शारीरिक अस्वास्थ्याचं कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात. इसीजी ही अशीच एक तपासणी आहे. ताल नियमित आणि योग्य असेपर्यंत एखाद्या पंपासारखं काम करत शुद्ध रक्त शरीरभर खेळवत प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला आवश्यक असणार्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाकडून इमानेइतबारे पार पाडलं जातं. त्यासाठी हृदयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात. या क्रियेत हृदय डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यातील रक्त जोराने बाहेर फेकत राहतं. यावेळी काही विद्युतसंदेश महत्त्वाची भूमिका बजावतात. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यागणिक एक विजेचा लोळ वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे पसरतो. या विद्युतस्पंदाचा आलेख म्हणजे ईसीजी. या आलेखावरून हृदयाच्या निरनिराळ्या भागातल्या विद्युतस्पंदाच्या स्थितीविषयीची बित्तंबातमी मिळते. थोडक्यात ईसीजी ही हृदयाच्या आरोग्याची माहिती देणारी एक साधी, निर्धोक आणि वेदनारहित निदान पद्धती आहे. हा आलेख मिळवण्यासाठी हृदयाच्या बारा निरनिराळ्या बिंदूंच्या ठिकाणी असणार्या विद्युतस्पंदांची माहिती मिळते. त्यासाठी बारा निरनिराळे इलेक्ट्रोड या बिंदुंकडून नियंत्रित केल्या जाणार्या शरीराच्या निरनिराळ्या भागातील रक्तवाहिन्यांना जोडले जातात. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यागणिक या बिंदूंवरील विद्युतस्पंदांच्या स्थितीची माहिती गोळा केली जाते. हे दाखवणारा ईसीजी आपल्यासमोर हृदयाची नेमक स्थिती मांडतो.