महिलांना होणार्या कर्करोगांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा तिसरा क्रमांक लागतो. महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं सर्वाधिक प्रमाण असून त्यानंतर सर्व्हायकल कर्करोगाचा क्रमांक लागतो. अंडाशय हा महिलांच्या प्रजनन संस्थेतला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सर्वसामान्य निरोगी महिलांच्या शरीरात दोन अंडाशय असतात. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक एक अंडाशय असतो. गर्भधारणेसाठी अंड्यांची निर्मिती करणं हे अंडाशयाचं प्रमुख काम असतं. यासोबतच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन अशा हार्मोन्सची निर्मितीही अंडायशयात होत असते.
वयाच्या पस्तीशीनंतर महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. ५५ ते ६४ या वयोगटातल्या महिलांना हा कर्करोग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अंडाशयाच्या कर्करोगचा मृत्यूदरही अधिक आहे. या कर्करोगाची लक्षणं पटकन लक्षात येत नसल्यामुळे तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यात त्याचं निदान होतं. याच कारणामुळे रुग्ण वाचण्याची शक्यताही कमी होते. कधीही गरोदर न राहिलेल्या महिलांना अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो. वेळेआधी येणारी मासिक पाळी तसंच उशीरा होणारी रजोनवृत्ती हे सुद्धा अंडाशयाच्या कर्करोगाचं कारण ठरू शकतं. अंडाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल तर महिलांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. स्तनांचा कर्करोग झालेल्या महिलांना अंडाशयाच कर्करोग होऊ शकतो. रजोनवृत्तीनंतर घेतली जाणारी हार्मोन थेरेपी या व्याधीला कारणीभूत ठरू शकते. मधुमेहही अंडाशयाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो. भारतात मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरात जवळपास १९९ दशलक्षांहून अधिक महिलांना मधुमेहाने ग्रासलं असून त्यात भारतीय महिलांचं प्रमाण जवळपास १४ टक्के आहे. मधुमेह विविध प्रकारच्या कर्करोगांना कारणीभूत ठरू शकतो, असं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे.
म्हणूनच मधुमेह नियंत्रणात ठेवणं खूप आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेऊन मधुमेहाला लांब ठेवता येईल. सुरूवातीच्या टप्प्यात अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणं फारशी दिसून येत नाहीत. पोट फुगणं, पोटात अस्वस्थता जाणवणं, अपचन, थकवा, वजन कमी होणं, भूक मंदावणं अशी काही लक्षणं दिसून येतात. पुढच्या टप्प्यांमध्ये पोटाचा आकार वाढणं, मळमळ, उलट्या, पाय सुजणं अशी लक्षणं दिसू शकतात. अंडाशयाच्या कर्करोगला प्रतिबंध करण्यासाठी किंवा हा धोका कमी करण्यासाठी योग्य वयात गर्भधारणा होणे आवश्यक आहे. तसंच मातांनी स्तनपानही द्यायला हवं. तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणं, वजन नियंत्रणात ठेवणं, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी टाळणं, मद्यपान, धूम्रपान न करणं अशा उपायांनी तुम्ही अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता.