- ———————————
विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.६ डिसेंबर २०२२ ला असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कवी-लेखक-समीक्षक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा “जगातील पहिला ऐतिहासिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ” हा लेख प्रकाशित करीत आहोत.
- -संपादक
- गौरव प्रकाशन
- ———————————
- महाकाव्य ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये :
- १) जगातील पहिला ऐतिहासिक महाकाव्यग्रंथ
- २) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील २०२१ कवींच्या २०२१ कविता
- ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर या एकाच महामानवाच्या जीवन कार्यावरील २०२१ कविता
- ४) ११ कुलगुरू व २५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३६ जिल्ह्यात एकाच वेळी प्रकाशन
- ५) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ५२ विचारवंतांचे या महाकाव्यग्रंथावरील अभिप्राय
- ६) महाकाव्यग्रंथाची पृष्ठसंख्या-२१८४
न्यायपंडित सर्व शास्त्रात दिग्विजयी ठरलेले,सर्वविद्यासंपन्न अचलवीर, आकाशातील सूर्य आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित सद्धम्म मार्गदर्शक, धम्मप्रवर्तक ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील २१८४ पृष्ठसंख्या असलेला “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ” हा २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा सन : २०२१ मध्ये जगातील हा पहिला महाकाव्यग्रंथ महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील महाकाव्यग्रंथातील मान्यवर कवींच्या माध्यमातून एकाच वेळी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ११ विद्यापीठात ११ कुलगुरूंच्या आणि २५ जिल्ह्यात २५ जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते दि.२० ऑक्टोबर २०२१ ला एकाच वेळी प्रकाशन करून अशक्य अशी ही गोष्ट नांदेड येथील शब्ददान प्रकाशनाचे प्रकाशक व संपादक प्रा. अशोककुमार दवणे यांनी शक्य करून दाखविली आहे.त्यांचे हे कार्य अभिनंदनीय असून ऐतिहासिक आहे कारण आंबेडकरी कवितेच्या प्रांतात गगनाला गवसणी घालणारे असे कार्य त्यांनी केलेले आहे. या महाकाव्य ग्रंथाचा परिचय करून देण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावी जीवन कार्यावरील इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात कविता जगाच्या पाठीवर इतर कोणत्या मान्यवरांवर लिहिल्या गेल्या नाहीत व नसेल हे या महाकाव्यग्रंथाने अधोरेखित होणार आहे.संतोष घोंगडे, पुणे व बुद्धभूषण साळवे ,नाशिक यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारे असून मलपृष्ठावरील “बाबासाहेब” ही प्रा. अशोककुमार दवणे यांची कविता मनाला स्पर्शून जाणारी आहे.
अनेक सुप्रसिद्ध कविंसोबत नवकविंच्या कवितांना या महाकाव्यग्रंथात स्थान देऊन समानता मिळवून देण्याचा संपादकाचा प्रयास महत्त्वाचा वाटतो. मराठी साहित्यामध्ये महाकाव्य ग्रंथाचा हा प्रयोग अनोखा असून मराठी साहित्याला एक दिशा दाखवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. डॉ. बाबासाहेब जगातील असे एकमेव व्यक्ती आहेत की,त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर हजारो साहित्यिकांनी त्यांच्या विविध पैलूंवर हजारो कविता, गझल, काव्यगीतं, लोकगीतं रचलेली आहेत. अनेक गायकांनी गायनही केलेलीआहेत. परंतु त्या आजपर्यंत कुणीही एकत्र संकलन करून ते महाकाव्यग्रंथाच्या रूपात जगासमोर आणले नव्हते. हे महान, अनमोल आणि ऐतिहासिक कार्य संपादक प्रा. अशोककुमार दवणे यांनी केले आहे त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन झाले आहे व आजही होत आहे.
प्रा.अशोककुमार दवणे यांनी भिमाई,भारतीय संविधान गौरव ग्रंथ,भीमा कोरेगावची ऐतिहासिक लढाई,कथादल,कुलगुरू अशा ४१ पुस्तकांचे लेखन व १५ पुस्तकांचे संपादन केलेले आहे. नांदेड येथे स्वतःच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या “माझ्या मरणा आधीचा जाहीरनामा ” या २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील २०१२ कवितांचे बारा तास अखंड काव्यवाचन केलेले आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचे वाहक म्हणून मागील चार दशकापासून सामाजिक, साहित्यिक कार्यातून समाजऋण फेडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारासह त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याबद्दल आजपर्यंत साठच्यावर विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.अशा या अत्यंत कल्पक व उत्साही परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व आंबेडकरी बाण्याने चळवळीसाठी सतत धडपडणाऱ्या प्रा.अशोककुमार दवणे या प्रभावी व्यक्तिमत्त्वाकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचे संपादन करण्यात आले.त्यांचा हा सम्यक संकल्प अत्यंत साहसी आणि अभिनंदनीय आहे.
