तापाविषयी चर्चा करताना नानाविध कारणांमुळे उद्भवणार्या तापाचा विचार करावा लागतो कारण प्रत्येक विकारातल्या तापाची पद्धत वेगवेगळी असते. साधा ताप एक-दोन दिवसात कमी होतो. मात्र व्हायरल फिवरचा ताप लवकर जात नाही. या तापासोबत थंडीही वाजते. या तापावर सर्वसाधारण तापाच्या औषधांचा परिणाम होत नाही. मुख्य म्हणजे हा ताप बराच काळपर्यंत टिकून राहतो. यासोबत सांधेदुखी, डोकेदुखी, उलट्या, चेहर्यावर सूज, अंगावर पुरळ उठणं अशी लक्षणंही दिसून येतात. ही लक्षणं दिसली की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वत:च्या मनाने कोणतेही उपचार करू नये. या आजारात घरगुती उपायांवर अवलंबून राहणं अयोग्य आहे. विषाणूजन्य तापाचं निदान झाल्यानंतर आराम करणं गरजेचं आहे. या आजारपणात सूप, तांदळाची खिचडी असा हलका आहार घ्यायला हवा. ताप आला की आपण प्रतिजैवकं घेतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. या तापावर साध्या प्रतिजैवकांचा कोणताही परिणाम होत नाही. चुकीची औषधं घेतल्यामुळे आरोग्यवर दुष्परिणाम मात्र होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेणं त्रासदायक ठरु शकतं हे जाणून घ्यायला हवं. तसंच औषधं मध्येच बंद करणंही घातक सद्ध होतं. हा धोका टाळण्यासाठी बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा. गर्दीची ठिकाणं टाळा. भरपूर पाणी प्या. ताप, सर्दी, खोकला असेल तर खोकताना आणि शिंकताना तोंडावर हात ठेवा.