“मुंबईत राहून राजगृह पाहिलं नाही तू…? चल मी घेऊन जाते“ असं म्हणून संगीता मला दादरला घेऊन गेली. राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच एरव्ही सर्वसामान्यांसाठी खुले असलेले सभागृह त्यादिवशी बंद होते. राजगुहाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कुणालाही प्रवेश नव्हता. दोघीही निराश झालो. परतीचा विचार सुरु केला. असं म्हणतात, “विश्वास दृढ झाला की, निष्ठा येते. निष्ठा दृढ झाली कि श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की, भक्ती आणि भक्तीही दृढ झाली की समर्पिता.” याच समर्पित दृढ भावनेनं संगीता एकटीच राजगृहाच्या वरच्या मजल्यावर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परपोतीला घेऊन खाली आली. त्यादिवशी मी केवळ संगीतामुळे राजगृहापर्यंत पोहचले पण राजगृह पाहण्याची ईच्छा मात्र अपुर्णच राहिली.
2014 साली आम्ही 11 जण एकाचवेळी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झालो. त्यानंतर अनेक सहकारी बदलीमुळे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. उर्वरित आम्ही काहीजण सुरुवातीपासून आजतागायत मुंबई कार्यालयात आहोत. आपला जास्तीत जास्त वेळ कार्यालयात जात असल्याने साहजिकच सहकाऱ्यांसोबत सौख्य निर्माण होतं. या सहकाऱ्यांपैकीच एक संगीता बिसांद्रे… एकाच विभागात काम करीत असल्यामुळे संगीता सहकारीपेक्षा मैत्रीण म्हणून जवळची वाटू लागली. काळानुरूप संगीता सोबतची ती नात्याची वीण अधिक घट्ट झाली.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पाळा या गावात संगीता लहानाची मोठी झाली. नातेवाईकांना मायेने वागणूक देण्याचा तिच्यातला हळवा स्वभाव कायम जाणवायचा. कुटुंबाशी खुप भावनिक जवळीक असल्याने, ती कायम कुटुंब आणि मुलीच्या विचारात मग्न असायची. घर-परिवारासाठी तर ती खूप संवेदनशील होती. जराशी वेंधळी पण मनाने चांगली, माणुसकी जपणारी होती. गुण-दोष प्रत्येकातच असतात आणि त्या गुण-दोषांसह माणसं स्विकारली की, नकळत एक सुदृढ नातं तयार होतं. तर दुसरीकडे अपप्रवृत्ती तुमचे दोष आणि कमजोरी शोधत असतात. पण याबाबतीत संगीता धाडसी होती. कोणत्याही अपप्रवृत्तीला तिने कधी भीक घातली नाही. मनाने साधी, सरळ होती. स्वभावात जराही द्वेष, असूया नव्हता. माणूस पारखण्यात पक्की होती. तिचा अंदाज त्याबाबतीत कधीच चुकला नाही.
अवघ्या 4 वर्षाची अवनी तीची मुलगी… अवनीमध्ये प्रचंड जीव आणि सतत तिच्या उज्वल भविष्याचा ध्यास… त्यामुळे आयुष्यात अत्यंत अल्प अपेक्षा आणि गरजांमध्ये ती अगदी साधेपणाने राहत होती. कामाशी काम आणि पुन्हा परिवारात दंग.. एवढच तिचं विश्व होतं. यातून मिळालेल्या वेळेत आमच्या अनेकदा गप्पा रंगायच्या. सुखद अनुभव शेअर व्हायचे. मात्र दु:ख तीने कधीच सांगितलं नाही आणि खाजगी प्रश्न मीही कधी विचारले नाही.
