व्याधी दूर करण्यासाठी नानाविध उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यात अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यक, अँक्युप्रेशर, अँक्युपंक्चर, निसर्गोपचार, चुंबकोपचार आदींचा उल्लेख करता येईल. प्रत्येक उपचार पद्धतीचे काही फायदे, काही तोटे असतात. प्रत्येक पद्धतीत सगळ्याच रोगांवर उपचार असतील असंही नाही. सगळ्याच पद्धती शास्त्रीय तपासण्याच्या आधारे पडताळून पाहता येतील असण् नाही, कारण रोग बरा होण्यामागे शारीरिक कारणांखेरीज मानसिक कारणंही महत्त्वाची असतात. बरेच लोक वैद्यकीय संस्थांच्या जाहिराती वाचून तिथल्या डॉक्टरांकडे उपचाराला जातात; पण त्यांच्या पदरी निराशाच येते. काही रोग असाध्य समजले जातात. यात मेंदूच्या कार्यातील वा रचनेतील बिघाड, हातापायाचा लुळेपणा, मतिमंदत्व, मधुमेह, रेबीज आदी रोगांचा समावेश होतो. पुरेशा शास्त्रीय सद्धतेखेरीज कोणीही हे रोग बरे करण्याचा दावा करत असेल तर तो मॅजिक ड्रग्ज अँड रेमडीज अँक्टनुसार दखलपात्र गुन्हा आहे. मतिमंदत्वावर उपचार नाहीत. त्यामुळे असे उपचार करून घेण्याआधी त्या क्षेत्रातील इतर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. बरेचदा भोंदू डॉक्टरांकडून असे दावे केले जातात. नीतीनियम पाळून सुरू केलेली कोणतीही उपचारपद्धती काही रोगांमध्ये नक्कीच परिणामकारक ठरते. पण रोग बरा होण्यासाठी त्या त्या उपचार पद्धतीच्या तज्ज्ञांकडेच जाणं मात्र आवश्यक ठरतं.