रोज भल्या पहाटेच उठून सडासारवण करणारी, गोठयातले शेण काढून गाई वासरांना चारा टाकून त्यांना मायेने कुरवळणारी लक्ष्मी, आज सूर्य माथ्यावर आला तरी झोपेतून उठली नव्हती.दावणीची वासरे प्रेम पान्ह्या साठी हंबरत होती, पिल्लांच्या हाकेला साद घालणाऱ्या त्या माऊल्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता.माय लेकरात जणू हंबरण्याची जुगलबंदी चालली असावी, असा भास त्यावेळी होत होता.मात्र लक्ष्मी अजूनही गाढ झोपेतच होती, हा सर्व प्रकार पाहून लक्ष्मीची सासू पार्वती चिडून लक्ष्मीला हाका मारू लागते.
- लक्षमे, ओ लक्ष्मे…….
- आज तुले उठा लागतं नाई का वं..!
- कामं पळ्ळे सारे, ते काय तुवा बाप करीनं काय…?
सासूच्या एका शब्दावर नाचणारी लक्ष्मी, आज मात्र सासूचे एवढे रागाचे बोल ऐकूनही उठतं नव्हती. तेंव्हा मात्र पार्वतीचा पारा चढला,आणि ती रागाने लालबुंद होऊन लक्ष्मी जवळ गेली.
- ओ लक्षमे उठ…!
- अथी आमच्या जीवाले घोर लावून टरं पसरली काय…..!
- थाम व तुले दाखोतो कसं उन पळेलोग निजनं असते तं ….!
- एवढं बोलून पार्वती दारातली चामड्याची चप्पल उचलते आणि लक्ष्मीला जोरात फेकून मारते.तरीही लक्ष्मी हलत नाही ना डुलत नाही तेंव्हा मात्र पार्वती चांगलीच घाबरते,आणि लक्ष्मीच्या जवळ जाऊन तिच्या अंगाला हात लावून पाहते,
- तर काय…!
- लक्ष्मीचं सर्व अंग थंडगार पडलेलं अन तोंडातही पांढरा शुभ्र फेस.
- हा सारा प्रकार पाहून घाबरलेली पार्वती मनाशीच बोलते.
- अयी माय..
- जहेर गियेर पेली काय वं हे अवदसा…!
- आणि नवऱ्याला म्हणजेच जानरावला मोठं मोठ्याने हाका मारू लागते.
- अयं….!
- एकळे याना
- या बुहारीन काय केलं तं….!
- तसाच लक्ष्मीचा सासरा हातचे काम सोडून, धावत लक्ष्मीजवळ येतो,
- तशी पार्वती नवऱ्याला म्हणते.
- मेली गेली तं नशीनं …?
- लक्ष्मीची अशी अवस्था पाहून जानराव पार्वतीला म्हणतो,
- तू बस इच्याजोळ मी डाक्टरं ले घिऊनं आलोच…!
- तशी पार्वती नवऱ्याला झटक्याने बोलते.
- म्या नाई बसतं इच्या मड्या जोळ अन काई नाई बलावा लागत डाक्टरं ले अन गिकटरं ले…
- बरी मरते तं *पांढऱ्या पायाची….!*
- क्रमशः
- लेखिका
- पल्लवी चिंचोळकर अनोकार
- अडगाव बु.
- जि. अकोला
- ७७५६९०४४०९
- ———
प्रिय वाचकांनो,
लक्ष्मीची हत्या झाली
की तिने आत्महत्या केली?
हत्या असेल तर कोणी केली आणि आत्महत्या असेल तर का केली?
तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी *पांढऱ्या पायाची* या कथेचा दुसरा भाग लवकरच आपल्या साठी घेऊन येत आहे.
- ———
(Image Credit : Jagran)