डॉक्टरांचा सच्चा साथी

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

स्टेथोस्कोप आणि डॉक्टर हे चित्र आपल्या मनावर बिंबल गेलं आहे. पण या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमकं काय कळतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळत असतं. स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, निळ्या आणि कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी आणि त्यावर पातळसा पडदा असतो. हा पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढवतो. त्यामुळेच शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना पडणारे हृदयाचे ठोके, श्‍वास घेताना आणि सोडताना श्‍वसनाचा आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यात झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचं निदान करता येतं. स्टेथोस्कोप पोटाला लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतड्यात अडथळा निर्माण झाला असल्यास त्याचं निदान होऊ शकतं. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोपनं कळू शकतं. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येतं. म्हणूनच हा डॉक्टरांचा सच्चा साथी आहे असं म्हणता येईल.

Leave a comment