पुणे : कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटकातील विजापूरपासून वीस किलोमीटर असलेल्या बेडगी या गावाकडे निघालेल्या इंदापूर तालुक्यातील खेळाडूंच्या गाडीची कंटेनरशी धडक होऊन दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर झाले आहेत. या सर्वांना विजापूर मधील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघ राज्यभरात प्रसिद्ध असून हा संघ कर्नाटकातील विजापूरपासून जवळ असलेल्या बेडगी येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाला होता. पहाटे हे सर्व खेळाडू भवानीनगर व कळंब येथून सोलापूर रस्त्याने तवेरा गाडीने रवाना झाले. त्यानंतर पावणेसातच्या सुमारास विजापूर रस्त्यावर कंटेनरशी तवेरा गाडीची धडक होऊन त्यातील नऊ जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी महादेव आवटे (रा.भवानीनगर तालुका इंदापूर) व सोहेल सय्यद (रा. कळंब ता. इंदापूर) हे दोघे जण जागीच ठार झाले, तर उर्वरित सात जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाने तेथे मदत मिळण्यासाठी पाठपुरावा केला. पुणे जिल्हय़ाचे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी देखील विजापूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलून यासंदर्भात उपचार आणि शवविच्छेदनाच्या संदर्भातील प्रक्रिया याविषयी चर्चा केली.
महाराणा कबड्डी संघातील महादेव आवटे हा खेळाडू भवानीनगर येथील होता तो दोन वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन होता व कबड्डीपटूंना प्रशिक्षण देत होता. त्याला पोलिस बनायचे होते मात्र त्याचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024