आता लवकरच उन्हाळा चांगलाच जाणवू लागणार आहे. उन्हाळ्यात डोळे येण्याची साथ पसरण्याचा मोठा धोका असतो. डोळे येण्यास अनेक जीवाणू, विषाणू अथवा अँलर्जी कारणीभूत असते. कधी कधी डोळ्यात आम्ल आणि अल्कली गेल्यानेही डोळे येतात. घरात एकाचे डोळे आले की पाठोपाठ सगळ्यांनाच संसर्ग होतो. अर्थात हे प्रत्येकवेळी घडत नाही. अँलर्जीमुळे डोळे आले तर तो रोग एकापासून दुसर्याला होऊ शकत नाही. जिवाणू वा विषाणूंमुळे डोळे येतात तेव्हा डोळ्यातून येणार्या पाण्यात वा स्रावात ते जीवाणू आणि विषाणू मोठय़ा प्रमाणात असतात. रुग्णाच्या डोळ्यातील स्रावाचा संपर्क निरोगी माणसाच्या डोळ्यांशी आला तर तरच हा रोग पसरतो. थोडक्यात सांगायचं तर आईने डोळे आलेल्या मुलाचे डोळे पुसून नंतर तेच हात तिच्या डोळ्याला लावल्यास तिचेही डोळे येतील. डोळे आलेल्या व्यक्तीने ज्या रुमालाने वा टॉवेलने डोळे पुसले असतील तोच रुमाल वा टॉवेल निरोगी व्यक्तीने वापरला तर त्या व्यक्तीचेही डोळे येतील. हे जंतू हवेतून उडत दुसर्याच्या डोळ्यात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तीकडे नुसते बघितल्याने डोळे येत नाहीत. हे लक्षात घेता या रोगापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी गॉगल वापरावा. डोळे आलेल्या व्यक्तीचा टॉवेल, रुमाल, खेळणी वापरू नयेत. चुकून स्पर्श झालाच तर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. डोळ्यात टाकण्यासाठीचे औषधी थेंब अथवा मलम देऊनही डॉक्टर या आजारावर उपचार करतात. त्यांची मदत घ्यावी.