आर्वी : जेथे मृतात्म्याला अखेरचा निरोप दिला जातो, त्या भूमीवर दिवसरात्र राहायचे म्हटले, तर अंगावर काटा उभा होतो. मात्र, येथील सेवानवृत्त प्राध्यापकाने शेतीकरिता स्मशानभूमीची जागा निवडून व तेथेच निवास करून तेथे सेंद्रिय शेती फुलविली आहे. त्यांचा हा अनोखा प्रयोग चचेर्चा विषय व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
संजय अंबादास वानखडे असे सेवानवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगर नजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
या जागेवर शेतीसोबतच पिकनिक स्पॉट, लहान मुलांसाठी खेळणी, बगीचा व फुलझाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बोहरा समाजाच्या प्रतिनिधींना ही संकल्पना पटल्याने वानखेडे यांनी ५५ हजार रुपयांमध्ये पाच एकर शेती ठेक्याने घेतली. त्यांनी ठरल्याप्रमाणे ही शेती विकसित केली. यामुळे आता येथे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. हा ओसाड परिसर पिकनिक स्पॉटच झाला आहे. बोहरा समाजातील कुटुंबीय या परिसरात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतात. इतरही नागरिक विरंगुळा म्हणून या ठिकाणी वेळ घालवतात. सेवानवृत्त प्राध्यापकाची आता स्मशानात राहणारा मनुष्य म्हणून शहरात ओळख निर्माण झाली आहे.
ओसाड परिसरात बहरले हिरवागार माळरान
पाण्याची अडचण असल्याने वानखेडे यांनी स्मशानभूमीतील विहिरीत सर्वप्रथम आडवे बोर केले. त्यानंतर संरक्षण भिंतीलगत लावण्यासाठी १८ हजार रुपयांची शोभेची झाडे आणली. चार लाख रुपये खर्च करून पाचही एकरांत ठिंबक सिंचनाची सोय केली. जमीन कसण्यायोग्य केल्यानंतर शेणखत, गोमुत्राचा वापर करून सेंद्रिय शेतीच केली. भुईमूंग, मका, तूर व चण्याचे पीक त्यांनी घेतले. आता दोन एकरात पपईची लागवड केली, तर उर्वरित जागेवर अद्रक, वांगी व कलिंगड लावले आहे. त्यामुळे हा परिसर आता अनेकांना खुणावत आहे.
३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर आता सेवानवृत्त झालो. शेती हा माझा पिढीजात व्यवसाय. स्मशानातील शेतीतून नफा कमाविणे हा माझा उद्देश नाहीच. येथे येणार्या दु:खी माणसांचे मन प्रसन्न व्हावे, मृतात्म्यालाही खर्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतीबरोबर एक ते दीड एकरात लहान मुलांसाठी बगीचा, खेळणे, झुला आदी विविध साहित्य लावायचे असून, येथे गार्डन डेव्हलपमेंट फार्म तयार करण्याचा मानस आहे.
Contents
hide
Related Stories
November 7, 2024
November 4, 2024
November 2, 2024