“संगीता खुश रहा आयुष्य थोडेच आहे. आपण कायम आनंदात रहायचं.” यावर “…हो न ग बाई…“ असं तीच उत्तर कायम ठरलेलं असायचं. तिच्याशी बोलतांना अनेकदा विदर्भात आल्यासारखं वाटायचं. तिच्या आरोग्य आणि व्यक्तीमत्व प्रगतीसाठी मी आणि इतर सहकारी मैत्रीणी खुप हक्काने बोलत असू “…हो न ग बाई” असं म्हणून ती कायम स्मित हास्य करायची. काहीही झालं तरी माझी मी सक्षम असावी. असं मनाशी पक्क ठरवून तीने एमपीएससीची तयारी सुरू केली. क्लास लावला; अभ्यास केला. मुलगी लहान असतानाही जिद्दीने आणि मेहनतीने तीने मंत्रालयात नोकरी मिळवली होती. हे अनेकदा तीच्या बोलण्यात यायचं.
काही दिवसांपूर्वी विधानभवनातील बैठकीची बातमी संगीताने केली. बातमी दुसऱ्या दिवशी बहुतेक वृत्तपत्रात जशीच्या तशी छापून आली तर त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. कारण बातमी लिहीणे आणि नंतर ती आहे तशी छापून येणे याचा आनंद वेगळा असतो. आणि त्यासाठी न विसरता तीने आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तशी तिची ही शेवटची बातमी ठरली.
नियती पुर्वसुचना देत असते की काय कोण जाणे; गेल्या काही महिन्यात तिच्या राहण्यात, बोलण्यात वागण्यात पूर्वीपेक्षा प्रचंड सकारात्मक बदल झाला होता. श्रद्धा, तू बोलते ना बघ ऐकल मी तुझं; मला पण आता छान वाटतय..! अशी म्हणायची. तिच्यातला हा बदल खूपच कमी क्षणांसाठी असेल हे चुकुनही कधी डोक्यात आलं नाही. गेल्यावर्षी टाळेबंदी असतांना देखील संगीता अमरावतीवरून खाजगी वाहनाने मुंबईत पोहचली आणि कार्यालयात रुजू झाली. कार्यालयीन कामासोबत स्वतःची पुरेपूर काळजी घेऊनही दुसऱ्या लाटेत संगीताला कोरोनानं गाठलं…आणि अखेर तीच्यासोबतचा माझा आणि इतर सहका-यांचा पुढील प्रवास इथच थांबला. “इस जिंदगी के दिन कितने कम है… कितनी है खुशीया और कितने गम है…” तिला बोलवायला फोन केला की या गाण्याची डायलर टोन ऐकायला मिळायची आणि ती हजर व्हायची. आताही वाटतं तिला फोन करावा आणि ती येईल. पण नियतिला ते मान्य नाही.
अखेरच्या क्षणी सगळे सोबत असण्याचं भाग्य फार कमी जणांच्या नशिबी असतं. मात्र संगीताचा पती, मुलगी आणि तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत होते. जीवनात कुटुंब, मित्र-मैत्रीण, नाती, करीयर आहे तीथे अडथळ्यांचा सामना करावाच लागतो. तिनेही संघर्ष करून समाधानाचा मार्ग मिळवला होता. जन्म संघर्षमय असेल तर तो घाईचाच ठरतो हे शास्वत सत्य असलं तरी, ते अंतिम नाही.
जवळची व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा, सगळं जग आभासी वाटू लागतं. खरं तर संगीताला धीर देण्यासाठी तिच्यासोबत खूप बोलायचं होतं पण ती रूग्णालयात असल्यामुळे पुरेसा संवाद होवू शकला नाही. आयुष्याच्या एका वळणावर भेटलेली प्रेमळ सखी, बिनधास्त जगण्याचा सूर गवसलेली संगीता अखेर काहीही न बोलता, जीवन आणि मृत्यू यातलं अंतर दाखवून कायमची निघून गेली.
“कितने अजीब रिश्ते है यहाँ पे…
दो पल मिलते है, साथ साथ चलते है
जब मोड आये तो, बच के निकलते है…”
– श्रद्धा मेश्राम, मुंबई
मो. ८४५२९५८८५५