डोळा हा शरीरातल्या नाजूक अवयवांपैकी एक आहे. तो एखाद्या कॅमेर्याप्रमाणे काम करत असतो. डोळ्यावर पडणार्या प्रकाशाचं केंदी्रकरण होऊन ते पाठीमागील पडद्यावर पाडणं आवश्यक असतं. तसं झालं तरच आपण पाहतो त्या वस्तूची स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमा पडद्यावर उमटते. या कारणासाठी आपल्या डोळ्यात एक भिंग असतं. ते पारदर्शक असतं. पारदर्शक असल्यामुळे त्यावर पडणारा प्रकाश आरपार जाऊ शकतो. हे भिंग पाण्यासारख्या द्रवपदार्थ आणि प्रथिनं यांनी मिळून बनलेलं असतं. त्यातील प्रथिनांच्या रेणूंची रचना पारदर्शिकत्व टिकून राहील अशा प्रकारची असते. उतारवयात मात्र यातल्या प्रथिनांच्या गुठळ्या होतात. तसं झालं की भिंग गढूळतं. ते पूर्वीसारखं पारदर्शक राहत नाही. या गुठळ्या आकारानं लहान असतील किंवा संख्येनं जास्त नसतील तर पूर्वीसारखाच भिंगातून प्रकाश आरपार जाऊ शकतो. मात्र त्या गुठळ्यांमधून विखुरला जात असल्यामुळे वस्तूची प्रतिमा स्पष्ट पडत नाही. ती धूसर होते. काही वेळा या गुठळ्यांमुळे भिंगाचा रंगही बदलतो. तो पिवळसर होतो. त्यामुळे त्या प्रतिमेतील रंगही फिकट दिसू लागतात. डोळ्यावर पडणारा प्रकाश आहे त्यापेक्षा अधिक प्रखर वाटतो. तो सहन होत नाही. काही वेळा समोरच्या वस्तूभोवती प्रकाशाचं वलय असल्यासारखंही दिसतं. डोळ्यातल्या भिंगांची पारदर्शकता कमी किंवा नाहीशी होणं यालाच मोतीबिंदू होणं किंवा डोळ्यात फुल पडणं असं म्हटलं जातं.