रक्तदान म्हणजे जीवनदान हे आपण जाणतो. पण याबाबत अनेकांच्या मनात अद्यापही संभ्रम आढळून येतो. तो दूर करायचा तर काही बाबींची स्पष्टता हवी. उदाहरणार्थ रक्तदान करणार्या व्यक्तीचं वय १८ ते ६0 वर्षांदरम्यान असावं. व्यक्तीचं वजन ४५ किलोग्रॅमपेक्षा जास्त असावं. रक्तातील हिमोग्लोबनचं प्रमाण १00 मिलीला १२ ग्रॅमहून जास्त असावं. रक्तदात्याला आधीच्या सहा महिन्यांत रक्ताद्वारे पसरतील असे ब व क प्रकारची कावीळ, गुप्तरोग, हवताप, एड्स असे रोग झालेले नसावेत.
या सगळ्या अटी पूर्ण करणारी कोणतीही व्यक्त रक्तदान करू शकते. रक्तपेढीत गेल्यावर प्रथमत तुमची सर्व माहिती लिहून घेतात. रक्तदान करण्यास तयार असल्याचं एक संमतीपत्र भरून घेतात. मग तुम्हाला रक्तदान कक्षात नेऊन पलंगावर झोपवतात. दंडाभोवती रक्तदाबमापक यंत्राचा पट्टा गुंडाळून त्यातील दाब ६0 ते ७0 मिमीपर्यंत वाढवतात. दंड व हात यातील सांध्यावरच्या त्वचेला स्परिट लावून तो भाग साफ करतात. त्यानंतर रक्त गोळा करण्याच्या बॅगला जोडलेली सुई शरेत टोचतात. पाच-दहा मिनिटांत रक्ताच्या बॅगमध्ये ३५0 मिली रक्त गोळा होतं. रक्तदानाच्या एकूण प्रक्रियेसाठी फक्त १७ ते २0 मिनटे लागतात. नंतर तुम्हाला चहा आणि बिस्किटं असा अल्पोपहार दिला जातो. रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. एकूण रक्तापैकी फक्त ३५0 मिली रक्त देत असल्यामुळे काहीच दुष्परिणाम होत नाही.