विशेष म्हणजे या महाकाव्य ग्रंथाला महाराष्ट्रातील प्रा.डॉ. जगदीश कदम, प्रा.डॉ.अशोक कांबळे, प्रा. दामोदर मोरे,प्रा. डॉ. अशोक पळवेकर,प्रा. रविचंद्र हडसनकर, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. शरणकुमार लिंबाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्राचार्य गणेश टाले, ज.वि. पवार, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, गंगाधर अहिरे,शिवा कांबळे प्रा. डॉ.शुद्धोधन कांबळे, विलास ढवळे इत्यादी ५२ विचारवंतांनी या महाकाव्यग्रंथावर अभिप्राय देऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर ज्या कवींनी कविता प्रसविल्या त्या २०२१ कवींचा आणि संपादक प्रा .अशोककुमार दवणे यांच्या संपादनकार्याचा मनापासून गौरव केलेला आहे.
मागील ३०-३५ वर्षापासून काव्यामध्ये विविध प्रयोग करून कवितेत अखंड बुडालेले प्रा.अशोक कुमार दवणे यांच्या या महाकाव्य ग्रंथाची जागतिक नोंद व्हावी असाच हा ग्रंथ आहे. हे महाकाव्यग्रंथात तीन पिढ्यांच्या २०२१ कवींच्या कवितांमधील बाबासाहेबांच्याप्रति असलेल्या कृतज्ञतेची क्रांती फुले सर्वत्र पसरलेली दिसतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या महाकाव्यग्रंथाची नोंद होईल यात शंका नाही. प्राध्यापक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, विविध साहित्य मंडळ, निष्ठावंत साहित्यिक,आणि मार्गदर्शक विद्वान नव्याच्या शोधात असतात ते नक्कीच या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाला न्याय देतील अशी संपादकांनी जी संपादकीय मध्ये खात्री दिलेली आहे ती योग्यच आहे. हा महाकाव्यग्रंथ अभ्यासक,संशोधक व साहित्यप्रेमींना अनमोल ठरणार आहे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अतिशय उपयुक्त ग्रंथ आहे .विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या महाकाव्यग्रंथाची निवड झाल्यास विद्यार्थ्यांना तो उपयुक्त ठरणार आहे.
हा महाकाव्यग्रंथ भारताची शान ठरणार आहे .कल्पना सर्वच करतात परंतु त्या प्रत्यक्ष साकार करणारे बोटावर मोजण्याइतकेही व्यक्ती आज मिळत नाहीत. प्रा.अशोककुमार दवणे यांनी त्यांच्या मनातील कल्पना हा महाकाव्यग्रंथ प्रकाशित करून पूर्ण केलेली आहे. आंबेडकरी विचार प्रवाह या महाकाव्यग्रंथामुळे संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचणार आहे.जगातील महान व्यक्ती, विसाव्या शतकातील प्रतिभाशाली ,बुद्धिमान ,क्रांतिकारक ,महामानव म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतं.या महाकाव्यग्रंथातील २०२१ कवींच्या बाबासाहेबांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूवर २०२१ कविता रसिक, विद्यार्थी, अभ्यासक, विद्वान, संशोधक या सर्वांनाच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. विश्वातील आंबेडकरी साहित्यिक व अभ्यासकांना अध्ययनासाठी प्रकाशवाट ठरणारा हा महाकाव्यग्रंथ आहे.
