत उत्तोरोत्तर तिचा प्रसार वाढत गेला. बौद्धकाळात विकसित झालेले आयुर्विज्ञान, ८व्या ते १०व्या शतकानंतर वैदिकपूर्व काळाशी जोडण्यात आले! जीवकांनी शोधलेल्या अनेक चिकित्सा पद्धती नंतरच्या काळात इतरांच्या नावावर प्रसिद्ध झाल्या. जगभरातील आयुर्विज्ञान शाखेत गौरविलेले जीवकांना मात्र भारतातील आजच्या आयुर्वेदाच्या शिक्षणात कुठलेही स्थान देण्यात आले नाही ही इथल्या ‘आयुर्वेदाचार्यांची’ संकुचित मानसिकता नव्हे काय?
- अतुल मुरलीधर भोसेकर
- ९५४५२७७४१०