दृष्टीदोष असल्यास चष्म्याची मदत घेतली जाते. चष्म्यामुळे हा दोष दूर करता येतो. जवळचं अथवा लांबचं दिसत नसल्यास होणारी अडचण चष्म्यामुळे दूर होते. काहींना लहानपणापासून चष्मा लागतो. पण प्रौढ वयात लागणार्या चष्म्याला चाळिशी म्हटलं जातं. वृद्धावस्था यायला लागली की वाचण्यास चष्म्याची गरज पडते. इतर अनेक कारणांमुळे अगदी लहान मुलांपासून चष्मा लागत असला तरी वाढत्या वयाचा परिणाम म्हणूनही अनेकांना चष्मा लागतो. आजकाल हे प्रमाण वाढले आहे हे देखील आपण जाणून घ्यायला हवं. आई वडिलांना खूप मोठय़ा नंबरचा चष्मा असेल तर मुलांना अगदी लहान वयातच चष्मा लागतो. डोळ्यांची समोरून मागे अशी लांबी जास्ती वा कमी झाल्यास अनुक्रमे मायनस आणि प्लस अशा नंबरचे चष्मे वापरावे लागतात. म्हातारपणी डोळ्यातील भिंगाची लहान मोठे होण्यासाठीची लवचिकता कमी झाल्याने वाचण्यासाठीचा म्हणजे जवळचा चष्मा लागतो. डोळ्यांवर ताण येऊन डोके दुखणं ही चष्मा लागण्याची पूर्वसूचना असते. मोतबिंदूच्या ऑपरेशननंतर भिंग काढून टाकल्यामुळे मोठय़ा प्लस नंबरचा चष्मा द्यावा लागतो. वर सांगितल्याप्रमाणे दूरचे अथवा जवळचे अस्पष्ट दिसत असेल तर चष्मा लागतो. डोळ्यांवर ताण येऊन डोकं दुखत असल्यासही चष्मा लागतो. मोठा नंबर असल्यास कार्नियावर शस्त्रक्रिया करून नंबर कमी करतात किंवा डोळ्यांच्या आतच कॉन्टॅक्ट लेन्स बसवतात.