या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथामध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राबाहेरील अशा एकूण २०२१ कवींच्या कवितांचा आस्वाद वाचकांना घेता येतो यात नांदेड जिल्ह्यातील १५२ कवींच्या १५२ कविता,चंद्रपूर जिल्ह्यातील १४६ कविंच्या १४६ कविता, नागपूर जिल्ह्यातील १३२ कवींच्या १३२ कविता, पुणे जिल्ह्यातील १०३ कविता,यवतमाळ जिल्ह्यातील ९६ कविता,ठाणे जिल्ह्यातील ९३ कविता,अमरावती जिल्ह्यातील ९३ कविता, बुलढाणा जिल्ह्यातील ८७ कविता,औरंगाबाद जिल्ह्यातील ७८ कविता,नाशिक जिल्ह्यातील ७४ कविता, अकोला जिल्ह्यातील ६३ कविता, लातूर जिल्ह्यातील ५६ कविता,सोलापूर जिल्ह्यातील ४९ कविता,रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ कविता, बीड जिल्ह्यातील ४७ कविता ,जळगाव ४५ कविता, वाशिम जिल्ह्यातील ४५ कविता, वर्धा जिल्ह्यातील ४३ कविता,भंडारा जिल्ह्यातील ४२ कविता ,हिंगोली जिल्ह्यातील ४० कविता,परभणी जिल्ह्यातील ३६ कविता,रायगड जिल्ह्यातील ३२ कविता,उस्मानाबाद जिल्ह्यातील ३१ कविता,अहमदनगर जिल्ह्यातील २५ कविता, गडचिरोली जिल्ह्यातील २४ कविता,कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कविता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ कविता ,पालघर जिल्ह्यातील २१ कविता ,सांगली जिल्ह्यातील २० कविता, गोंदिया १९ कविता,नवी मुंबई जिल्ह्यातील १८ कविता, धुळे जिल्ह्यातील १८ कविता,सातारा जिल्ह्यातील १७ कविता, जालना जिल्ह्यातील १६ कविता, नंदुरबार जिल्ह्यातील १० कविता व महाराष्ट्र बाहेरील २१ कविता अशा एकूण २०२१ कविता या महाकाव्यग्रंथात संपादक प्रा.अशोककुमार दवणे यांनी प्रकाशित करून प्रत्येक कवीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच पैलूंवरील कविता या महाकाव्यग्रंथात वाचकाला वाचायला मिळतात. २०२१ कवींनी बाबासाहेबांच्या कार्याला दिलेली मानवंदना म्हणजे हा महाकाव्यग्रंथ होय. कवी राजा ढाले दलितांचे उद्धारक बाबासाहेब याविषयी “आला भिमराया” या कवितेत म्हणतात की,
- काळोखात विसरली पृथ्वी जागवाया ॥
- दलितांना उद्धाराया आला भिमराया ॥,
- प्रा.डॉ.यशवंत मनोहर बाबासाहेबांच्या सभ्यतेच्या विजयाची गाथा गातांना “बाबासाहेब “या कवितेत म्हणतात की,
- “बाबासाहेब,
- तुम्हीच आमचे युद्ध शास्त्र ॥
- सभ्यतेच्या विजयाची युद्धनीती ॥
- आणि युद्धविहीन युद्धाची रीती ॥”
- किशोर तेलतुंबडे बाबासाहेबांच्या समानता या तत्त्वाविषयी म्हणतात की,
- “चवदार तळ्याचे पेटविले पाणी ॥
- पाजीले सर्वांना समतेचे पाणी ॥”
- प्रा.अशोककुमार दवणे बाबासाहेब तिमिरात वाचविणारे मायबाप याविषयी “बाबासाहेब ” या कवितेत म्हणतात की,
- वाली कुणीच नव्हतं ।तेव्हा वाचविण्या आला ॥
- आणि सर्व दुःखितांचा ।तूच मायबाप झाला ॥”
- प्रा.डॉ.अशोक राणा गुलाम संस्कृतीतून वाचविणाऱ्या बाबासाहेबांविषयी “भीमा समान कोणी ” या कवितेत म्हणतात की,
- “येथील संस्कृतीने ज्यांना गुलाम केले ।
- त्यांना स्वतंत्र करण्या माझाच भीम आला ॥”
- मी “भीमराव “या अभंगात बाबासाहेब क्रांतीची मशाल याविषयी म्हणतो की,
- प्रज्ञेचा प्रकाश । समतेचे बोल ॥
- क्रांतीची मशाल । भीमराव ॥”
- प्रा.सतेश्वर मोरे लोकशाहीला जन्म देणाऱ्या बाबासाहेबांविषयी “बाबासाहेब” या कवितेत म्हणतात की ,
- “बाबासाहेब,
- हिंसेला त्यागून तुम्ही क्रांतीचा बिगुल फुंकला ॥
- आणि युद्धातून नव्या लोकशाहीचा जन्म झाला ॥”
अशा २०२१ कवींच्या २०२१ कविता या महाकाव्यग्रंथात आहेत.त्या प्रत्येकाचा उल्लेख हा लेख मोठा होण्याच्या भयास्तव करणे अशक्य आहे. लेखक-कवी-संपादक प्रा.अशोककुमार दवणे यांच्या करातून भविष्यातही अशाच प्रकारची साहित्यिक व संपादकीय सेवा घडतील आणि विविध विषयावरील भव्यदिव्य अशा कलाकृती जन्मास येतील अशी मी मनस्वी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- (डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा व साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त)
- रुक्मिणी नगर,अमरावती.
- भ्रमणध्वनी : ८०८७७४८६०९
- ग्रंथाचे नाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ
- संपादक : प्रा.अशोककुमार दवणे
- भ्र. ध्व : ९८९०३८१९५८
- प्रकाशक : प्रा. अशोककुमार दवणे, शब्ददान प्रकाशन, सविता नगर, तरोडा खु.,नांदेड
- पृष्ठ संख्या : २१८४
- मूल्य : ₹ २०००/-
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–